पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 11:55 AM2024-03-03T11:55:05+5:302024-03-03T11:56:10+5:30

प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

PL and VP's books were not printed, so I was not at a loss; interview with Ramdas Bhatkal at Sahitya Award ceremony | पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

ठाणे : विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, दुर्गा भागवत, धर्मकीर्ती सुमंत यासारख्या मोठ्या लेखकांचे लेखन मला जसे आवडले, तसे मला पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे लेखन आवडले नसेल. सगळे चांगले ते मीच प्रकाशित केले पाहिजे, असा माझा कधी आग्रह नव्हता. त्यांची पुस्तके छापली नाहीत म्हणून माझे काही फार नुकसानही झाले नाही, असे सांगत ज्येष्ठ प्रकाशक, लेखक, विचारवंत रामदास भटकळ यांनी पु. लं. आणि व. पु. यांची पुस्तके न छापण्यामागचे कारण विषद केले. निमित्त होते ‘लोकमत’ साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित त्यांच्या प्रकट मुलाखतीचे. प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

नेमाडेंपासून ग्रेसपर्यंत मोठमोठ्या लेखकांची पुस्तके तुम्ही छापलीत, पण पु. ल., व. पु. यांची पुस्तके का छापावीशी वाटली नाहीत? असा प्रश्न किशोर कदम यांनी करताच, भटकळ उत्तरले, ‘सगळे चांगले ते मीच केले पाहिजे, असा माझा कधीच आग्रह नव्हता. पु. लं.शी एक-दोनदा संबंध आला, मात्र पुढे काही कारणांनी त्यांनी त्यांची पुस्तके आम्हाला दिली नाहीत, परंतु मला कुणाबद्दल तसे काही बोलायचे नाही. अर्थात, त्यामुळे माझे काही फार नुकसान झाले नाही. प्रकाशकाने एका लेखकाची सगळी पुस्तके केली पाहिजेत, पण तसे ते अशक्य असते. तरीही कमी लिहिणाऱ्यांची पुस्तके एकाच प्रकाशकाने करावीत,’ असे माझे मत आहे.

‘ग्रंथाली’शी खोटं बोललो, किशोर कदम यांची कबुली
किशोरच्या कविता जेव्हा ऐकल्या, तेव्हा मी धुंदीत गेलो. तेव्हा मी निवृत्त झालो होतो, पण मला त्याचे पुस्तक करायचेच होते, असे भटकळ यांनी म्हणताच, किशोर कदम यांनी एक मोठी कबुलीच जाहीरपणे दिली. ते म्हणाले, ‘खरंतर मी माझे पुस्तक ग्रंथालीला दिले होते, पण भटकळ साहेबांच्या प्रेमळ दबावामुळे मी ग्रंथालीशी खोटे बोलून ते पुस्तक परत घेतले आणि पॉप्युलरला दिले.’ त्यावर भटकळ त्वरित मिश्कीलपणे म्हणाले, ‘कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक ही ओळख नकोय मला...’

बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नका
निवृत्त झाल्यावर गाणं शिकावंसं वाटलं, असं का? असा प्रश्न करताच भटकळ म्हणाले, ‘शाळेत असतानाही मी गाणं शिकत होतो, पण नंतर नंतर ते मागे पडलं. मुलं मोठी होत होती. मला जमलं नाही. मुलांनी तरी गाणं शिकावं, असं वाटत होतं.’ सत्यजीत सतार शिकत होता. तेव्हा तो मला म्हणाला, ‘बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नका...’ एरव्ही बाप मुलाला सांगतो, पण इथे मुलाने बापाला सांगितलं होतं. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा सुरुवात केली, तेव्हा मी ४५ वर्षांचा होतो.

असे भेटले ग्रेस आणि ना. धों. महानोर 
‘नवे कवी नवी कविता’ याची सुरुवात कशी झाली, हे सांगताना भटकळ यांनी कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांची पुस्तके कशी प्रकाशित केली, त्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, ग्रेस, महानोर यांची पुस्तके प्रकाशित केली, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नव्हतो. 

ग्रेस यांची कविता मी छंदमध्ये वाचली. त्यांच्या दहा-पंधरा कविता एकत्र छापल्या होत्या. त्यावेळेस ग्रेस हे बाई की बुवा यातही वाद होते.  

‘नवे कवी नवी कविता’ ही जर मालिका केली तर खूप चांगले होईल, असे वाटू लागले. त्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली. त्यात वा. ल. कुलकर्णी, मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै होते. त्यांनीसुद्धा ग्रेस यांचेच नाव सांगितले. पुढे वा. ल. यांचे एक दिवस मला पोस्टकार्ड आले, ‘अरे, ना. धों. महानोर नावाचा एक नवीन मुलगा आहे. तू ताबडतोब त्यांना पत्र लिही. तसा तुम्हाला पुस्तक काढायला वेळ लागतो, पण याला वेळ न लावता त्याचे पुस्तक काढा.’ मग आम्ही लगेच ग्रेस आणि महानोर यांची पुस्तके ‘नवे कवी नवी कविता’ एक आणि दोन म्हणून प्रकाशित केली व त्यांची भेट ही पुष्कळ नंतर झाली.
 

Web Title: PL and VP's books were not printed, so I was not at a loss; interview with Ramdas Bhatkal at Sahitya Award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.