मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 01:59 PM2017-10-02T13:59:51+5:302017-10-02T14:01:02+5:30

सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले.

Shiv Sena's movement to remove hawkers in Mira Road-Bhayander railway station | मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

googlenewsNext

मीरा रोड - सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुण लागल्याने मीरा रोड स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसला नव्हता. एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांचे अरुंद जिने व प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर फेरीवाले आदींचे अतिक्रमण आदी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मनसेने शनिवारी मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले, बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी दोन्ही स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बलास निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. 

तर  सोमवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात भाईंदर व मीरारोड रेल्वे स्थानक आणि परिसरात फेरीवाले हटवण्यासाठी आंदोलन केले. रेल्वे प्रवाशांची सोय व सुरक्षिततेसाठी येण्याजाण्याचे मार्ग मोकळे करा, अशी मागणी सरनाईक यांनी केली.  यावेळी नगरसेविका नीलम ढवण, तारा घरत, अर्चना कदम, शर्मिला बगाजी, एलायस बांड्या, उपजिल्हा प्रमुख शंकर वीरकर, स्नेहल सावंत, शहर प्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालांडे, प्रकाश मांजरेकर, सुप्रिया घोसाळकर, शैलेश पांडे, नंदकुमार पाटील, माजी नगरसेविका सुमन कोठारी आदीं सह शिवसैनिक उपस्थित होते.

भाईंदर रेल्वेस्थानकात शिवसैनिक बॅनर, झेंडे घेऊन घोषणा देत शिरले असता रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याने विरोध केला. त्यामुळे अधिकारी व आमदार सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक झडली. शिवसेनेच्या आंदोलनाचा फलक लागलेला असल्याने एरव्ही मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात व पादचारी पूलांवर बेधडक बस्तान मांडून बसणारे फेरीवाले गायब झाले होते. त्यामुळे प्रवाशांनीदेखील समाधान व्यक्त केले. शिवसेनेच्या आंदोलनामुळे रेल्वे पोलीस, नयानगर पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सकाळपासूनच तैनात होते.

यावेळी दोन्ही स्थानकांचे स्टेशन मास्तर व सुरक्षा बलाचे अधिकारी यांना भेटून पादचारी पूल व परिसरातील फेरीवाले यांना हटवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रवाशांनीदेखील आपली गाऱ्हाणी मांडली व फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या जाचाचा पाढा वाचला. तर काही फेरीवाल्यांनी रेल्वे सुरक्षा बलचे जवान आणि पालिका कर्मचारी हप्ते घेत असल्याचे सांगितले. मीरा रोड स्थानक व परिसरातील फेरीवाल्यांची समस्या गंभीर असल्याने शिवसैनिक स्वतः गस्त घालतील. फेरीवाल्यांना बसू देणार नाही. रेल्वे व पालिकेने ठोस कारवाई नाही केली तर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणी सह सेने च्या पद्धतीने धडा शिकवू असे आमदार सरनाईक म्हणालेत.


 

Web Title: Shiv Sena's movement to remove hawkers in Mira Road-Bhayander railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.