Mira-Bhayander Municipal Corporation's Standing Committee | मीरा-भाईंदर महापालिकेची स्थायी समिती निघाली युरोपला
मीरा-भाईंदर महापालिकेची स्थायी समिती निघाली युरोपला

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीतील नगरसेवकांच्या परदेश सहलीची प्रथा सुरुच आहे. समितीमधील भाजप, शिवसेना व काँग्रेस नगरसेवक एकत्रितपणे फिरण्यासाठी लंडन, पॅरीस, स्वित्झर्लंड आदी युरोपीय देशांमध्ये जाणार आहेत. जूनमध्ये हा दौरा निघण्याची शक्यता असून, त्यासाठी लंडनचा व्हिसा अजून येणे बाकी आहे. या दौऱ्यावर सुमारे २५ लाखांचा खर्च होणार असून, तो स्वत:च्या खिशातून करणार असल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्थायी समितीच्या परदेश वाºया सुरु असल्याने, हा भुर्दंड सोसणारे पडद्यामागचे अदृश्य हात अधिकारी व ठेकेदारांचे असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पालिकेकडे विकासकामांसाठी निधी नसल्याने नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकून नगरसेवकांचे पर्यटन सुरुच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वत:हून याची चौकशी करणे गरजेचे असताना, ते मात्र मुग गिळून गप्प बसत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
मीरा भार्इंदर महापालिकेतील नगरसेवकांचे महापालिकेच्या पैशातून काश्मीर, दार्जिलिंग, हिमाचल, शिमला, कुर्ग, उटी, गोवा, देहरादून, सिक्कीम, म्हैसूर आदी पर्यटनस्थळी अभ्यास दौºयाच्या नावाखाली चालणाºया मौजमजेच्या सहली नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. नागरिकांवर पाणीपट्टी, घनकचरा शुल्क, मालमत्ता करवाढ, मल प्रवाह कर आदी विविध कर व दरवाढीचा बोजा टाकणाºया या नगरसेवकांकडून जनतेच्या पैशांवर मात्र सतत मौजमजा चालत आली आहे. आतापर्यंतच्या अभ्यास दौºयातून शहर व नागरिकांच्या हिताचे काहीही साध्य झाले नसताना, महापालिका प्रशासनदेखील या काही कोटी रुपयांच्या उधळपट्टीत सहभागी असल्याने या दौऱ्यांना बंदी घालण्याची हिंम्मत दाखवली जात नाही.
जनतेच्या पैशांमधून फुकटचे पर्यटन करुन होत असल्याने नगरसेवकदेखील निलाजरेपणाने दौरा काढण्यासाठी नेहमी हपापलेले असतात. अलिशान हॉटेल, गाड्या दिमतीला असतात. काही नगरसेवक तर आपली पोरंबाळं वा नातलगदेखील सोबत घेऊन जातात. पालिकेच्या पैशातून पर्यटनस्थळांचे दौरे काढून मौजमजा करणाºया नगरसेवकांची हौस काही फिटत नसताना, स्थायी समितीतील नगरसेवकांनी तर थेट परदेशात सहली काढण्यास सुरवात केली. महापालिकेची तिजोरी हाती असलेल्या स्थायी समितीतले नगरसेवक तर जणू ते सामान्य नगरसेवक नसल्याच्या आविर्भात परदेश दौºयांना जाऊ लागले. आतापर्यंत शांघाय, मलेशिया, युरोप व आस्ट्रेलिया अशा परदेशी सहली झाल्या आहेत. गेल्यावर्षी जूनमध्ये सभापती धु्रवकिशोर पाटील यांच्या कार्यकाळात स्थायी समितीमधील नगरसेवक १० दिवसांसाठी आॅस्ट्रेलियामध्ये मौजमजा करुन आले होते.
या दौºयासाठी महापालिकेचा निधी अधिकृतपणे वापरता येत नसल्याने अधिकाºयांवर तसेच ठेकेदारांवर या नगरसेवकांच्या परदेशवारीच्या व्यवस्थेची अर्थपूर्ण जबाबदारी टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे. काही नगरसेवक खाजगीत कबुलदेखील करत असतात की, फुकट मिळते तर का सोडायचे? मुळात एरव्ही एकमेकांची उणीदुणी काढणारे हे नगरसेवक दौºयाच्या वेळी मात्र आपले पक्ष, वाद विसरुन एकत्र येतात. स्थायी समितीचे नगरसेवकदेखील परदेश दौºयासाठी जणू काही एकत्र कुटुंब वा जुना मित्र परिवार आहे, अशा अविर्भावात एकत्र येऊन परदेश पर्यटन करतात.
लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड या युरोपीय देशांमध्ये जूनमध्ये मौजमजेसाठी स्थायी समितीचे नगरसेवक जाणार आहेत. त्यासाठी पॅरिस आणि स्वित्झर्लंड या देशांचा व्हिसा मिळाला असून, लंडनचा व्हिसा अजून मिळाला नसल्याने त्या प्रतिक्षेत हे उत्सूक नगरसेवक आहेत. १६ सदस्यांच्या स्थायी समितीचे सभापती भाजपचे अ‍ॅड. रवी व्यास आहेत. सदस्यांमध्ये भाजपचे हसमुख गेहलोत, वंदना मंगेश पाटील, ध्रुवकिशोर पाटील, मुन्ना उर्फ प्रकाश सिंग, मीरादेवी यादव, मोहन म्हात्रे , निला सोन्स, वर्षा भानुशाली , राकेश शाह तर शिवसेनेच्या अनिता पाटील, तारा घरत, दिप्ती भट , वंदना विकास पाटील ह्या आहेत. शिवाय काँग्रेसचे जुबेर इनामदार व काँग्रेस समर्थक राजीव मेहरासुध्दा स्थायी समितीमध्ये आहेत.
वंदना मंगेश पाटील यांचा पासपोर्टचा मुद्दा आहे. मुन्ना सिंग व मोहन म्हात्रे यांना व्हिसा मिळत नसल्याने ते जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. राजीव मेहरा यांनी मात्र स्वत:च जाणार नसल्याचे कळवले आहे. दौºयासाठी प्रत्येकी सुमारे दोन लाखांचा खर्च, याप्रमाणे २५ लाखांची तजवीज केली गेली असून, नियोजनाचे काम भाजपच्याच गोटातील एजंटला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आम्ही अधिकारी - ठेकेदारांकडून पैसे गोळा करुन नाही तर, स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करुन लंडन, पॅरिस आणि स्विर्त्झलँडला जाणार आहोत. या आधीदेखील स्थायी समितीचे नगरसेवक परदेशात गेले होते. वंदना मंगेश पाटील, राजीव मेहरा, मुन्ना सिंग व मोहन म्हात्रे हे चौघे येणार नाहीत. - अ‍ॅड रवी व्यास,
सभापती

स्थायी समिती नगरसेवकांच्या युरोप सहलीला मी जाणार नाही. त्यासाठी मी आधीच स्पष्ट नकार दिला आहे. जायचेच झाले, तर मी माझ्या पैशाने जाईन. याआधी महापालिकेच्या खर्चातून झालेल्या देहरादून येथील दौºयालासुध्दा मी गेलो नव्हतो. कारण अभ्यास करण्याची गरज आहे, तिकडे दौरे काढले जात नाहीत. - राजीव मेहरा,
काँग्रेस समर्थक नगरसेवक

परदेशात स्थायी समितीचे नगरसेवक स्वखर्चाने जातात यावर कोणी विश्वास ठेवेल का ? एकमेकांचे विरोधक असलेले पर्यटनासाठी एकत्र येण्यास हे काय कौटुंबिक सदस्य वा मित्र आहेत का ? वास्तविक या दौºयाच्या खर्चाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वत:हून चौकशी करुन कारवाई केली पाहिजे. पण ते करणार नाहीत.
- रोहित सुवर्णा, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक


Web Title:  Mira-Bhayander Municipal Corporation's Standing Committee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.