वांगणीची पाणीपुरवठा योजना ‘तहानलेली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:24 AM2018-03-05T07:24:53+5:302018-03-05T07:24:53+5:30

वांगणी गावाचे शहरीकरण होऊ लागल्याने, विविध गृहनिर्माण प्रकल्प येऊ लागल्याने येथील वस्ती वाढते आहे. मात्र, इतर शहरांप्रमाणेच येथेही सुविधांचा अभाव दिसून येतो. साधारणपणे प्रशासकीय कारभारामुळे योजना रखडतात. पण, येथे ग्रामस्थांनीच जलवाहिन्या टाकण्यास विरोध केल्याने पाणीपुरवठा योजना रखडली आहे. यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.

 Vangani's water supply scheme 'thirsty' | वांगणीची पाणीपुरवठा योजना ‘तहानलेली’

वांगणीची पाणीपुरवठा योजना ‘तहानलेली’

googlenewsNext

- पंकज पाटील, वांगणी

बरनाथ आणि बदलापूर या शहरांनंतर वांगणीचा सुनियोजित विकास होईल, अशी अपेक्षा सर्वांचीच होती. मात्र, या वांगणीचे गावपण शहरात रूपांतरित होत असताना शहर म्हणून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्यातील महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. मात्र, वांगणी हे गाव उल्हास नदीच्या तीरावर वसलेले असले, तरी ते अद्याप तहानलेलेच आहे. वांगणीत ‘घर तिथे बोअरवेल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच बोअरवेल आटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वांगणी गाव टँकरवरच अवलंबून आहे. गावासाठी जी पाणीपुरवठा योजना सरकारने मंजूर केली, ती योजना पूर्ण करण्यासाठीही विलंब झाला आहे.
या योजनेतील जलवाहिन्या टाकताना गावातील नागरिकांनीच आपल्या शेतातून ही जलवाहिनी टाकण्यास विरोध केल्याने आज वांगणीची योजना रखडलेली आहे. या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना आजही जलवाहिनी टाकण्याचे कामदेखील पूर्ण होऊ शकलेले नाही. वांगणी गावातील ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे गावचीच पाणीपुरवठा योजना ‘तहानलेली’ राहिली आहे.
उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलून वांगणी गावाला पाणीपुरवठा करणारी सक्षम यंत्रणा होती. मात्र, १० वर्षांत वांगणीचा झालेला विस्तार पाहता ही योजना गावासाठी अपुरी पडू लागली. योजनेचे पाणी पुरत नसल्याने नवीन बांधकाम करणाºयांनी बोअरवेलवर भर दिला आहे. गावाला योजनेतून पाणी मिळत नाही आणि गावाला ते पुरणारही नाही, याची कल्पना असल्याने नवीन योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा झाला. मात्र, मागील पाच वर्षांत वांगणीचा विकास हा अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने झाला. अधिकृत असो वा बेकायदा, अनेक चाळी आणि इमारती या भागात उभ्या राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक या भागात स्थायिक झाले आहेत. नियोजनाअभावी विकास झाल्याने नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. त्यातच पाण्यासाठी संपूर्ण वांगणीला संघर्ष करावा लागत आहे. जुनी योजना ही अपुरी पडत असल्याने आता नव्या योजनेचे काम सुरू केले आहे. मात्र, ही योजना पंचवार्षिक योजनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाण्याची सर्वाधिक गरज वांगणीकरांना असतानाही या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ योग्य ते सहकार्य करताना दिसत नाहीत. जलवाहिनी आपल्या शेतातून नको, अशी भूमिका ग्रामस्थांपैकी काही शेतकरी घेत असल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला खो बसला आहे.
ही समस्या सुटत नाही, तो रेल्वे रुळांखालून जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब लागला. या सर्व अडचणींवर मात करत वांगणीची पाणीपुरवठा योजना ही कशीबशी पूर्ण करण्याचे काम आता केले जात आहे. सर्व समस्या असल्या तरी त्यावर तोडगा काढून त्यातून मार्ग काढत योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, असे असले तरी या योजनेतून नेमका पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याची शाश्वती ना ग्रामस्थ ना अधिकारी देऊ शकत.
पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सर्वाधिक त्रास हा जलवाहिनी टाकण्याच्या कामालाच झाला आहे. योजनेचे काम करत असताना ती परिपूर्ण होईल, याचा विचार केला आहे. मात्र, ते काम वेळेत संपेल, याची कोणतीच दक्षता घेण्यात आलेली नाही. जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरी जलवाहिन्यांचा अद्याप पत्ताच नाही.
वांगणी गावातच अद्याप जलवाहिनीचे काम झालेले नाही. वांगणी शहराच्या चारही बाजूला शहर वसत असले तरी प्रत्यक्षात गावातच अजून पाणीयोजनेचे काम पूर्ण झालेले नाही.

समिती बदलूनही योजना अपूर्णच
योजनेचे पाइप आलेले असतानाही ते टाकण्यासाठीची यंत्रणा मात्र संथगतीने काम करत आहे. या योजनेवर देखरेख करण्यासाठी पाणीपुरवठा समितीही तयार करण्यात आली होती. योजनेत अडथळा निर्माण करणारे ग्रामस्थच असल्याने आधीची समिती पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हती. योजना पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने समितीदेखील बदलण्यात आली. समिती बदलल्यावर तरी योजनेचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, योजना पूर्ण करण्यासाठी येणाºया अडचणींमध्येच वाढ होत
गेल्याने आजही ही योजना पूर्ण झालेली नाही.

Web Title:  Vangani's water supply scheme 'thirsty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.