ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 08:25 AM2019-05-13T08:25:34+5:302019-05-13T08:26:14+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे.

MNS Workers Meeting in Thane in presence of Raj Thackeray | ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी

ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी

Next

ठाणे - लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता सर्वाधिक चर्चा झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाच थेट टार्गेट केल्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा प्रचार मनसे आणि भाजपाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजला. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा मुक्त भारतची घोषणा देत भाजपाविरोधात प्रचाराची रणधुमाळी गाजवल्यानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मनसेच्या राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना या कार्यशाळेसाठी ठाण्यात बोलवण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेच्या या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांना दुष्काळाबाबतची संबंधित जिल्ह्याची माहितीसोबत घेऊन येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळावरुन राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचीही चर्चा आहे. 

या कार्यशाळेच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे प्रचार केला पाहिजे. कोणते मुद्दे घेतले पाहिजेत. तसेच संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही कार्यशाळेत चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांचा हा उत्साह कायम ठेवण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. 

मनसेच्या या कार्यशाळेसाठी मनसेचे नेते, पक्षाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस,  जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महापालिका-नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष, मुंबई, पुणे, नाशिक शहरातील विभाग अध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सध्याची दुष्काळाची स्थिती काय आहे याची माहिती देण्यात सांगितली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाण्यात काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

Web Title: MNS Workers Meeting in Thane in presence of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.