लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कारात रंगला कलाकारांचा ‘सोहळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:03 AM2018-12-23T03:03:09+5:302018-12-23T03:04:16+5:30

महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहीतच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत.

'Souvenir of Artists' Awarded by Lokmat Ideal Entrepreneur Award | लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कारात रंगला कलाकारांचा ‘सोहळा’

लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कारात रंगला कलाकारांचा ‘सोहळा’

Next

मुंबई : महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहीतच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके रसिकांचे विविध माध्यमांतून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. आणि याच एनर्जीचा प्रत्यय लोकमत उद्योगरत्न पुरस्कारात आला. आपल्या आगामी ‘सोहळा’ सिनेमाविषयी माहिती द्यायला आणि नवउद्योजकांशी संवाद साधायला पुरस्कार सोहळ्यात ते विशेष उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासोबत सोहळा सिनेमाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरेही या वेळी उपस्थित होते.

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ‘सोहळा’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे. विभक्त कुटुंब, नातेसंबंधांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. यानिमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.
सोहळा सिनेमाविषयी माहिती दिल्यानंतर सचिन पिळगावकर आणि गजेंद्र अहिरेंनी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधला. निवेदक किरण खोत यांनी या दोघांना या वेळी बोलते केले. मराठी सिनेसृष्टीमध्ये उद्योजकांना येण्याच्या किती संधी आहेत? नेमके काय मार्ग आहेत? याविषयी दोघांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठी सिनेसृष्टी आजही लघुउद्योग आहे. बॉलिवूडइतके बजेट नाही. तरीही मराठी सिनेमा समृद्ध होतोय, उद्योजकांना मराठी सिनेमात पैसा गुंतविण्यासाठी अनेक संधी आहेत. अनेक प्रथितयश आणि नव्या दमाचे लेखक, दिग्दर्शक मराठी सिनेमांमध्ये आहेत. मराठी सिनेमांचे विषय हे वेगळे आहेत, अर्थपूर्ण आहेत. त्यामुळे उद्योगजगत आणि मराठी सिनेसृष्टी एकत्र येऊन नक्कीच अनेक सिनेमे तयार होऊ शकतात. ज्याचा आमच्यासारख्या लेखक, दिग्दर्शकांनाही फायदा होईल आणि उद्योजकांनाही एक चांगली निर्मिती केल्याचा विश्वास वाटेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी या वेळी व्यक्त केले.
गजेंद्र अहिरे या वेळी म्हणाले की, सचिन पिळगावकर गेली कित्येक वर्षे या क्षेत्रात काम करताहेत. त्यांच्यातील शिस्तप्रियता तरुण उद्योजकांनी अंगीकारली पाहिजे. सकाळी ६ चे शूट असेल तर सचिन पिळगावकर पहाटे ५.३० लाच मेकअप करून तयार राहत असत. एवढेच नव्हेतर, या सिनेमातील एक दृश्य भल्या पहाटेचे आहे. वातावरणातील निळ्या रंगात हा सिन शूट करायचा होता. पहाटे ४, ४.३० च्या दरम्यान समुद्रकिनारी निळा रंग पसरतो. केवळ १० ते १५ मिनिटेच वातावरणाचा हा आविष्कार असतो. मात्र सचिन पिळगावकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते यांनी पहाटे येऊन हे शूट पूर्ण केले. कामाप्रति असलेली ही त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. कलाकाराचे यश हे त्याच्या कामावर असलेली निष्ठा आणि त्याच्या अंगी असलेल्या शिस्तीवरच अवलंबून असते. म्हणूनच सचिन पिळगावकर आजही मराठी रसिकांसाठी प्रिय आहेत. असेच प्रेम जर तुम्ही तुमच्या कामात ठेवलेत तर यश तुमच्यापासून लांब नाही, असे गजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

Web Title: 'Souvenir of Artists' Awarded by Lokmat Ideal Entrepreneur Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.