ठाण्यात प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:36 AM2019-05-27T01:36:40+5:302019-05-27T01:36:46+5:30

ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत पुलांची कामे सुरू असल्याने प्रवाशांना रोजची डोकेदुखी ठरली आहे.

Passengers are required to travel to the station in Thane | ठाण्यात प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत

ठाण्यात प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत

Next

ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत पुलांची कामे सुरू असल्याने प्रवाशांना रोजची डोकेदुखी ठरली आहे. कुठे पुलांच्या पायऱ्यांचे काम सुरू आहे, तर कुठे छताचे. यासाठी लागणारे साहित्य काही ठिकाणी फलाटावर ठेवले जात असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोपर रेल्वे स्थानकात दिव्याच्या दिशेकडे पादचारी पूलच नसल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत. या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. तर महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकात रेल्वेने फलाट १ आणि २ ला जोडणारा पूल पाडण्याचे काम हाती घेतले आहे. ही कामे भविष्यात प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहेत. त्यामुळे हा त्रास त्यांना काही दिवस सहन करावा लागणार आहे.
ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात मागील चार ते पाच महिन्यांपासून जुने पत्रे बदलून नवीन टाकणे तसेच जुना पुलाच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. त्यातच, या महिन्यात जीना उभारण्याचेही काम हाती घेतले आहे. ही कामे फलाट क्रमांक १ ते १० अशा सर्व ठिकाणी सुरू आहेत. यामुळे ठाण्यातून प्रवास करणाºया प्रवाशांना गर्दीबरोबर या कामांमुळे नाहक तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर रेल्वे प्रशासनाने ही कामे प्रवाशांच्या सोयींसाठी सुरू असून ती कामे जितक्या लवकर करता येतील तितक्या लवकर पूर्ण केली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि ट्रान्स हार्बर तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. त्यातच,दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७८२ लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ तसेच ८० अप आणि ७० डाऊन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून रोज साडेतीन लाख लोकलच्या तिकिटांची विक्री होते. या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास करणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये-जा करतात. त्यातच, ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वात व्यस्त रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. त्यातच, ठाणे रेल्वे स्थानकात होणारी वाढती गर्दी पाहता जुन्या दोन पुलांसह नव्याने तीन पादचारी पूल उभारण्यात आल्याने ही संख्या पाचवर गेली आहे. त्यातील कल्याणकडील जुन्या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम ६० दिवसांत पूर्ण केले जाईल असे म्हटले होते. मात्र, दुरूस्तीच्या कामांसाठी फलाट क्रमांक २ ते ३-४ आणि पाच आणि ६ अशी कामे उशिरा पण एकाचवेळी सुरू झाली. मात्र काही काही दिवसात काम बंद झाले. त्याची मुदत संपल्यावर हा पूल नव्याने उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने आता घेतल्याने तीन महिन्यांपासून सुरू असलेला त्रास हा पावसाळ्यातही तसाच राहणार आहे. मुंबईच्या दिशेकडे असलेला पालिकेचा पादचारीही पूल गुरूवारपासून बंद केला जाईल. त्यामुळे ३ व ४ आणि ५ व ६ या फलाटाला जोडल्याने या पुलामुळे प्रवाशांना त्रास होणार आहे.
मध्यंतरी कल्याण आणि मुंबईच्या दिशेकडे पादचारी पुलांचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेतले होते. त्यातच, प्रवाशांना चढ -उतरण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टचीही कामे सुरू केली होती. ती कामे पूर्ण झाल्यावर त्यासाठी काढलेल्या पत्रांच्या शेडचे काम मात्र धीम्याच गतीने सुरू आहेत. ही कामे प्रामुख्याने फलाट ३ -४, ५-६ ,७-८ आणि ९-१० या ठिकाणी सुरू आहेत. एकीकडे ज्वलनशील पदार्थ रेल्वेतून नेण्यास बंदी असताना, स्थानकांवर गॅस कटिंगचे काम सुरू आहे. तसेच फलाट क्रमांक ९-१० आणि १० ए वरही जुने पत्रे काढून नवे पत्रे टाकण्याची कामे हाती घेतली आहेत. तर पार्र्किंग प्लाझाचे काम सुरू झाल्याने तेथील जिना बंद केला आहे. त्यामुळे विशेष केस म्हणून फलाट क्रमांक एक वर सहा दिवसांपासून जीना बांधण्याचे काम सुरू केल्याने रेल्वे स्थानकातील सर्व फलाटावरील कामांमुळे
प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
>कोपर स्थानकात हवा पादचारी पूल
कोपर रेल्वे स्थानकात दिवा दिशेला पादचारी पूल नाही. त्यामुळे अनेक प्रवासी धीव धोक्यात घालून रूळ ओलांडून पूर्वेला जातात. रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. दिवा-वसई गाड्यांच्या वेळेत तेथील फलाटांकडे जाण्यासाठी कल्याण दिशेकडील पुलावर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे तेथे होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशस्त पुलाची गरज आहे. त्याकरिता तेथील पादचारी पुलाचे रूंदीकरण केले जाणार आहे. सध्या पश्चिमेला होम प्लॅटफॉर्मचे कामही सुरू आहे.
>लोकग्रामकडे जाणारा पूल बंद
मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन आणि गाड्यांची, प्रवाशांची अहोरात्र वर्दळ असलेल्या कल्याण स्थानकातील फलाट १ आणि २ ला जोडणारा जुना पूल पाडण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, फलाट २ वरील पायºया कायम आहेत. या पायऱ्यांखाली छोटेखानी कार्यालय असून, ते प्रथम हलवल्यानंतर पायºया तोडाव्या लागणार आहेत. दुसरीकडे ठाकुर्ली दिशेकडील जुन्या पादचारी पुलापासून पूर्वेला लोकग्राम संकुलाकडे जाणारा लांबलचक पादचारी पूल धोकादायक झाल्याने १८ मेच्या मध्यरात्री पूल रेल्वेने रहदारीसाठी बंद केला आहे. त्यामुळे पूर्वेतील प्रवाशांना कर्जत दिशेकडील सिद्धार्थनगर येथील स्कायवॉकवरून लोकग्राम येथे जावे लागत आहे.
>पादचारी पुलासाठी टाकला गर्डर
आंबिवली स्थानकात टिटवाळा दिशेला भारतीय सैन्य दलाने नवीन पादचारी पूल बांधला आहे. तर, शहाड येथील अतिधोकादयक पादचारी पूल १९ मे रोजी रेल्वे प्रशासनाने चार तासांचा मेगाब्लॉक घेऊन पाडला. तेथे नवीन पूल उभारण्यासाठी गर्डरही टाकण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये तेथील प्रवाशांना नवीन प्रशस्त पूल मिळणार आहे.
>पादचारी पुलाच्या कामामुळे प्रवाशांना त्रास
अंबरनाथ रेल्वे स्थानकात नव्या पादचारी पुलाचे काम सुरु केले आहे. त्यासाठी दोन्ही स्थानकांत खड्डेही खोदले आहेत. या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. भविष्यातील गैरसोय दूर करण्यासाठी या पुलाचे काम सुरू असले तरी पुलामुळे स्थानकातील काही भाग अडवण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. फलाट क्रमांक एक आणि दोन हे दोन्ही एकाच ठिकाणी असून फलाट क्रमांक ३ हा स्वतंत्र आहे. फलाट क्रमांक दोन आणि तीन यांना जोडण्यासाठी नव्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे. त्यातच हा पूल नव्याने तयार होणाºया होम प्लॅटफॉर्मलाही जोडला जाणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. या कामाचे भूमिपूजन होऊन दोन महिने उलटले असून त्या कामात हवी तशी गती नाही. त्यातच कामाच्या ठिकाणी प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी लोखंडी पत्रे मारण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी फलाटावरील जागा अडवली गेल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मुंबई दिशेकडे जाणारी लोकल पकडताना किंवा कर्जत दिशेकडील प्रवाशांनाही अडचणीच्या ठिकाणी उभे राहून लोकल पकडण्याची वेळ येते. लोकल आणि लावण्यात आलेले पत्रे यांच्यात पाच ते सहा फुटांचे अंतर आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणीत लोकल पकडावी लागते. फलाट क्रमांक तीनवरही हीच स्थिती आहे.
>रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनामार्फत प्रवाशांसाठी जी कामे हाती घेतली आहेत ती कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होणार आहेत. तसेच भविष्यात प्रवाशांना ही कामे पूर्ण झाल्यावर होणारा त्रास कमी होईल, यामध्ये शंकाच नाही.
- राजेंद्र वर्मा, डायरेक्टर, ठाणे रेल्वे स्थानक
>या कामांमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रवासी संघटनेतर्फे वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यातच,ही कामे युद्धपातळीवर पावसाळ्यापूर्वीच करण्याबाबत रेल्वे प्रशासनाला सांगितले आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे प्रवासी संघटना

Web Title: Passengers are required to travel to the station in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.