"सध्याचा काळ हा भाषेच्या अभद्रीकरणाचा"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:23 AM2019-01-24T01:23:38+5:302019-01-24T01:23:45+5:30

भाषेच्या अभद्रीकरणाचा सध्याचा काळ आहे. ना धड मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी बोलली जात आहे.

"The present period is the language of non-acceptance of language" | "सध्याचा काळ हा भाषेच्या अभद्रीकरणाचा"

"सध्याचा काळ हा भाषेच्या अभद्रीकरणाचा"

Next

ठाणे : भाषेच्या अभद्रीकरणाचा सध्याचा काळ आहे. ना धड मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी बोलली जात आहे. या भाषा अभद्रीकरणाच्या काळात राम गणेश गडकरींचे साहित्य नव्या पिढीने वाचले, तर मराठी सुधारण्यास सुरुवात होईल. कोणती तरी एक भाषा नीट बोला. भाषा नीट नसल्याने काचेच्या पडद्यावर वाचतात, पण काळजाचा पडदा रिकामा राहतो. गडकरींचे समग्र वाड्.मय कोहिनूर हिऱ्यासारखे आहे. पुढचा काळ तरुण पिढीने हा कोहिनूर शोधण्यात घालवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.
अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थेतर्फे आयोजित भाषाप्रभू कै. राम गणेश गडकरी स्मृती शताब्दी सांगता समारंभ बुधवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी प्रा. दवणे बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक श्वास ज्यांचा शब्द झाला आणि प्रत्येक शब्द ज्यांचा श्वास झाला, असे राम गणेश गडकरी होत. ३४ वर्षांच्या आयुष्यात गडकरी ३३४ वर्षे आयुष्य जगले. त्यांना ‘राजहंस’ म्हटले, ते सर्वार्थाने योग्य आहे. समग्र आयुष्यात त्यांनी एकाकीपणा, मानहानी सहन केली. ते सहन करताकरता त्यांनी भावबंधन लिहिले आणि आपले प्राण सोडले. गडकरी यांच्या हृदयात लोकमान्य टिळक, मेंदूत गोपाळ गणेश आगरकर होते. शतकानुशतकांच्या शोषणाला प्रश्न विचारणारी, येणाºया शतकाला सामोरी जाणारी गडकरींची ‘एकच प्याला’मधील गीता मला मोलाची वाटते. कारण, ती विद्रोहाची ठिणगी टाकणारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रा. दवणे, डॉ. अनंत देशमुख, डॉ. प्रतिभा कणेकर, प्रा.डॉ. सुरेखा सबनीस लिखित ‘राम गणेश गडकरी... एक राजहंस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बडोद्याच्या आमदार सीमा मोहिले, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य, सचिव संजय दिघे उपस्थित होते.
पुस्तकामागची पार्श्वभूमी सांगताना डॉ. देशमुख म्हणाले की, या पुस्तकातील लेखन हे अत्याधुनिक पद्धतीने झाले आहे. नाटक आणि रंगभूमीचा, कवितेचा, मराठी विनोदी लेखनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ज्यांचे गडकरींवर प्रेम आहे, त्यांना हे पुस्तक संग्रही असावे, असे वाटेल. आ. मोहिले यांनी मायबोली आत्मसात करण्यासाठी साहित्य वाचणे आवश्यक आहे. माझी जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी गुजरात झाली. गडकरी हे मोठे साहित्यकार होते. मान्यवर नाटककारांच्या नाट्यसंपदेवर आधारित ‘नाट्य व संगीत’ यांची सांगड घालणारा अनोखा कार्यक्रम पार पडला.
>अचूक टायमिंग साधणे हेच बाळासाहेबांचे वैशिष्ट्य : प्रधान
बाळासाहेब ठाकरे यांची नव्याने ओळख या विषयावर बोलताना संदीप प्रधान यांनी त्यांच्या आठवणी उलगडल्या. ते म्हणाले की, बाळासाहेब रोखठोक राजकारणी होते. ते अचूक टायमिंग साधणारे नेते होते. बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली असेल, तर मला अभिमान आहे, असे उद्गार बाळासाहेबांनी काढल्यामुळे आजही राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेला आक्रमक भूमिका घेणे शक्य झाले. त्यांच्या अचूक निर्णयाचा शिवसेनेला आजही लाभ होत आहे. ८० टक्के समाजकारणामुळे शिवसेना ही आजही तळागाळात रुजलेली आहे.

Web Title: "The present period is the language of non-acceptance of language"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.