पालिका आयुक्त संजीव जयस्वालांबद्दल ठाण्याचे पोलीस आयुक्त सिंग काय म्हणाले?

By जितेंद्र कालेकर | Published: June 28, 2018 08:32 PM2018-06-28T20:32:35+5:302018-06-28T21:13:35+5:30

गेल्या तीन वर्षात ठाणे शहरातील गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. पूर्वी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी नगण्य झाले आहे.

 What did the police commissioner of Thane said about municipal commissioner Sanjiv Jaiswalam? | पालिका आयुक्त संजीव जयस्वालांबद्दल ठाण्याचे पोलीस आयुक्त सिंग काय म्हणाले?

ठाण्याच्या कारकिर्दीबद्दल समाधानी

Next
ठळक मुद्देमुंबई सीपी होणार की नाही हे सांगणे अनिश्चिततीन वर्षात गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावाठाण्याच्या कारकिर्दीबद्दल समाधानी

जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळ चोरीचे प्रकरण असो की, बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरण प्रत्येक वेळी ठाणे पोलिसांनी कारवाई करून चोख भूमीका बजावली. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात गुन्हेगारी वाढण्याऐवजी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. गेल्या तीन वर्षातील आपल्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त करतांना ठाणेकरांचे चांगले सहकार्य लाभल्याचेही ते म्हणाले.
मार्च २०१५ मध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यापासून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व पथकांनी चांगली कामगिरी बजावल्याचेही सिंग म्हणाले. ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदलीची शक्यता असल्यामुळे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गुरूवारी सायंकाळी विशेष चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात आढावा घेतला. बऱ्याचदा दरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र असते. परंतु, ठाण्यात तीत पाच टक्के घट आली आहे. कुख्यात इराणी सोनसाखळी चोरट्यांचा मुसक्या आवळल्या. यात ८० हून अधिक चोरटे जेरबंद केले. तर ३८ जणांवर मोकंतर्गत कारवाई केली. अनेक सोनसाखळ्या जप्तही केल्या. पूर्वी आयुक्तालयात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी १० ते १५ वर आले आहे.
इफेड्रिन या अमली पदार्थाची विक्री करणा-यांना ठाण्यातून पकडल्यानंतर त्याची निर्मिती करणा-या सोलापुरातील एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीवरच धाड टाकून दोन हजार कोटींचे इफेड्रिन जप्त केले. यात कंपनीच्या मालकासह १५ जणांना अटक केली. या प्रकरणामुळे देश विदेशात ठाणे पोलिसांचे कौतुक झाले.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला खंडणी प्रकरणात केलेली अटक, जिल्हा रुग्णालयातून अपहरण झालेल्या बाळाचा लावलेला छडा, परमार आत्महत्या प्रकरणात चार नगरसेवकांना केलेली अटक, सीडीआर प्रकरणाचा छडा लावून रजनी पंडित या खासगी गुप्तहेर महिलेसह १६ जणांना अटक, सोनू जालान या बुकीला अटक, मीरारोडमधून आंतरराष्टÑीय कॉल सेंटरचा छडा लावून ७४ जणांना केलेली अटक आणि ‘चेकमेट’ या खासगी वित्तीय संस्थेतील ११ कोटींच्या दरोड्याचा यशस्वी तपास परमवीर सिंग यांच्या कार्यकाळात झाला. पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. ‘चेकमेट’ दरोड्यात तर ९ कोटी १६ लाखांची लूट झाल्याचे कंपनीने तक्रारीत म्हटले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी १५ जणांना अटक करून ११ कोटींची वसूली केल्यानंतर तक्रारदाराने यात तशी पुरवणी तक्रार दाखल केल्याचेही ते म्हणाले.
..................

संजीव जयस्वाल लहान भावासारखे..
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचेही अनेक कामांमध्ये सहकार्य लाभले. टीडीआरचा उपयोग करून खासगी विकासकांच्या मदतीने कासारवडवली, कळवा, डायघर आणि चितळसर या पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या वास्तूंचे बांधकाम असो की पोलिसांना दुचाकी देण्यासाठी पालिकेने घेतलेला पुढाकार असो. या सर्वच वेळी त्यांची चांगली मदत झाली. ते आपल्याला धाकट्या भावासारखे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ठाण्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांचेही चांगलेच सहकार्य मिळाले.
..................
मुंबई सीपी होणार की नाही?
गेल्या अनेक दिवसांपासून परमवीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार अशी चर्चा होत असतांना गुरुवारी अचानक सिंग यांनीच यात नक्की काहीच नसल्याचे सांगून पोलीस महासंचालक कार्यालयात कायदा सुव्यवस्था किंवा अन्यत्रही बदली होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मुंबईच्या आयुक्तपदी बदली होईल की नाही? याबद्दल आपण काहीच सांगू शकत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.
.......................

Web Title:  What did the police commissioner of Thane said about municipal commissioner Sanjiv Jaiswalam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.