थीम पार्कघोटाळ्याची एसीबीकडे तक्रार, फिर्याद समजून कारवाईची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:14 AM2018-11-16T05:14:40+5:302018-11-16T05:15:04+5:30

फिर्याद समजून कारवाई करा : राष्ट्रवादीची मागणी; करदात्या नागरिकांना गंडा घातल्याचा आरोप

Theme park: NCP's demand for complain against ACB, complaint proceedings and action | थीम पार्कघोटाळ्याची एसीबीकडे तक्रार, फिर्याद समजून कारवाईची राष्ट्रवादीची मागणी

थीम पार्कघोटाळ्याची एसीबीकडे तक्रार, फिर्याद समजून कारवाईची राष्ट्रवादीची मागणी

googlenewsNext

ठाणे : घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या ‘थीम पार्क’च्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असतानाही त्यावर महापालिकेने १६ कोटी रु पये खर्च केले आहेत. या सर्व प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कर भरणाऱ्या नागरिकांना अप्रत्यक्ष गंडाच घातला आहे. सार्वजनिक संपत्तीचा हा अपहार असून सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते संबंधित ठेकेदारासोबत फिरत आहेत. यावरून या घोटाळ्यात शिवसेनेचाही सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये सेनेचे सदस्यही असल्याने तीकडून निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. म्हणूनच, या प्रकरणाची समांतर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खाते आणि ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिले आहे.

या पत्रानुसार, ठाणे पालिकेने घोडबंदर रोड येथे नवे ठाणे-जुने ठाणे हे थीम पार्क उभे केले आहे. ठाण्यातल्या सुप्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती येथे उभारल्या आहेत. या कामासाठी सल्लागार म्हणून कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना नियुक्त केले होते. मात्र, हे १६ कोटींचे काम देसाई यांच्याच कंपन्यांना बहाल करण्यात आले. निविदेतील अटीनुसार काम झालेले नसतानाही पालिकेने त्याकडे डोळेझाक करून १६ पैकी १३ कोटी रु पयांचे बिल देसाई यांच्या कंपनीला अदा केले आहे. या पार्कच्या उभारणीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येच उघडकीस आले आहे. पार्कमध्ये उभारलेल्या प्रत्येक वास्तूसाठी अव्वाच्या सव्वा रु पये दर लावला आहे. येथील फुटकळ लाकडी जहाजासाठी ४९ लाख, भिंतीवरील घोडबंदर किल्ला आणि मुंब्रादेवी मंदिराच्या चित्रांसाठी एक कोटी ११ लाख, न धावणाºया ट्रेनसाठी एक कोटी ३१ लाख, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकफुटी फायबर पुतळा १२ लाख अशा पद्धतीने या कामावर पालिकेने तब्बल १३ कोटी रु पयांची बिले अदा केली आहेत. या कामांचा खर्च दोन कोटी ३३ लाखांपेक्षा जास्त नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ठाणे शहरात असलेल्या अनेक वास्तूंच्या प्रतिकृती एकत्रितरीत्या एकाच उद्यानामध्ये स्थापित करण्याचा या थीम पार्कचा उद्देश होता. मात्र, पैसे कमावण्याच्या उद्देशाने अनेक अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने याठिकाणी अत्यंत तकलादू आणि ठाण्यात नसलेल्या वास्तूदेखील या ठिकाणी स्थापित करून पैसे उकळले आहेत. संभाजी महाराजांचा पुतळा हे त्याचे उदाहरण आहे. सदरचा प्रकल्प राबवण्याच्या आधी नितीन देसाई यांना प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सदरच्या थीम पार्कची उभारणी करण्यात आली असली, तरी जे या थीम पार्कचे सल्लागार होते, त्यांनाच ते उभारणीचे कंत्राटही दिले. त्यामुळे त्याच्या उभारणीसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार नियुक्ती प्रक्रि येपासून ठेका देण्यापर्यंतची सर्वच प्रक्रि या निविदेतील अटीशर्ती यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात ज्या अधिकाºयाकडे संशयाची सुई वळत आहे, त्याच अधिकाºयाला जे.जे. स्कूल आॅफ आर्टचा अहवाल आणण्यास पाठवले होते. अद्यापही तो मिळालेला नाही. तसेच, ज्या ठेकेदारावर आरोप होत आहे, त्यासोबत पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते एकत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे या घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाचे सदस्य ज्या समितीत आहेत, त्यांकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षाच ठेवता येत नाही. म्हणूनच, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने समांतर चौकशी करण्याची मागणी आहे.

चौकशी समिती ही निव्वळ डोळेझाक - आनंद परांजपे

च्राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी थीम पार्कउभारणीतील भ्रष्टाचार पुराव्यासह महासभेमध्ये चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी नगरसेवकांसह त्याची पाहणी केली होती. राष्ट्रवादीने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर ठामपाने चौकशी समिती नेमली आहे.

च्तिचाच कारभार संशयास्पद आहे. या समितीला चौकशी करण्यासाठी सक्षम अशा निवृत्त अधिकाºयाचा शोधच घेता आलेला नाही. शिवाय, या प्रकरणामध्ये संशयित असलेले अधिकारीही आपल्या पदावर कायम आहेत. त्यामुळे पालिकेच्या चौकशी समितीला अपेक्षित पुरावे मिळण्याची शक्यता अगदीच धूसर आहे.

च्ही समिती म्हणजे केवळ डोळेझाक असल्याचा आमचा आरोप आहे. त्यामुळेच चौकशी समितीकडून चौकशी सुरू असतानाच समांतर पातळीवर लाचलुपत प्रतिबंधक खात्यानेही चौकशी करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Theme park: NCP's demand for complain against ACB, complaint proceedings and action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे