राष्ट्रवादीच्या ‘दुबार’ मतपेढीला शिवसेनेचा सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:26 PM2018-10-26T23:26:12+5:302018-10-26T23:26:15+5:30

राष्ट्रवादीचा नवी मुंबईतील बालेकिल्ला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली

Shivsena's split to NCP's 'Dubar' Vote Bank | राष्ट्रवादीच्या ‘दुबार’ मतपेढीला शिवसेनेचा सुरुंग

राष्ट्रवादीच्या ‘दुबार’ मतपेढीला शिवसेनेचा सुरुंग

Next

- नारायण जाधव 
ठाणे : राष्ट्रवादीचा नवी मुंबईतील बालेकिल्ला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली असून तळागाळातील पक्षाच्या बांधणीबरोबरच शहरातील राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या प्रभागांना दुबार मतदारांच्या नावाखाली लक्ष्य केले आहे. शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांतील तब्बल ७३ हजार १७० मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीला घेरण्याकरिता जैन, मारवाडी, मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे ओढण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.
मोदीलाटेतही स्वबळावर नवी मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचा करिष्मा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी करून दाखवला होता. त्याला नाईक यांची सर्वधर्मीय आणि सर्वपंथीयांतील ऊठबस आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमा कारणीभूत ठरली होती. विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातील निसटत्या पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी महापालिकेत काँगे्रसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जयंत पाटील यांना सांगलीत जे जमले नाही, ते नाईक यांनी नवी मुंबईत करून दाखवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते शांत असल्याचे पाहून माजी आयएएस अधिकारी तथा शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी पक्षाच्या उभारणीवर भर दिला आहे. पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना मुख्य प्रवाहापासून चारहात लांब ठेवून नव्या दमाचे कार्यकर्ते आणि जुन्या नेत्यांना मानसन्मान देऊन पक्षाची फेरबांधणी सुरू केली आहे. यात मराठी आणि हिंदू व्होटबँकेचे राजकारण करताना शहरातील जैन, मारवाडी, मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना खासदार राजन विचारे यांची चांगली साथ मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीसमर्थक बिल्डर, व्यावसायिक, व्यापारी यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शिवसेनेकडे आणण्याचा प्रयत्न नाहटा आणि त्यांच्या शिलेदारांनी चालवला आहे. पक्षाचे नवी मुंबईतील प्रमुख विजय चौगुले हे शहरात निष्क्रिय असल्याचे नाहटा यांच्या पथ्यावर पडले असून विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, एम.के. मढवी, किशोर पाटकर यासारखे नवेजुने चेहरे सोबत घेऊन त्यांनी पक्षबांधणीवर भर दिला आहे.
>कार्यकर्ते फोडण्यावर भर
नवी मुंबईतील शहरी भागात मोदीलाटेमुळे भाजपा वाढल्याचा भास होत असला, तरी आमदार मंदा म्हात्रेवगळता पक्षाकडे जनाधार असलेला एकही नेता नाही. पक्षाचे शहराध्यक्ष रामचंद्र घरत यांचे आपल्या गावात फारसे वजन नाही. शहरी मतदारांना त्यांची ओळख नाही. कार्यकर्त्यांचा अभाव आहे. त्याउलट, शिवसेनेने गल्लीबोळात पदे वाटून त्यांच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचे, त्या माध्यमातून राष्ट्रवादी, काँगे्रस आणि भाजपा कार्यकर्त्यांना फोडण्याचे सत्र चालवले आहे. यासाठी त्यांना विविध पदांचे, कंत्राटांचे आमिष दाखवले जात आहे. झोपडपट्टी विभागात हे प्रमाण जास्त आहे. यासाठी मुस्लिम नेते आणि त्यांचे जवळचे बिल्डर रसद पुरवत आहेत. कारण, झोपडपट्टीतील मतदार राष्ट्रवादीचे पूर्वापार मतदार आहेत. त्यांना फोडण्याचा प्रयत्न पदे वाटलेल्या गल्लीबोळांतील शिवसैनिकांकडून चालवला आहे.
>दुबार मतदारांच्या नावाखाली
बालेकिल्ला छेदणार
मतदारयाद्यांची कशी छाननी करतात, दुबार मतदारांना कसे शोधायचे, याचा मोठा अनुभव कोकण विभागाचे माजी आयुक्त असलेल्या विजय नाहटा यांना आहे. त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील एक लाख ५६ हजार ७७१ दुबार मतदार शोधले असले, तरी त्यात एकट्या नवी मुंबईतील ७३ हजार १७० मतदार आहेत. यात ऐरोलीतील ४१ हजार ७११ आणि बेलापूरमधील ३१ हजार ४५९ मतदारांचा समावेश आहे. यातील बहुतांश मतदार राष्ट्रवादी व भाजपा समर्थक असल्याचे सांगण्यात येत असून या एकाच दगडात नाहटा यांनी दोन पक्षी मारण्याचा डाव आखला आहे. मात्र, त्यांच्या आक्षेपाबाबत राष्ट्रवादी व भाजपाने मिठाची गुळणी घेतली आहे.

Web Title: Shivsena's split to NCP's 'Dubar' Vote Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.