ठाण्यातील महिला पोलिसांचा विनयभंग: पीडित महिलांची संख्या जास्त? : आरोपी मोकाटच

By जितेंद्र कालेकर | Published: January 28, 2018 11:45 PM2018-01-28T23:45:15+5:302018-01-28T23:45:15+5:30

ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे.

Molestation of women police in Thane: The number of affected women? : Accused Mokatch | ठाण्यातील महिला पोलिसांचा विनयभंग: पीडित महिलांची संख्या जास्त? : आरोपी मोकाटच

पीडित महिलांची संख्या जास्त

Next
ठळक मुद्देविशाखा समितीने केली निलंबनाची शिफारसआणखी दहा महिलांनीही नोंदविले जबाबप्रकरण गंभीर असल्याची आयुक्तालयात चर्चा

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक (आरपीआय) नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली असली तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाखा समितीने केलेल्या चौकशीत आणखी १० महिलांनी या प्रकरणात जबाब नोंदवताना आरपीआयविरुद्ध तक्रार केल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
दीड वर्षापूर्वीच शिंदे यांची आरपीआय म्हणून ठाणे मुख्यालयात नियुक्ती झाली आहे. तत्पूर्वी, ते मुंबईत कार्यरत होते. त्याआधी अनेक वर्षांपासून ठाण्यातच राखीव पोलीस उपनिरीक्षक (आरएसआय) म्हणून मुख्यालयात नेमणुकीस होते. त्याकाळातही त्यांचे काही प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांशी गैरवर्तन होते, अशी चर्चा आता मुख्यालयाच्या वर्तुळातच दबक्या आवाजात सुरू आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका बड्या अधिकाºयानेही शिंदे यांना आपले वर्तन सुधारण्याबाबत काही वर्षांपूर्वीच ‘सक्त ताकीद’ दिली होती. आधीच वादग्रस्त असूनही त्यांची पुन्हा ठाण्यात ‘आरपीआय’ म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीपासूनच महिला पोलीस कर्मचा-यांशी त्यांचे वर्तन असभ्यपणाचे होते. रजा देताना, ठरावीक ठिकाणी ड्युटी देताना त्यांच्याकडून असभ्यपणे ‘इशारे’ केले जायचे. कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलला ते चहा करायला लावणे, भांडी घासणे अशी कामेही करायला भाग पाडायचे. त्यांच्यापैकीच दोघींनी धाडस दाखवून याप्रकरणी थेट पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. याच तक्रारीची विशाखा समितीने चौकशी केली. यामध्ये १० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यामुळे दोन मुलींसह आणखीही मुलींनी शिंदे यांच्या गैरवर्तनाचा पाढा वाचून चौकशी समितीपुढे दाद मागितली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन या समितीने शिंदे यांचे निलंबन अथवा बदली तसेच अन्यत्र बदलीच्या शिफारशींसह हा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर केला. समितीच्या चौकशीनंतर दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा असलेल्या पीडित महिलांची कसलीच दखल घेतली गेली नाही. शिंदे त्याच पदावर नियुक्त असल्यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग करत संबंधित महिला पोलिसांना आणखी वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली, असाही आरोप आहे. हा त्रास असह्य झाल्यानंतर अखेर याप्रकरणी दोन महिलांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली. चौकशी सुरू असल्यामुळे शिंदे यांना अटक केली नसल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सध्या आरपीआय शिंदे यांनी आजारी असल्याचे सांगून वैद्यकीय रजा घेतल्याचे मुख्यालयातून सांगण्यात आले. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.
शिंदे ठरले मुख्यालयाचे दुसरे अधिकारी
याआधी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला ‘ड्युटीची सेटिंग करून देतो’, असे वारंवार सांगत तिला फोन करून त्रास देणा-या मुख्यालयातील सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे यांच्याविरुद्ध यापूर्वीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात निपुंगे यांना मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीनही मिळाला असला, तरी ते या घटनेनंतर वैद्यकीय (सीक) रजेवर आहेत. अशाच प्रकरणात सीक रजेवर जावे लागलेले शिंदे हे मुख्यालयाचे दुसरे अधिकारी ठरले आहेत. अधिका-यांच्या अशा गैरवर्तणुकीमुळे पोलीस आयुक्तालयाची चांगलीच नाचक्की होत असल्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी मात्र या प्रकरणावर तोंडावर बोट ठेवणेच पसंत केले आहे.

Web Title: Molestation of women police in Thane: The number of affected women? : Accused Mokatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.