ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी; सर्वाधिक फटका घोडबंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 05:11 AM2019-06-14T05:11:03+5:302019-06-14T05:11:16+5:30

भातसा धरणात तांत्रिक बिघाड : शुक्रवार, शनिवारी कमी दाबाने पुरवठा

Thane gets water for three days; The biggest blow is that of Ghodbunderla | ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी; सर्वाधिक फटका घोडबंदरला

ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी; सर्वाधिक फटका घोडबंदरला

googlenewsNext

ठाणे : भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारपासून बंद झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा घोडबंदर भागाला बसला असून त्या खालोखाल कोपरी, टेकडी बंगला, अंबिकानगर आदी पसिराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परंतु, आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरूकरण्यात येणार आहे. असे असले तरी १४ जूनपर्यंत शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्याला गुरूवारी ६० टक्के पाणीकपातीचा फटका बसला आहे.

ठाणे आणि मुंबईला भातसा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. ११ जून रोजी दुपारी या धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे २८ आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारे ४ ही पंप बंद पडले होते. अखेर १२ जून रोजी सकाळी १० वाजता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून पाणी उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु, भातसापासून पिसेपर्यंत पाणी उचलण्यात येत असून हे १६ किमीचे अंतर आहे. त्यामुळे या १६ किमीच्या कॅनालमध्ये खडखडाट झाला होता. नंतर जेव्हा पाणीपुरवठा सुरू झाला, तेव्हा या कॅनालमधून पाणी पिसेपर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होऊन त्याचा फटका ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या कॅनालमध्ये पाणी सुरुवातीला न आल्याने ते सुकले होते. त्यातच त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळे येथून पुढे पाणी जाईपर्यंत अडथळे निर्माण झाले होते. या अडथळ्यांमुळे मुंबईने पाणी उचलण्यासाठी आपला प्रेशर ६५ वरून ३५ वर आणला होता. तर ठाणे महापालिकेला मात्र शून्य प्रेशर मिळाला. मुंबईचे २८ पैकी सुरुवातीला १५ पंप सुरू होते. तर ठाणे महापालिकेचा केवळ १ पंप सुरू होता. त्यामुळे ठाण्याला मात्र ६० टक्के फटका बसल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे महापालिका बीएमसीकडून ६० एमएलडी पाणी उचलत असल्याने त्याचाही फटका ठाण्यालाच अधिक बसल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाण्यातील अनेक भागांत पाण्याचा खडखडाट होता. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला असून बुधवारी सायंकाळपासून या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहरातील कोपरी,अंबिकानगर, टेकडी बंगला याशिवाय उंचावरील भागांनाही याचा अधिक फटका बसला आहे.

टँकरची संख्या वाढली दुपटीने
च्ज्या ज्या भागांना पाणी नाही, त्या भागात पालिकेच्या माध्यमातून २५ टँकरेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, रोज होणाऱ्या मागणीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले.
च्शुक्रवार आणि शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.

तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर भातसा ते पिसेर्पयतच्या कॅनालमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. नंतर पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा म्हणून ठाणे महापालिकेने या कॅनालमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

इंदिरानगरमध्ये हाल : इंदिरानगर भागात आधीच ९ आणि १० जून रोजी एमएसईबीच्या वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्याने पाणीकपातीचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. त्यात आता पुन्हा येथील रहिवाशांना १४ जून पर्यंत पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
आजचा शटडाऊन रद्द : तांत्रिक दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने ठाणेकरांचे आधीच हाल झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारा शटडाऊन तूर्तास रद्द केला आहे.

Web Title: Thane gets water for three days; The biggest blow is that of Ghodbunderla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.