सुधाकर चव्हाण मालमत्ता प्रकरण : एसआयटीची सारवासारव आणि संशयाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:24 AM2018-04-07T06:24:06+5:302018-04-07T06:24:06+5:30

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चव्हाण यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा ४१ टक्के जादा मालमत्ता सापडल्याची माहिती देताना काही नावे लपवण्याच्या प्रयत्नात पोलिसांची गुरूवारी अक्षरश: त्रेधा उडाली.

Sudhakar Chavan Property Case: SIT's gloss and suspicion cloud | सुधाकर चव्हाण मालमत्ता प्रकरण : एसआयटीची सारवासारव आणि संशयाचे ढग

सुधाकर चव्हाण मालमत्ता प्रकरण : एसआयटीची सारवासारव आणि संशयाचे ढग

Next

ठाणे - बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चव्हाण यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा ४१ टक्के जादा मालमत्ता सापडल्याची माहिती देताना काही नावे लपवण्याच्या प्रयत्नात पोलिसांची गुरूवारी अक्षरश: त्रेधा उडाली. ही बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्यांची आधी ३३ नावांची असलेली यादी रात्री १९ वर आणण्यात आल्याने ठाणे पोलिसांवर संशयाचे धुके जमा झाले. मूळच्या यादीत मुंबई-ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डरांसह ठाणे पालिकेतील बड्या अधिकाºयांचा समावेश असतानाही गुरूवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशी नावेच फिर्यादीत नसल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाºयांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे ही १४ नावे कोणाच्या सांगण्यावरून वगळली याबद्दल तर्क लढवले जात होते.
विक्रांत चव्हाण यांचे गाळे आणि निवासस्थानी छापे टाकल्यावर गुरुवारी पोलिसांच्या पथकाने सुधाकर चव्हाण यांचे घर, कार्यालय अशा १६ ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते यांनी सुधाकर चव्हाण, त्यांची पत्नी, सासू, सासरे, मेव्हणा, त्याची पत्नी तसेच ठाणे महापालिकेतील बडे अधिकारी आणि मुंबई ठाण्यातील नामांकित बिल्डर्स अशा ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती काही पोलीस अधिकाºयांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना दिली. ती दुपारनंतर व्हॉटसअ‍ॅपवरही आली. यातही बिल्डर-अधिकाºयांची नावे होती. ही नावे फुटली (किंवा फोडण्यात आली), वेबसाईटवर पडली, त्यासरशी सूत्रे हलली आणि काहींनी मध्यस्थी करून अधिकाºयांना तातडीची पत्रकार परिषद घ्यायला लावली. तेव्हा मात्र चव्हाण यांना बेहिशेबी मालमत्ता जमविण्यासाठी मदत करणाºयांत १९ न्जणांचाच समावेश असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. यात सुधाकर चव्हाण यांची पत्नी सुलेखा, सासू मनोरमा, सासरे शिवाजी सूर्यवंशी, मेव्हणा विलास सूर्यवंशी, मेव्हण्याची पत्नी संगीता सूर्यवंशी, ठेकेदार रमेश पटेल, लेखापाल मुकूल भिसे, भागीदार अमित चंडोले आणि रजनीश जैन, अरुण कांबळे, जगन्नाथ राऊत, विजयकुमार कांबळे, शिवाईनगर एकरुप सोसायटीचे पदाधिकारी पंढरीनाथ तेली, शत्रुघ्न हिंगे, संजय माने आणि प्रवीण रेडकर तसेच आशुतोष जठार आणि अ‍ॅड. पी. के. एलियस यांचा समावेश असल्याचे मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांनी सांगितले. आधी ठाणे पोलीस आयुक्तालयातून दिलेल्या प्रेसनोटबद्दल दोन्ही अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आधीच्या नावांबद्दल वारंवार प्रश्न विचारल्यावर अशी नावे नव्हतीच, या नावांची प्रेसनोट कुठून आली ते माहित नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

अधिकाºयांची झाडाझडती : आधीच्या यादीतील ३३ नावे फुटल्यावर मुंबईतील एक बिल्डर आणि पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाºयांत फोनाफोनी झाली. काही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना मध्यस्थी करण्यास, दबाव टाकण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर ही नावे वगळली गेली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण नेमकी कोणी फोनाफोनी केली आणि नावे वगळण्यास भाग पाडले, त्यासाठी वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

दाऊदचा भाऊ कासकर आणि हजारो कोटींचे व्यवहार करणारा ड्रग तस्कर विकी गोस्वामींच्या साथीदारांच्या मुसक्या आवळून देश- विदेशात नावलौकिक मिळविणाºया ठाणे पोलिसांनी ही भूमिका कशामुळे घेतली, याबद्दल वेगवेगळा संशय व्यक्त केला जात होता.

अशी कोणतील नावे वगळण्यात आलेली नाहीत. यादीत १९ आरोपींंच्या नावांचा समावेश आहे. तीच माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
- मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे

Web Title: Sudhakar Chavan Property Case: SIT's gloss and suspicion cloud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.