भाजपा नगरसेवकांचा विरोध हीच विचारे यांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:24 PM2019-03-11T23:24:01+5:302019-03-11T23:24:31+5:30

मनोमिलनाचे खासदारांसमोर आव्हान; युतीचे संख्याबळ राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक

Vichare's headache is against BJP corporators | भाजपा नगरसेवकांचा विरोध हीच विचारे यांची डोकेदुखी

भाजपा नगरसेवकांचा विरोध हीच विचारे यांची डोकेदुखी

Next

- अजित मांडके

ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या ठाणे विधानसभा मतदारसंघांतील युतीच्या नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपेक्षा कितीतरी अधिक आहे. मात्र, याच मतदारसंघातील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेचे खा. राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यामुळे आता युती झाल्यावरही विचारे आणि भाजपाचे नगरसेवक यांचे मनोमिलन कसे होते, यावर विचारे यांची भिस्त आहे. विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेत भाजपाचे संजय केळकर हे विजयी झाले होते. सहा महिन्यांनंतर त्यांना शिवसेनेच्या सहकार्याची गरज लागणार असल्याने आता तेच हा तणाव निवळण्याकरिता पुढाकार घेऊ शकतात.

विधानसभा मतदारसंघांतील भाजपाची ताकद ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर वाढली आहे. राष्टÑवादी काँग्रेसला या मतदारसंघात शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसची बाजू येथे पूर्णपणे दुबळी ठरली आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून युती झाली असल्याने शिवसेनेचे राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदीलाटेमुळे पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती, तर राष्टÑवादीचे संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना ठाणे विधानसभा मतदारसंघात झाला होता. यावेळेस भाजपाने शिवसेनेच्या या मतदारसंघाला सुरुंग लावला होता. यावेळेस भाजपाचे आमदार संजय केळकर यांना या विधानसभा मतदारसंघातून ७० हजार ८४४ मते मिळाली होती. यामध्ये अनेक नव्या पट्ट्यातून भाजपाने भरघोस मतांची बेगमी केली होती. याचा फायदा ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपाला झाल्याचे दिसून आले. २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे या मतदारसंघात तब्बल १७ नगरसेवक निवडून आले. परंतु, भाजपाच्या या १७ नगरसेवकांनी विचारे यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याने तो टिकणार की निवळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे १३ नगरसेवक येथून निवडून आले आहेत. राष्टÑवादीचे या मतदारसंघात केवळ चार नगरसेवक निवडून आले आहेत. या मतदारसंघात युतीच्या वाट्याला एक आमदार असून ३० नगरसेवकांचे पाठबळ आहे. युतीच्या तुलनेत चार नगरसेवक असलेली राष्टÑवादी कमजोर आहे. मनसेने मागील लोकसभा निवडणुकीत येथे टक्कर दिली होती. परंतु, महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला भोपळा फोडता आलेला नाही.

ठाणे विधानसभा मतदारसंघातील वृंदावन, श्रीरंग, नौपाडा, हिरानंदानी इस्टेट, मेडोजचा काही भाग, ब्रह्मांड, पाचपाखाडीचा अर्धा भाग, बाजारपेठ आणि टेंभीनाका या भागात भाजपाचे वर्चस्व आहे, तर बाळकुम, ढोकाळी, शहरातील काही भागांत, पाचपाखाडी आणि घोडबंदरच्या काही भागांत शिवसेनेचा जनाधार आहे. त्यामुळे या सर्वांचा फायदा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्टÑवादीकरिता केवळ राबोडीची व्होटबँक असून मुस्लिमबहुल वस्तीमधील मते निर्णायक ठरणार आहेत. नौपाड्यातील ब्राह्मण मतदार कोणता निर्णय घेतात तसेच वृंदावन, श्रीरंग, घोडबंदर, हिरानंदानी इस्टेट, मेडोज, ब्रह्मांड येथील सुशिक्षित मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

दृष्टिक्षेपातील राजकारण
२०१४ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर भाजपाने कब्जा केला. आता युती झाली असल्याने त्याचा फायदा हा विचारेंनाच होईल, असे चित्र आहे.
विधानसभेनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाचाच वरचष्मा दिसून आला आहे. या मतदारसंघात भाजपाचे १७ नगरसेवक असून शिवसेनेचे १३ नगरसेवक आहेत.
राष्टÑवादीत मात्र मागील तीन महिन्यांत अंतर्गत राजकारण चांगलेच तापले होते. ते अद्यापही शमल्यासारखे दिसत नाही. राष्टÑवादीचे या मतदारसंघात चार नगरसेवक असून त्यातील एका नगरसेवकाचा परांजपे यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उड्डाणपूल, रेल्वेला थांबा हेच भांडवल
खा. राजन विचारे यांनी मतदारसंघात फारशी चुणूक दाखवलेली नाही, अशी काही मतदारांची तक्रार आहे. परंतु, निवडणुका घोषित होण्याआधी ठाण्यातील रखडलेल्या दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण, ठाणे स्थानकात थांबत नसलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मिळालेला थांबा, अशी त्यांची काही मोठी कामे उल्लेखनीय आहेत.

आपल्या पक्षातील हितशत्रूंचा धोका
विचारे यांना मित्रपक्षाबरोबरच स्वपक्षातील काही मंडळींकडून धोका असल्याचेही दिसत आहे. शिवसेनेचे या मतदारसंघात १३ नगरसेवक असून त्यातील किती नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

भाजपा नगरसेवकांचा विचारेंना विरोध
ऐन निवडणुकीच्या आधी विचारेंना आपल्या मित्रपक्षातील म्हणजेच भाजपाच्या २३ नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.
विचारे यांच्याऐवजी अन्य कोणताही उमेदवार द्या, त्याच्यासाठी आम्ही काम करण्यास तयार आहोत, असे पत्र त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यामुळे विचारे यांना ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.

लोकार्पणाला अनेक भाजपा नगरसेवकांची दांडी आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील मल्हार सिनेमा, गोकुळनगर येथील उड्डाणपुलांच्या लोकार्पणाच्या वेळेस भाजपाचे आमदार संजय केळकर हे हजर होते. त्यांच्या हातूनच येथे श्रीफळ वाढवण्यात आला. परंतु, भाजपाचे शहराध्यक्ष, या भागातील नगरसेवकवगळता भाजपाच्या इतर नगरसेवकांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

Web Title: Vichare's headache is against BJP corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.