उल्हासनगरात सत्तापालट? शिवसेनेशी युतीच्या भाजपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:32 AM2018-04-19T01:32:20+5:302018-04-19T01:32:20+5:30

लोकसभा निवडणुकीत युती व्हावी म्हणून शिवसेनेची मनधरणी करणाऱ्या भाजपाने स्थानिक सत्तेतही त्या पक्षाला वाटा देत नाराजी दूर करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचे मानले जाते.

Ulhasnagar power system? Movements of BJP alliance with Shiv Sena | उल्हासनगरात सत्तापालट? शिवसेनेशी युतीच्या भाजपाच्या हालचाली

उल्हासनगरात सत्तापालट? शिवसेनेशी युतीच्या भाजपाच्या हालचाली

Next

सदानंद नाईक ।

उल्हासनगर : सत्तेतील ३३ टक्के वाट्यासाठी ओमी कलानी टीमचे सुरू असलेले दबावतंत्र, भाजपातील एका गटाच्या सतत सुरू असलेल्या कागाळ््या आणि साई पक्षाचे इशारे यामुळे कंटाळून गेलेल्या भाजपाच्या नेतृत्त्वाने शिवसेनेला सोबत घेत उल्हासनगरमध्ये सत्तापालटासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत युती व्हावी म्हणून शिवसेनेची मनधरणी करणाऱ्या भाजपाने स्थानिक सत्तेतही त्या पक्षाला वाटा देत नाराजी दूर करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचे मानले जाते.
भाजपाच्याच पदाधिकाºयाने सत्ता समीकरणे बदलतील, असे स्पष्ट संकेत दिले. मात्र या घडामोडींमुळे ओमी टीमची कोंडी झाली असून महापौरपदासह आमदारकीचे कलानी कुटुंबाचे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचवेळी भाजपातचील असंतुष्ट, ओमी टीम आणि साई पक्षाचे रूसवेफुगवे सांभाळताना मेटाकुटीला आलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सुटकेचा निश्वास टाकतील, अशी स्थिती आहे.
उल्हासनगर महापालिकेवर आपला झेंडा फडकावा, यासाठी भाजपाने ओमी कलानी यांच्या टीमसोबत महाआघाडी केली. शिवसेनेने आधीच युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. कलानी कुटुंबाच्या करिष्म्यामुळे स्वबळावर महापालिकेत सत्ता येईल, असा भाजपा नेत्यांचा समज होता. पण ही आघाडी ३३ जागांवर अडली. त्यामुळे सत्तेसाठी साई पक्षाला सोबत घेताच कुरबुरींना तोंड फुटले. आपल्या पाििठंब्याची पूरेपूर किंमत साई पक्षाने वसूल केली.
ओमी टीमला महापौरपदाचे आमिष दाखवून वर्षभर पक्षातील एका गटाने त्यांची मनधरणी केली. त्याचवेळी दुसरा गट त्या टीमला एकही पद मिळू नये यासाठी कागाळ््या करत राहिल्याने या सत्तेला स्थैर्य लाभले नाही. राज्यात युतीला पोषक परिस्थिती निर्माण व्हावी, याचा विचार करून भाजपाने शिवसेनेसोबत सत्ता समीकरण जुळवण्यास सुरूवात केली आहे. भाजपा व ओमी टीममधील करारानुसार जूनमध्ये महापौरपद त्या टीमकडे म्हणजेच पंचम कलानी यांना द्यावे लागणार आहे. त्यांना महापौरपद दिल्यास त्या पदाचा कालावधी सुरू असतानाच लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढविण्याची वेळ येईल. कलानी कुटुंबाने आधीच आमदारकीची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. ती ज्योती यांच्याऐवजी ओमी स्वत: लढवतील, अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने ओमी कलानी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यास भाजपातील मोठा गट फुटण्याची भीती आहे. त्यामुळे त्या टीमचे ओझे झुगारून देत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

असे असेल दुसरे सत्ता समीकरण
महापालिकेत नगरसेवकांची संख्या ७८ असल्याने काठावरच्या बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. जर शिवसेना सोबत आली नाही आणि ओमी टीमनेही दगाफटका केला, तर शिवसेनेने तटस्थ राहून मदत करावी, असाही प्रस्ताव भाजपा नेते मांडतील.
कारण तशा स्थितीत भाजपाला आपले २०, साई पक्षाचे ११, रिपाइं-पीआरपीचे-३, भारिप-१ अशा ३५ जणांची बेगमी करावी लागेल आणि ओमी टीमला विरोध हा एकमेव अजेंडा राबवणाºया राष्ट्रवादीच्या चार सदस्यांची मदत घ्यावी लागेल.
पण ही गोळाबेरीज करणे आणि नंतर सांभाळणे प्रचंड कटकटीचे असल्याने या समीकरणाचा फारसा विचार झालेला नाही. त्यातही सर्व पक्ष सत्तेसाठी भाजपा सोबत येतील का आणि आल्यास जो वाटा मागतील, तो देणे शक्य होईल का हेही प्रश्न अनुत्तरीत आहेत.

भाजपाने सत्तेपासून दूर ठेवल्याने शिवसेनेने विरोधकांना बळ देत त्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नव्हती. ओमी टीम भाजपाची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडली, तर आम्ही त्यांना मदत करू अशी आॅफरही शिवसेनेने दिली होती.

कलानींची ताकद पोटनिवडणुकीत उघड
महापालिकेच्या प्रभाग १७ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार शकुंतला जग्यासी यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून ओमी टीमच्या साक्षी पमनानी यांना भाजपाने उमेदवारी दिली. पक्षाने त्यांना ताकद दिली, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण प्रचारात उतरले. पण राष्ट्रवादीत फोडाफोडी करूनही पमनानी यांचा पराभव झाला आणि त्यामुळे ओमी कलानींच्या नेतृत्त्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

शिवसेनेची सोबतच फायद्याची
उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे ३३ नगरसेवक असले तरी त्यात ओमी गटाचे फार तर १३ जण असतील. त्यांनी असहकार पुकारला तरी भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांना व्हिप पाळावा लागेल. पण फूट पडली, तरी भाजपाचे २० आणि शिवसेनेचे २५ नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहेत. त्यामुळे साई पक्षाचे ओझेही दूर सारता येणार आहे. यापूर्वी १० वर्षे पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती.

कल्याण-डोंबिवलीतही मनोमिलनाचे प्रयत्न
कल्याण-डोंबिवलीतही मे महिन्यात महापौरपद शिवसेनेकडून भाजपाकडे येणार आहे. तेथे हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. प्रभाग समितीचा एखाद-दुसरा अपवाद वगळता दोन्ही पक्षांनी परस्परांना सत्तेतील ठरलेला वाटा दिला आहे. आताही तेथे हा फेरबदल सुखरूप पार पडावा, यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Ulhasnagar power system? Movements of BJP alliance with Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.