इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:30 AM2019-04-23T02:30:14+5:302019-04-23T02:30:27+5:30

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Pollution plant in ecological zone | इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट

इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट

Next

- धीरज परब

मीरा रोड : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ तसेच इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये सर्रास प्रदूषणकारी अनेक आरएमसी प्लान्ट सुरू असल्याने वन्यजीव, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु, वनविभागासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या आरएमसी प्लान्टवर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालण्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चेणेगाव हे पूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येते. तसे असताना येथे सर्रास दोन आरएमसी प्लान्ट चेणे नदीकिनारी सुरू आहे. वरसावेही इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असताना येथेही प्लान्ट चालवला जातो. घोडबंदर गावाजवळ तर एका ओळीने प्रदूषणकारी आरएमसी प्लान्ट सुरू आहेत. महापालिकेच्या प्रभाग १३ व १४ मध्ये सुरू असलेल्या या ८ ते १० आरएमसी प्लान्टमुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट, रासायनिक पावडर, खडी आदींचे कण हवेत मिसळतात. रस्त्यापासून घरांमधील भांड्यांवर सतत या कणांचा थर साचत असतो. श्वास घेण्यासही अनेकांना त्रास होतो. श्वसनाबरोबरच खाण्यातूनही कण शरीरात जातात.

मानवी आरोग्याला घातक अशा सततच्या या कणांमुळे नागरिकांमध्ये दमा, खोकला आदी विकार बळावू लागले आहेत. रस्त्यांवर तर वाहनांच्या येजामुळे हवेत पांढरा थर दिसून येतो. नवजात बालक, लहान मुले, वृद्ध, रुग्ण तसेच महिलांना तर खूपच त्रास होत असतो.
या प्लान्टमुळे मानवी आरोग्यासह वन्यजीव व पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. बक्कळ कमाई असलेल्या प्रदूषणकारी आरएमसी प्लान्टची काटेकोर तपासणी केली जात नाही. कारवाईची जबाबदारी ही वनविभागासह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाची असताना त्यांच्याकडून या प्लान्टना पाठीशी घातले जाते. या भागातील ८ ते १० प्लान्टना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आणखी दोन नोटिसा बजावल्या जाणार आहेत. सनियंत्रण समितीने प्रस्ताव फेटाळले, तर नाहरकत न देता प्लान्टवर कारवाई करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.

वनविभागाकडून नाहरकत आल्यानंतर मंडळाकडून परवानगी दिली जाते. चेणे येथील दोन प्लान्टची पाहणी केली असता वनविभागाची नाहरकत त्यांनी दाखवली. पण, आवश्यक बाबींची पूर्तता नसल्याने त्यांना कळवले आहे. घोडबंदर येथील एका प्लान्टला नोटीस बजावली आहे. निवडणुकीनंतर पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. - सुवर्णा गायकवाड, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आरएमसी प्लान्ट हे हरित क्षेत्रात मोडत असल्याने चालवता येतात. त्यांना परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घ्यायचा आहे.

- दिनेश सिंग, सहायक वनसंरक्षक
नियमांचे उल्लंघन करून चालणाऱ्या प्रदूषणकारी बेकायदा आरएमसी प्लान्टमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाळीव जनावरे, वन्यजीव तसेच पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. परंतु, यंत्रणा कारवाईस टाळाटाळ करत आहेत. हे सर्व प्लान्ट बंद करून पाडून टाकावेत व त्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करावा. बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. - निलेश फापाळे, तक्रारदार

Web Title: Pollution plant in ecological zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.