स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 03:37 PM2017-12-12T15:37:49+5:302017-12-12T15:38:20+5:30

अर्थात काळ्या दम्याच्या श्‍वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गरोदर महिलांना पडत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी नोंदवले आहे. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली, असे त्या म्हणाल्या.

Pregnant women can breathe out due to smog | स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

Next

धीरज परब
 मीरा रोड : सध्या मुंबई, ठाण्यासह परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याचे साम्राज्य पसरत आहे. परंतु या धुक्यामध्ये वाहनांचा धूर मिसळत असल्याने क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) अर्थात काळ्या दम्याच्या श्‍वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गरोदर महिलांना पडत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी नोंदवले आहे. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली, असे त्या म्हणाल्या.

मुंबई व लगतच्या उपनगरांत दोन आठवडाभरापूर्वी उच्चांक गाठणारा ३० ते ३५ अंशावरील तापमानाचा पारा आता २० ते २२ अंशावर आला असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. उत्तर-पूर्वेकडून थंड हवा आणि पश्‍चिमेकडून येणारी उबदार हवा यांच्या मिश्रणामुळे धुक्याचं सावट निर्माण होत आहे. थंडीत पडणारे धुके हे नैसर्गिक आहे. परंतु दिवसरात्र शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरांना जोडणारे रस्ते अक्षरश: हजारो वाहने ये जा करीत असल्यामुळे वाहनातून निघणारा धूर या धुक्यात मिसळल्यामुळे 'स्मॉग' तयार होत असून, याचा गंभीर परिणाम गरोदर मातांवर होत असून जन्मजात बालकांनाही याचा त्रास होऊ शकतो.

गरोदर मातांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना थंडीमध्ये वारंवार सर्दी, पडसे, खोकला, ताप व कीटकांपासून होणाऱ्या आजारांची लागण लगेच होऊ शकते. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली असून, ही संख्या भविष्यात वाढेल. सध्या मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या स्मॉगमुळे गरोदर महिलांमध्ये धाप लागणे, छातीत जळजळ होणे तसेच न्युमोनियाची लागण होऊ शकते व अशा प्रकारच्या पेशंटची संख्या आजमितीला वाढत आहे. वातावरणात असलेला हा स्मॉग श्वसन मार्ग, सायनस आणि अनुनासिक पोकळी उपनिर्मित करतो व त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये रोगजन्य जीवाणू पसरू शकतात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हे जीवाणू श्वसनमार्गे पसरतात.

अशा स्थितीमध्ये गरोदर महिलांना जास्त ताकदीची औषधेसुद्धा देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार "आजीबाईच्या बटव्यामधील" औषधे वापरण्यास काहीच हरकत नाही. गरोदर महिलांची नॉर्मल प्रसूती होण्यासाठी त्यांना मोकळ्या हवेत चालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सध्याची दूषित वातावरणाची परिस्थिती पाहता त्यांनी घरातल्या घरातच चालणे फायद्याचे ठरेल."

सध्या होत असलेल्या स्मॉग प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेला पहिला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. या स्मॉगमुळे रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते व त्या सुजतात. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात. त्यामुळे हृदयरोगी रुग्णांनी तसेच गरोदर मातांनी सध्याच्या प्रदूषित वातावरणात काळजी घ्यावी, असे मत हृदय शल्यविशारद डॉ. पवन कुमार यांनी व्यक्त केले.

मुंबई व ठाणे अशा मोठ्या शहरातले हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना अंमलात आणायला हवी. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अधिक सुलभ करणे. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच अधिक धूर सोडणार्‍या वाहनांना शहरात बंदी अशा उपाययोजना अंमलात आणायला हव्यात, असे मत डॉ. गंधाली देवरुखकर यांनी मांडले आहे. अन्यथा आपल्याकडे देखील दिल्लीसारखी भयावह स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Pregnant women can breathe out due to smog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.