मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 09:08 PM2017-09-09T21:08:02+5:302017-09-09T21:16:15+5:30

यंदाच्या पालिका निवडणुकीला महिना होत नाही तोवर सेनेच्या गडाला खिंडार पडू लागले.

Mena-Bhairindar's army retreats in a short span of time; Shiv Sena corporator Raju Bhoir in Dera Dakhak | मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल

मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल

Next

भार्इंदर, दि. 9 - यंदाच्या पालिका निवडणुकीला महिना होत नाही तोवर सेनेच्या गडाला खिंडार पडू लागले. सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू भोईर तसेच निवडणुकीतील सेनेचेच उमेदवार व राजू यांचे बंधु दिलिप भोईर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत भाजपामध्ये प्रवेश केला.

पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राजू भोईर यांनी २०१२ मध्ये सोईस्करपणे सत्ताधा-यांचा पाठींबा बदलत सत्तेतील महत्वांच्या पदांचा उपभोग घेतला. याच काळातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सुरुवातीच्या सत्तेसाठी पाठींबा देत त्यांनी स्थायी समिती सभापतीपद पटकावले. तर पत्नी भावना यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद बहाल करण्यात आले. या नगरसेवकाने अडीच वर्षानंतर सत्तेचा पट सेना-भाजपा युतीच्या हाती जात असल्याचे पाहुन आघाडीचा पाठींबा काढुन युतीशी मैत्री करणे पसंत केले. 
यंदाच्या निवडणुकीपूर्वी राजू भोईर यांनी बविआला रामराम ठोकून सुरुवातीला भाजपातुन तिकिट मिळविण्याचा प्रयत्न केला.

परंतु, भाजपाच्या स्थानिक पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर त्यांनी सेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीत सेनेने भोईर कुटुंबावर विशेष मेहेरनजर दाखवित चार सदस्यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत सैनिकांत कमालीची नाराजी पसरली होती. त्यापैकी राजू, त्यांच्या पत्नी भावना व बंधु कमलेश यांचा विजय तर त्यांचे दुसरे बंधु दिलिप यांचा पराभव झाला. 

सेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतरही त्यांचे सेनेच्या अजेंड्यावर मन रमेना. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा काही दिवसांपुर्वी सुरु होती. परंतु, त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर शनिवारी मुख्यमंत्र्यांसह भाजपा खासदार व आमदारांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत खाजगी बैठक असल्याची माहिती मिळताच राजू भोईर यांनी सेनेचे धनुष्यबाण खाली ठेऊन भाजपाच्या कमळात विराजमान होण्यासाठी आ. नरेंद्र मेहता यांना गळ घातली. 

मेहता यांनी राजू यांच्यासह त्यांचे बंधु दिलिप भोईर यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश मिळवून दिला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व  माजी नगरसेवक आसिफ शेख उपस्थित होते. या पहिल्या टप्प्यानंतर सेनेच्या नगरसेविका भावना व नगरसेवक कमलेश भोईर हे देखील दुस-यांदा भाजपात दाखल होतील, असा दावा शेख यांनी केला आहे. राजू भोईर यांच्या भाजपा प्रवेशाने सेनेच्या गडाला अल्पावधीतच खिंडार पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

नगरसेवक राजू भोईर यांची मीरागाव परिसरात एक तीनमजली इमारत तसेच दुसरी दोन मजली (सध्या दोन मजल्यापर्यंत काम पुर्ण होऊन तिस-या मजल्याचे काम सुरु आहे) इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात येते. या इमारतींवर कारवाई करण्यासाठी भाजपाचेच स्थानिक पदाधिकारी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. ही बांधकामे वाचविण्यासाठीच एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपाच्या आश्रयाखाली भोईर आल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. तसेच या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी भाजपा सृष्टी मंडळाचे अध्यक्ष गजानन नागे यांनी तर उपोषणाचा इशारा दिला आहे. 

Web Title: Mena-Bhairindar's army retreats in a short span of time; Shiv Sena corporator Raju Bhoir in Dera Dakhak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.