खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा खोदकाम, आॅप्टीकल केबलसाठी रिलायन्स ‘जिओ’ला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:15 AM2017-12-27T03:15:54+5:302017-12-27T03:16:01+5:30

कल्याण : केडीएमसी हद्दीत खड्डे बुजवण्याचे काम निविदेतील निकषांप्रमाणे झालेले नाही. तसेच ते निकृष्ट झाले आहे.

Permission of Reliance 'Zio' for excavation, after re-excavation of potholes | खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा खोदकाम, आॅप्टीकल केबलसाठी रिलायन्स ‘जिओ’ला परवानगी

खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा खोदकाम, आॅप्टीकल केबलसाठी रिलायन्स ‘जिओ’ला परवानगी

Next

मुरलीधर भवार 
कल्याण : केडीएमसी हद्दीत खड्डे बुजवण्याचे काम निविदेतील निकषांप्रमाणे झालेले नाही. तसेच ते निकृष्ट झाले आहे. त्यामुळे हे काम झाकण्यासाठी पुन्हा रिलायन्स जिओ कंपनीला आॅप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी देण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. यावरून महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
कल्याण पूर्वेतील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नसल्याने सप्टेंबर २०१७ मध्ये सामाजिक कार्यकर्ते विनोद सिंग यांनी महापालिका प्रशासनाविरोधात सोशल मीडियावर मोहीम उघडली. तसेच स्वाक्षरी मोहीम राबवली होती. परंतु, प्रशासनाने दाद न दिल्याने सिंग यांनी प्रत्येक खड्ड्याला नंबर टाकून चिंचपाडा ते काटेमानिवली चौकापर्यंत ३५० खड्ड्यांची मोजणी केली होती. सिंग यांनी खड्ड्यांबाबत माहितीच्या अधिकारात प्रशासनाकडून माहिती मागवली. तेव्हा प्रशासनाने त्यांना माहिती दिली. महापालिकेच्या १० प्रभागांतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ई-टेंडर काढले होते. त्याला स्थायी समितीने जूनमध्ये मंजुरी दिली. १० प्रभाग क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी ११ कंत्राटदारांना विभागून काम दिले गेले. ११ कोटी ९१ लाख रुपये खर्चाचे हे काम होते. कामाचा तपशीलही त्यांनी मागितला होता. ज्या रस्त्यावर खड्डे बुजवयाचे आहे, तेथे आधी कधी, केव्हा काम केले आहे, याचा तपशील जोडणे आवश्यक होते. प्रत्येक रस्त्याच्या कामाची नोंदच महापालिकेकडे नाही. खड्डा बुजवण्यासाठी तो आधी जेसीबीने खोदणे, त्यावर खडीकरण केल्यानंतर त्यावर सीलकोट करून रोडरोलर फिरवणे अपेक्षित आहे. कामाचे स्वरूप त्यात नमूद केले आहे. त्यानुसार, रस्ते बुजवण्याचे काम झाले नसल्याचे सिंग यांनी सांगितले. कल्याण पूर्वेतील ५० टक्केच खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. प्रत्यक्षात हा दावा केवळ कल्याण पूर्वेतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यापुरताच मर्यादित आहे. कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि २७ गावांतील खड्डे बुजवण्याचा कोणताच तपशील उपलब्ध झालेला नाही. तेथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, याकडे सिंग यांनी लक्ष वेधले आहे.
महापालिकेने आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले होते. त्याविषयी नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने पावसाळ्यातील खड्डे बुजवण्याचे काम आयुक्तांनी स्थगित केले होते. पावसाळ्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले.
मात्र, ते निकषानुसार झालेले नसल्याने खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड होते. याविषयी बांधकाम विभागाचे अभियंते रघुवीर शेळके यांना सिंग यांनी वारंवार मेसेज पाठवूनही त्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. कामाच्या ठिकाणी सुपरवायझर नसतात. निकृष्ट कामाचे नमुने गोळा करून त्यांचे गुणनियंत्रण करण्याचे काम महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाचे आहे. मात्र, असे आवश्यक असताना तक्रार करण्यासाठी गेलेल्या सिंग यांना नमुने तपासणीसाठी एक हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. सिंग यांनी ते शुल्क भरले असून त्याचा अहवाल सिंग यांना मिळणे अपेक्षित आहे.
दरम्यान, गुणात्मक दर्जा राखला जाऊन खड्डे बुजवण्याचे काम झाले आहे का, याची शहानिशा करूनच संबंधित कंत्राटदाराला त्याचे बिल देण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. दक्षता गुणनियंत्रण व थर्ड पार्टी आॅडिटशिवाय दोन कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी दोन कार्यकारी अभियंते नेमले आहेत. एकाही कंत्राटदाराला कामाचे बिल अद्याप देण्यात आलेले नाही. त्यांचे थर्डी पार्टी आॅडिट झाल्याशिवाय त्यांना बिले दिली जाणार नाही, असे अधिकारीवर्गाकडून सांगण्यात आले. महापालिका हद्दीतील ८० टक्के खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
>टिटवाळ्यापर्यंत खोदणार खड्डे
निकृष्ट दर्जाचे काम लपवण्यासाठी महापालिकेने थातूरमातूर काम करून खड्डे बुजवले. त्यानंतर, रिलायन्स जिओ कंपनीला आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मंजुरी दिली. महापालिकेने खड्डे खोदण्यासाठी ‘रिलायन्स जिओ’कडून खड्डा फीच्या बदल्यात पाच कोटी १४ लाख रुपये फी वसूल केली आहे. कल्याण, डोंबिवली व पार टिटवाळ्यापर्यंत कंपनी सात हजार २११ मीटर रस्त्यावर खड्डे खोदणार आहे.

Web Title: Permission of Reliance 'Zio' for excavation, after re-excavation of potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.