वाटाणा, वांगी, शेवगा महागला, अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:54 AM2018-11-08T02:54:17+5:302018-11-08T02:55:03+5:30

कल्याण कृषी उत्पन्न बाजारात (एपीएमसी) भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत. दिवाळीत अनेकांनी मिठाई व फराळाला प्राधान्य दिल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. पाच दिवसांपासून बाजार थंड आहे.

other vegetable prices declined | वाटाणा, वांगी, शेवगा महागला, अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले

वाटाणा, वांगी, शेवगा महागला, अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले

Next

- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण कृषी उत्पन्न बाजारात (एपीएमसी) भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले आहेत. दिवाळीत अनेकांनी मिठाई व फराळाला प्राधान्य दिल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. पाच दिवसांपासून बाजार थंड आहे. बाजारात हिरवा वाटाणा, वांगी आणि शेवग्याच्या शेंगा महाग झाल्या आहेत. दिवाळीनंतरच बाजारात तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यात हिरव्या वाटाण्याचे पीक घेण्यास हवामान अनुकूल नाही. त्यामुळे त्याचे पीक घेतले जात नाही. एरव्हीही हिरवा वाटाणा मध्य प्रदेशातून येतो. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेला हिरवा वाटाणा हा हिमाचल प्रदेशातून येत आहे. १० किलो हिरव्या वाटाण्याची गोणी घाऊक बाजारात एक हजार रुपये किमतीला विकली जात आहे. तर, किरकोळ बाजारात त्याची १६० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे आलू मटार भाजी, हिरवा वाटाण्याचा पुलाव करणे ग्राहकांच्या खिशाला परवडणारे नाही. भाज्यांमध्ये हिरवा वाटाणा हा राजा समजला जातो. बाजारात त्याला मागणी जास्त असते. त्यामुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो.

हिरव्या वाटाण्यापाठोपाठ स्वस्त असलेली वांगी सध्या महाग विकली जात आहे. किरकोळ बाजारात एक किलो वांग्याला ६० रुपये भाव मिळत आहे. तर, घाऊक बाजारात ३२ ते ४० रुपये किलोने विकली जात आहे. हवामानबदलामुळे वांग्याचा माल लगेच किडतो. त्यामुळे चांगल्या मालाला किरकोळ बाजारात ग्राहकाला किलोमागे ६० रुपयांची किंमत मोजावी लागत आहे. तसेच, शेवग्याच्या शेंगांचा भाव जास्त आहे. चेन्नई आणि हैदराबाद येथून शेवग्याच्या शेंगा विक्रीस आल्या आहेत. घाऊक बाजारात शेवग्याची शेंग ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ६० रुपये दराने विकली जात आहे.
हिरवा वाटाणा, वांगी आणि शेवग्याच्या शेंगा सोडल्या, तर अन्य भाज्यांचे भाव घसरले आहेत. भेंडीची भाजी घाऊक बाजारात ३२ रुपये दराने आहे. किरकोळ बाजारात तिचा भाव किलोला ८ ते १० रुपये आहे. बाजारात गुजरात भेंडीची चलती आहे. टोमॅटोचे २५ किलो वजनाचे एक कॅरेट १५० ते २०० रुपयांना घाऊक बाजारात विकले जात आहे. किरकोळ बाजारात सहा ते आठ रुपये दराने टोमॅटो विकला जात आहे. गाजर राजस्थानमधील जयपूर येथून येत आहे. जोधपुरी गाजर हे गाजरहलव्यासाठी खरेदी केले जाते. घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो दर आहे, तर किरकोळ बाजारात या गाजराचा भाव किलोला ४० रुपये आहे. साधे गाजर हे बंगळुरू येथून येत आहे. त्याचा भाव १० ते १५ रुपये किलो आहे. त्याचा वापर व्हेज बिर्याणी व पुलावमध्ये केला जातो. पत्ताकोबी घाऊक बाजारात तीन ते पाच रुपये किलो तर किरकोळ बाजारात आठ ते १० रुपये किलोने विकला जात आहे. फ्लॉवरचा भाव घाऊक बाजारात आठ ते १० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात २० रुपये आहे.

ढोबळी मिरची घाऊक बाजारात किलोला ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलो, फरसबी घाऊक बाजारात २० ते ३० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात ३५ रुपये किलो आहे. घेवडा घाऊक बाजारात २५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलो, काकडी घाऊक बाजारात १० ते १२ रुपये किलोे तर, किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलोने विकली जात आहे. दोडका घाऊक बाजारात २० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ३० रुपये किलो आहे. घोसाळी घाऊक बाजारात किलोला १० ते १२ रुपये, तर किरकोळ बाजारात २५ रुपये किलो आहे. अलिबागची तोंडली घाऊक बाजारात २० ते ३० रुपये किलोने विकली जात आहे. गुजरातहून येणाऱ्या तोंडलीचा भाव किलोमागे १० रुपये आहे. ही तोंडली स्वस्त असल्याने तिला मागणी आहे.

२५ गाड्यांचा माल पडून

कल्याण एपीएमसीमध्ये बुधवारी भाज्यांच्या ७० गाड्या आल्या होत्या. त्यापैकी २५ गाड्यांच्या मालाला उचल नाही. तो बाजार समितीत तसाच पडून आहे. बाजार थंडा आहे. भावही घसरला आहे, असे भाजीविक्रेते रंगनाथ कारभारी विचारे यांनी सांगितले.

दुधी सहा ते आठ रुपये किलो

हिवाळ्यात दुधीचा भाव घसरतो. दुधी घाऊक बाजारात सहा ते आठ रुपये किलो तर, किरकोळ बाजारात १० ते १५ रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे दिवाळीत दुधीहलव्याच्या बेत गृहिणींना करता येणार आहे.
हृदयविकाराच्या रुग्णांनी आरोग्यासाठी दुधीचा रस सकाळी प्यायचा असतो. त्यांच्यासाठी दुधीचा रस घरच्याघरी करण्यासाठी स्वस्त दुधी घेता येऊ शकतो, ही माहितीविचारे यांनी दिली आहे. काही दिवसात थंडीला सुरुवात होईल. त्यावेळीही भाज्यांचे भाव कमी राहतील, असे जाणकारांनी सांगितले.

Web Title: other vegetable prices declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.