दिवाळीत घ्या वीज सुरक्षेची काळजी; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

By अनिकेत घमंडी | Published: November 9, 2023 03:51 PM2023-11-09T15:51:17+5:302023-11-09T15:56:03+5:30

कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत सणाचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.

Take care of electricity safety in Diwali; Appeal to customers of Mahavitraan | दिवाळीत घ्या वीज सुरक्षेची काळजी; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

दिवाळीत घ्या वीज सुरक्षेची काळजी; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

 डोंबिवली: दिवाळी सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाके वाजवताना वीज सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीज यंत्रणेसह घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत सणाचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणने गुरुवारी केले. महावितरणची वीज वितरण यंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.

फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलरजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासूनही सावध राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भार टाकू नये. गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी.

Web Title: Take care of electricity safety in Diwali; Appeal to customers of Mahavitraan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.