रस्त्यालगत उभ्या वाहनांना नोटिसा, डोंबिवलीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:03 AM2019-04-03T04:03:32+5:302019-04-03T04:03:48+5:30

डोंबिवलीत कारवाई : वाहनधारकांमध्ये संभ्रम; गॅरेजच्या वाहनांवर हवी कारवाई

Notice to the vertical vehicles in the road, dubbed operation | रस्त्यालगत उभ्या वाहनांना नोटिसा, डोंबिवलीत कारवाई

रस्त्यालगत उभ्या वाहनांना नोटिसा, डोंबिवलीत कारवाई

डोंबिवली : नियोजनाअभावी वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र शहरात असताना दुसरीकडे शहर वाहतूक शाखेने रस्त्याच्या लगत उभ्या केलेल्या वाहनांवर नोटिसा चिकटविण्यास सुरुवात केली आहे. वाहतुकीला अडथळा आणला जात असल्याचे कारण नोटीसमध्ये नमूद केले आहे. मात्र, वाहतुकीला खऱ्या अर्थाने अडथळे ठरणारी वाहने मात्र मोकाटच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

रस्त्यावर अनेक दिवसांपासून धूळखात पडलेल्या वाहनांना नोटिसा बजावून ती तत्काळ हटविण्यासंदर्भात वाहतूक पोलीस विभागाने सूचना केल्या आहेत. तसेच नोटिशीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण दिले आहे. सध्या डोंबिवली पूर्वेतील नेहरू रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लगतच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अशाप्रकारच्या नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पंचायत विहीर परिसरातील रस्त्यावरील वाहनांवर अशाप्रकारच्या नोटिसा लावल्या होत्या.

विशेष म्हणजे डोंबिवलीत बहुतांश बांधकामे ही जुनी असल्याने त्यांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे वाहने ही रस्त्याच्या लगतच उभी केली जात आहेत. रेल्वेचे पूर्व आणि पश्चिमेतील प्रत्येकी एक वाहनतळ तसेच पीपी चेंबर येथील खाजगी वाहनतळ वगळता उर्वरित ठिकाणी पार्किंगची अशी कोणतीही सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिलेली नाही. पूर्वेकडील चिमणी गल्लीतील वाहनतळ बांधून तयार आहे, पण त्याचा वापर सुरू केलेला नाही. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात कामावर जाणाऱ्याला रेल्वे स्थानकालगत अथवा अन्य ठिकाणी रस्त्याच्या लगतच वाहन उभे करून रेल्वे स्थानकाची वाट धरावी लागत आहे.
शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहनचालक मनमानीपणे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करून कोंडीला हातभार लावतात. त्यात अनधिकृत रिक्षा स्टॅण्डमुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या बेशिस्तीला चाप लावण्याऐवजी रस्त्याच्या लगत उभ्या केलेल्या गाड्यांवर कारवाईच्या नोटिसा चिकटविण्याचा वाहतूक पोलिसांचा पवित्रा पाहता वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुरुस्तीसाठी आणलेली वाहने गॅरेजसमोर अनेक महिने पडून असतात. त्यांच्यामुळेही वाहतुकीला अडथळा होतो. तसेच रस्त्यात रिक्षा उभ्या करून अडथळा निर्माण करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस काय कारवाई करतात?, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.


वाहतुकीला अडथळा आणणाऱ्यांवर बडगा
यासंदर्भात डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एन. जाधव म्हणाले, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, असे वाहन उभे करणाऱ्यांना नोटिसा बजावणे सुरू आहे. तसेच वाहतुक कोंडीला अडथळा ठरणारे रिक्षाचालक, दुचाकीस्वार त्यांच्याविरोधातही आमची कारवाई सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Notice to the vertical vehicles in the road, dubbed operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.