मराठा आमदारांचे घातले प्रतीकात्मक श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:08 AM2018-07-26T00:08:08+5:302018-07-26T00:08:37+5:30

निषेधार्थ केले मुंडण : कल्याणमध्ये वाहनांची तोडफोड, पत्रकारांनाही धक्काबुक्की

Symbolic Shraddha Inspired by Maratha MLAs | मराठा आमदारांचे घातले प्रतीकात्मक श्राद्ध

मराठा आमदारांचे घातले प्रतीकात्मक श्राद्ध

Next

कल्याण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कल्याण बंद पाळण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चापूर्वी काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि दमदाटी करण्याचा प्रकार घडला. आरक्षणासाठी पाठपुरावा न करणाºया मराठा आमदारांचा निषेध म्हणून तहसील कार्यालय परिसरात ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून आमदारांचे प्रतीकात्मक श्राद्धही घातले. दरम्यान, तहसीलदार अमित सानप यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मोहने, आंबिवली, मुरबाड, शहापूर आदी ठिकाणांहून समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलकांनी शिवाजी चौकात जमायला सुरुवात केली. यावेळी रेल्वेस्थानक परिसरातून शिवाजी चौकाकडे जाणाºया आंदोलकांनी स्थानक व आसपासच्या परिसरातील दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवाजी चौक आणि सहजानंद चौक या परिसरात वाहने अडवण्याचा आणि काही रिक्षांच्या तोडफोडीचाही प्रयत्न झाला. त्यामुळे रिक्षांचे काही प्रमाणात नुकसानही झाले.
दरम्यान, वृत्तांकन करणारे कल्पेश गोरडे, नीलम चौधरी, पूनम शिंदे आणि निर्मल चौधरी या पत्रकारांना धक्काबुक्की आणि दमदाटीचा प्रकारही यावेळी घडला. रेल्वेस्थानक परिसरातही काही बसची आणि टेम्पोची तोडफोड करण्यात आली. दुपारी १२ पर्यंत मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते शिवाजी चौकात जमा झाल्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. महंमदअली चौकमार्गे तहसील कार्यालयाकडे गेलेल्या मोर्चात आंदोलनकर्त्यांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ आदी घोषणा दिल्या. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकताच तेथे ठिय्या मांडण्यात आला. तेथे औरंगाबाद येथील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही वेळाने तहसीलदार अमित सानप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मराठा क्रांती जनआंदोलनाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

कल्याण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. काही वाहनांची झालेली तोडफोडवगळता बंद शांततेत पार पडला. पश्चिम आणि पूर्व भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिक्षा आणि बाजारपेठा बंद होत्या. तुरळक प्रमाणात अन्य वाहनांची येजा सुरू होती. शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणावर समाजबांधव जमा झाल्याने सर्व दिशेकडील वाहतूक बंद करण्यात आली. परंतु, रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मोकळी वाट करून दिली जात होती. त्यामुळे बुधवारच्या मोर्चामध्येही मराठा समाजबांधवांकडून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले गेल्याचे दिसून आले.

टिटवाळ्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद
टिटवाळा : मराठा क्र ांती मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या बंदला टिटवाळ्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, शाळा आणि रिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद होती. रिक्षांअभावी नागरिक तसेच महागणपतीच्या मंदिरात दर्शनास आलेल्या भाविकांना पायपीट करावी लागली. टिटवाळा रेल्वेस्थानक चौक, निमकरनाका, गणपती मंदिर चौक, गोवेलीनाका, म्हारळनाका आदी ठिकाणी बंदोबस्त ठेवल्याची माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद
डोंबिवलीत बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. रेल्वेस्थानक परिसरात बंदचा परिणाम जाणवला. मात्र, अन्यत्र तो फारसा दिसला नाही. रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. खाजगी वाहनांची वाहतूक मात्र सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून डोंबिवलीतही चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Symbolic Shraddha Inspired by Maratha MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.