ठाण्याच्या राजकीय धुळवडीचा कुठे रंग, तर कुठे बेरंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:58 AM2019-03-22T03:58:46+5:302019-03-22T03:59:00+5:30

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांसाठी हा रंगोत्सव म्हणजे निवडणूक गणितांची जुळवाजुळव करण्याची नामी संधी होती; पण ही संधी साधणे सर्वांनाच जमले असे नाही.

Where the color of Thane's political flutter, and where colorless | ठाण्याच्या राजकीय धुळवडीचा कुठे रंग, तर कुठे बेरंग

ठाण्याच्या राजकीय धुळवडीचा कुठे रंग, तर कुठे बेरंग

Next

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांसाठी हा रंगोत्सव म्हणजे निवडणूक गणितांची जुळवाजुळव करण्याची नामी संधी होती; पण ही संधी साधणे सर्वांनाच जमले असे नाही. ठाण्यात शिवसेनेने उत्साहात धुळवड साजरी केली; पण युती होऊनही भाजपाच्या नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही त्यापासून सुरक्षित अंतर राखणे पसंत केले. त्यामुळे युतीच्या धुळवडीचा बेरंग झाला. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या ठाणे मतदारसंघात शिवसेनेशी दोन हात करणाºया राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंगात मनसे नखशिखांत रंगलेली पहावयास मिळाली.

सेनेच्या रंगांची भाजपाला अ‍ॅलर्जी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे ठाण्यात राष्टÑवादी आणि मनसेने होळीचा रंग एकत्रपणे उडवला असताना दुसरीकडे शिवसेनेनेही धूळवड साजरी केली. शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार संजय केळकर यांना एकाच रंगात रंगवले. हा केवळ होळीचा रंग आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्रितपणे गुलाल उधळणार असल्याचा दावा शिंदे आणि केळकर यांनी केला; मात्र यावेळी भाजपाचे इतर पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक गैरहजर दिसून आले.
होळीचा मुहूर्त साधून गुरुवारी सकाळीच शिंदे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात किसननगरातील रहिवाशांसह बच्चेकंपनीसोबत धूळवड साजरी केली. त्यानंतर त्यांनी थेट आनंदआश्रम गाठून शिवसैनिकांबरोबर होळीचे रंग उधळले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली असली, तरी अनेक मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये संभाव्य उमेदवारांवरून खटके उडत आहेत. ठाण्यातही भाजपाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विचारेंऐवजी दुसरा कोणताही उमेदवार द्यावा, अशी मागणी करून प्रचाराला विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर धुळवडीनिमित्ताने एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांनी भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांना युतीच्या रंगात रंगवून टाकले. परंतु, यावेळी भाजपाचे इतर पदाधिकारी मात्र गैरहजर राहिल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. परंतु, दोन्ही पक्षांनी या मुद्यावर आपली बाजू स्पष्ट केली. काहीही झाले तरी, लोकसभा निवडणुकीत युतीच गुलाल उधळेल, असा ठाम विश्वास या दोघांनीही या पार्श्वभूमीवर व्यक्त केला.

आम्ही नैसर्गिक रंगांची उधळण करत आहोत. शिवसेना आणि भाजपाची मैत्री ही मागील कित्येक वर्षांपासूनची आहे. ती आजही कायम आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वच पदाधिकारी हे आमच्यासोबत असून आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. लोकसभा निवडणुकीत युतीच गुलाल उधळेल.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री

युतीच्या वतीने रंग उधळण्यास सुरुवात झाली आहे. २३ मे रोजीसुद्धा युतीच गुलाल उधळेल. राष्टÑवादी, काँग्रेस किंवा मनसे असे कोणीही एकत्र आले, तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. ठाण्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून येत्या काळात विजयाचे एकच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून सर्वजण काम करतील.
- संजय केळकर, आमदार, भाजपा, ठाणे


राष्टÑवादी-मनसेची एकरंगी धूळवड


ठाणे : बुरा ना मानो होली है, म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी एकमेकांना रंग लावून निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले. ठाणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू, असे जाहीर केले. त्यामुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले असून शिवसेनेला ही निवडणूक आता फारशी सोपी जाणार नसल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.
यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे असल्याने यावेळी होळीला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसून, भाजपाविरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ठाण्यात धुळवडीनिमित्ताने राष्ट्रवादी आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. परांजपे यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच प्रकारचा रंग लावून आपला एकच रंग असल्याचे जाहीर केले.
या मतदारसंघ शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर, राष्ट्रवादीने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे आणि आनंद परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार असून, मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.

होळीच्या सर्वांना शुभेच्छा देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनादेखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली असून २३ मे रोजी आम्ही गुलाल उधळू, याची आम्हाला खात्री आहे.
- आनंद परांजपे, अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे

आमचा रंग हा एकच रंग आहे. देशात जे सुरू आहे, त्यापेक्षा आम्ही चांगले रंग उधळायला सुरु वात केली असून २३ मे रोजी उडणारा रंग चांगल्या पर्यायाची नांदी असेल, असा माझा विश्वास आहे.
- अविनाश जाधव,
जिल्हाध्यक्ष, मनसे

Web Title: Where the color of Thane's political flutter, and where colorless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.