ठाण्यात अकरा महिन्यांच्या अपंग मुलीचा जन्मदात्या आईनेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:39 PM2018-06-04T22:39:50+5:302018-06-04T22:39:50+5:30

मुलगी मंदबुद्धी असल्याच्या कारणाने तिला माहेरी ठेवण्याचा सासू आणि पतीने तगादा लावला होता. तिला माहेरी ठेवण्यासाठी निघालेल्या आईने मुलीचा गळा दाबून प्रेत कळव्यातील खाडीत टाकल्याची खळबळजनक कबूलीच पोलिसांना सोमवारी दिली.

Thane murder case: 11 month old girl killed by mother | ठाण्यात अकरा महिन्यांच्या अपंग मुलीचा जन्मदात्या आईनेच केला खून

माहेरी ठेवण्याऐवजी गळा दाबून केला खून

Next
ठळक मुद्देप्रेत खाडीत टाकल्याची दिली कबुलीपती आणि सासूने माहेरी ठेवण्यासाठी लावला होता तगादामाहेरी ठेवण्याऐवजी गळा दाबून केला खून






ठाणे : बुद्धीने मंद असलेल्या ११ महिन्यांच्या आपल्या मुलीला गळा दाबून ठार केले. नंतर, तिला कळवा खाडीवरील पुलावरून खाली फेकल्याची खळबळजनक कबुलीच यशोदा किरण छेडा (३०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या आईने सोमवारी ठाणेनगर पोलिसांना दिली. तिच्या या कबुलीने पोलीसही अवाक झाले असून ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने या चिमुकलीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिद्धी या मुलीच्या मंदबुद्धीमुळे तिला सांभाळणे कठीण झाले होते. त्यामुळे पती आणि सासूने तिला माहेरी (सांताक्रूझ, मुंबई) ठेवण्यास सांगितले होते. ती तिला घेऊन १८ मे २०१८ रोजी माहेरी ठेवण्यासाठी पतीसह निघाली. पतीने तिला ठाणे रेल्वेस्थानकाजवळ सोडले आणि तो कामावर निघून गेला. तिने मात्र रेल्वेने सांताक्रूझला न जाता पायी सॅटीस ब्रिजखालून तलावपाळीचा परिसर गाठला. डॉ. मूस चौकाजवळ या मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर तशीच कारागृह तलावामार्गे कळवा खाडीवरील सध्या बंद असलेल्या पुलावरून मुलीचा मृतदेह खाली फेकला. त्यानंतर, घरी जाऊन मुलीला माहेरी सोडल्याची तिने बतावणी केली. गेल्या दोनतीन दिवसांपासून तिचे पती किरण छेडा यांनी मुलीची विचारणा करून तिला पुन्हा घरी आणण्याचा तगादा लावला. तेव्हा मात्र तिने खुनाची कबुलीच ठाणेनगर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी ९ वाजता दिली. याप्रकरणी मुलीचा खून करणे आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी यशोदा छेडा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
------------------

Web Title: Thane murder case: 11 month old girl killed by mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.