बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय सुनावणीला राष्ट्रवादीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 02:48 PM2018-05-29T14:48:57+5:302018-05-29T14:48:57+5:30

बुलेट ट्रेनच्या विरोधातील वातावरण आता अधिकाधिक तापू लागले आहे.

NCP's opposition to the bullet train ecological hearing | बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय सुनावणीला राष्ट्रवादीचा विरोध

बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय सुनावणीला राष्ट्रवादीचा विरोध

Next

ठाणे - बुलेट ट्रेनच्या विरोधातील वातावरण आता अधिकाधिक तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून बुलेट ट्रेनला विरोध केला असून आंदोलनही तापवण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी जिल्हाप्रशासनाने आयोजित केलेल्या पर्यावरणीय सुनावणीच्या वेळी गडकरी रंगायतनबाहेर आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. 
बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार आहेत. शेतकर्‍यांना विश्वासात न घेता जमिनींचे संपादन केले जात असल्याने राष्ट्रवादीने विरोध केला आहे. तसेच, बुलेट ट्रेनसाठी कोटयवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेन सुरळीत कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बुलेट ट्रेनच्या संदर्भात पर्यावरणीय हरकती आणि सूचनांची जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे हे नगरसेवक सुहास देसाई,  कोपरी पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील , ठाणे शहर विधानसभाकार्याध्यक्ष  विजय भामरे, ओ. बी. सी.सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर , हेमंत वाणी, निलेश कदम, दिलीप नाईक, समीर भोईर, सुरेश सिंग, संतोष सहस्त्रबुद्धे, शैलेश कदम, सुमित गुप्ता, महेंद्र पवार, संदीप पवार यांच्यासह गडकरी रंगयातन येथे गेले. मात्र, प्रशासनाने त्यांना सुनावणीमध्ये सहभागी होण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी रंगयातनच्या बाहेरच जोरदार घोषणाबाजी केली. 
यावेळी आनंद परांजपे यांनी, सध्या देशातील रेल्वे वाहतूक मोडकळीस आली आहे. ठाणे- कल्याणसारखी स्थानके अस्वच्छ स्थानकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर येत आहेत. सरकते जिने स्टेशनांच्या बाहेर येऊन पडले आहेत. मात्र, ते बसवण्याचे औदार्य दाखविले जात नाही. एकीकडे लोकल ट्रेनमधून पडून हजारो लोक मरत असताना ही बुलेट ट्रेन आमच्या छाताडावर चालवून ठराविक वर्गाचे भले करण्याचा डाव आखला आहे. आमच्या पालघर, दिव्यातल्या शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगितले.

Web Title: NCP's opposition to the bullet train ecological hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.