पक्षप्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यांमुळे शिवसेनेत संभ्रम! अजित पवारांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:22 AM2018-12-28T04:22:29+5:302018-12-28T04:22:41+5:30

एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे दिसते,

Shivsena's confusion caused by party's 'those' statements Ajit Pawar made criticism | पक्षप्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यांमुळे शिवसेनेत संभ्रम! अजित पवारांनी केली टीका

पक्षप्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यांमुळे शिवसेनेत संभ्रम! अजित पवारांनी केली टीका

Next

डोंबिवली : एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.
एका खाजगी कार्यक्रमानिमित्त पवार डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘साडेचार वर्षे शिवसेना आणि भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. असे असतानाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून एखाद्या विरोधी पक्षाप्रमाणे वक्तव्ये केली जात आहेत. हे हास्यास्पद आहे. सध्याच्या आणीबाणीपेक्षाही भयंकर अवस्थेला भाजपासह शिवसेनाही तितकीच कारणीभूत आहे. नोटाबंदीमुळे कोणाचे भले झाले, हे त्यांना सांगता आलेले नाही. दहशतवादी, देशद्रोही आणि नक्षलवादी कारवायांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लॅपटॉप आणि मोबाइलवर ‘वॉच’ ठेवून लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचे धंदे सरकारने चालू केले आहेत.’
‘अठरापगड जातींच्या आणि विविध धर्मांच्या या देशात हनुमान कोणत्या जातीचा, याला जास्त महत्त्व दिले जात आहे. यांना गोत्र काढण्याचा अधिकार कोणी दिला? प्रभू रामचंद्र, राम मंदिराचा मुद्दा आळवला जाऊ लागला की, समजायचे निवडणुका जवळ आल्या आहेत. साडेचार वर्षांत राम मंदिराचा मुद्दा का आठवला नाही’, अशा शब्दांत पवार यांनी युतीचा समाचार घेतला.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आम्ही समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय. सध्याची परिस्थिती पाहता लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित लागतील, अशीही शंका उपस्थित होत आहे. आम्ही निवडणुकीत केवळ मते मागत नाही, तर समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करतो. पण, सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली. जेथे आमची सत्ता होती, तेथील महापालिका क्षेत्रांचा विकास आम्ही केला. परंतु, २२ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या युतीने कल्याण-डोंबिवलीत ठोस अशी विकासकामे झालेली नाहीत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खा. आनंद परांजपे, आ. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते. तर कार्यक्रमाप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, प्रदेश महासचिव सुभाष पिसाळ आदी उपस्थित होते.

१० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनयात्रा
आम्ही १० जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा सुरू करत आहोत. कोकणातून या यात्रेला सुरुवात होईल. महाडला चवदार तळ्याच्या ठिकाणी पहिली सभा होईल.
या सरकारच्या अपयशाचे पाढे या यात्रेच्या निमित्ताने वाचणार आहोत. हे सरकार शहरी आणि ग्रामीण भागाला, कामगारांना, शेतकºयांना न्याय देऊ शकलेले नाही. समाजातील एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे देशात ८ व ९ जानेवारीला कामगारसंघटनांनी बंद पुकारला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

लोकलमधून प्रवास
डोंबिवलीत खाजगी कार्यक्रमास येताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पवार आणि पाटील यांनी दुपारी ३.३० च्या कसारा लोकलमधून प्रवास केला. दुपारी ४.४० वाजता ते डोंबिवली स्थानकात पोहोचले. प्रवासात प्रवाशांनी अनेक तक्रारी आणि समस्या मांडल्याचे पवार म्हणाले.

नरेंद्र पाटलांना सुनावले खडेबोल
मुख्यमंत्र्यांच्या पुढे झुकून दबून राहण्याची गरज नाही. माथाडींचा नेता हा स्वयंभू असला पाहिजे. तुम्ही जर वाकायला, झुकायला आणि टेकवायला लागतात, तर माथाडींना आणि मला पण ते आवडणार नाही, असे खडेबोल अजित पवार यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना सुनावले.

काही महिन्यांपूर्वी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहानुसार भाजपाच्या कोट्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या माथाडी कामगारांसमोरच पाटील यांना पवारांनी खडेबोल सुनावले.

Web Title: Shivsena's confusion caused by party's 'those' statements Ajit Pawar made criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.