ठाणे-पालघर जिल्ह्यांत पाच वर्षांत ४०९३ बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 11:36 PM2019-06-29T23:36:17+5:302019-06-29T23:37:57+5:30

बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.

In Thane-Palghar districts, 4093 child deaths have been reported in five years | ठाणे-पालघर जिल्ह्यांत पाच वर्षांत ४०९३ बालमृत्यू

ठाणे-पालघर जिल्ह्यांत पाच वर्षांत ४०९३ बालमृत्यू

Next

- नारायण जाधव

ठाणे : मुंबईच्या कुशीत असलेली आणि राजधानीची तहान भागवणारी १० धरणे असलेल्या ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यांत गेल्या पाच वर्षांत पोषण आहारावर दीडशे कोटींचा निधी खर्च होऊन तब्बल ४०९३ बालमृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १५०६ बालमृत्यू झाल्याची नोंद जि.प.च्या महिला व बालविकास विभागाच्या दप्तरी आहे. शिवाय, सध्या सॅमची ६८ तर मॅमची ८८२ बालके आढळली आहेत. तर, पालघर जिल्ह्यात पाच वर्षांत २५८७ बालमृत्यू झाले आहेत.
बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.
यंदाच्या एप्रिल २०१९ मध्ये सॅमच्या १६३ आणि मॅमच्या १७९६ बालकांची नोंद झाली आहे. मात्र, शासनदरबारी बालमृत्यूंची नोंद ही कुपोषणाने नव्हे, तर न्यूमोनिया, डायरिया व तत्सम आजाराने झाल्याचे भासवले जात असल्याने कोवळी पानगळ दरवर्षी या निष्ठूरतेमुळे झडतच आहे.



पोषण आहारावर पाच वर्षांत दीडशे कोटी
ठाणे जिल्ह्यात बालकांच्या नियमित आहारावर गेल्या पाच वर्षांत ७९ कोटी ७९ लाख सहा हजार रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे २०१४-१५ मध्ये ३४ कोटी ८२ लाख ८६ हजार असलेला निधी २०१८-१९ मध्ये नऊ कोटी १८ लाख ४६ हजारांवर आला आहे.
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७० कोटी ३२ लाख ९९ हजार खर्च झाले आहेत. यात २०१५-१६ मध्ये एक कोटी १२ लाख ९१ हजार, तर २०१८-१९ मध्ये २० कोटी ८६ लाख ४१ हजार, तर २०१९-२० मध्ये एप्रिल अखेरपर्यंत सहा कोटी ६६ लाख ६७ हजार रुपये खर्च झालेले आहेत.

६९३ अंगणवाड्यांत शौचालयच नाही
पालघर जिल्ह्यातील ३१८३ अंगणवाड्यांपैकी २००५ अंगणवाड्यांची स्वत:ची वास्तू असून ५८४ अंगणवाड्या भाड्याच्या घरांत भरत आहेत. त्यातील ५७६ अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालविकास विभागाची आकडेवारीच सांगते. शिवाय, ६९३ अंगणवाड्यांत शौचालय नसल्याने तेथील बालकांना उघड्यावरच आपला नैसर्गिक विधी उरकावा लागत आहे. त्यामुळे दुर्गमपाड्यांतील अंगणवाडीसेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.

Web Title: In Thane-Palghar districts, 4093 child deaths have been reported in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे