ढिसाळ नियोजनामुळे रविवारी होणार मेगाहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 04:46 AM2018-11-16T04:46:19+5:302018-11-16T04:46:36+5:30

पत्रीपुलासाठी रेल्वे सहा तास ब्लॉक : अन्य पर्यायांचा अद्याप पत्ता नाही

Megahal will be held on Sunday due to poor planning | ढिसाळ नियोजनामुळे रविवारी होणार मेगाहाल

ढिसाळ नियोजनामुळे रविवारी होणार मेगाहाल

googlenewsNext

डोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला रविवार, १८ नोव्हेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. यासाठी सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द होणार आहेत. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबतचे नियोजन न केल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका, वाहतूक विभाग, पोलीस व एसटी महामंडळ यांना वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करणे अशक्य झाले आहे. रेल्वेच्या लेटलतिफीचा फटका अन्य यंत्रणांना बसल्याने पर्यायी वाहतुकीचे नियोजन न झाल्यास प्रवाशांना रविवारी मेगाहाल सहन करावे लागणार आहेत.

पत्रीपूल पाडण्यामुळे डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यादरम्यान आणि कल्याण ते कर्जत-कसारा यादरम्यान वाहतूक सुरू राहील. डोंबिवली ते कल्याणदरम्यानची वाहतूक बंद असल्यास लोकांना रस्त्याने कल्याण किंवा डोंबिवली स्थानक गाठावे लागेल. पत्रीपूल पाडण्याचे काम सुरू असेल, तेव्हा सध्या ज्या नवीन अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे, तो तरी सुरू ठेवणे शक्य होईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. समजा, हा नवीन पूल सुरू असेल, तर त्यावर प्रचंड कोंडीची शक्यता आहे. रविवारी महामेगाब्लॉकच्या काळात केडीएमसी, वाहतूक पोलीस यांना तेथील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु, रेल्वेकडून नियोजन प्राप्त होत नसल्याने महापालिका, वाहतूक पोलीस तसेच अतिरिक्त बस सोडणाऱ्या एसटी महामंडळाला आपले नियोजन करणे अशक्य झाले आहे.
अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल व पादचारी पुलांची तपासणी केली होती. त्यात, कल्याण येथील पत्रीपूलही धोकादायक असल्याचे आढळले होते. त्यामुळे हा पूल तीन महिन्यांपासून वाहतुकीस बंद आहे. हा पूल पाडून तेथे नवीन पूल उभारण्यात येणार आहे. त्याकरिता, सप्टेंबरपासून पुलावरील डांबर उखडण्यात आले. मात्र, पुढे या पुलाचे काम रखडले होते. जुन्या पत्रीपुलावरील वाहतूक शेजारील नवीन पुलावरून वळवली आहे. त्यामुळे पुलाच्या परिसरातील कोंडी फोडण्यासाठी जुना पूल सुरू करावा, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसेने आंदोलनही केले होते. दरम्यान, आता पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे रविवारी सकाळी ९.३० पासून सहा तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात पुलाचा लोखंडी सांगाडा काढण्यात येईल. परंतु, या ब्लॉकमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. सध्या दिवाळीची सुटी असून बाहेरगावी गेलेले अनेक कल्याण, डोंबिवलीकर रविवारी परत येण्याची शक्यता आहे. तसेच सुटीच्या दिवशी फिरायला जाणाºयांचेही या गोंधळामुळे प्रचंड हाल होण्याची शक्यता दिसत आहे.

यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव

भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावर पत्रीपूल येतो. कल्याण पूर्व-पश्चिम तसेच अन्य परिसराला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. हा पूल धोकादायक असल्याने तीन महिन्यांपासून बंद होता. तो प्रत्यक्षात पाडण्यासाठी आता मुहूर्त मिळाला आहे. दुसरीकडे मुंब्रा बायपासची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिन्याचा कालावधी गृहीत धरला होता. मात्र, प्रत्यक्षात सुमारे तीन महिने काम चालले. पत्रीपूल पाडून नवीन बांधेपर्यंत किती वेळ लागणार, याबाबत साशंकताच आहे. त्याचबरोबर, पुलाच्या कामाबाबत रेल्वे आणि राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Web Title: Megahal will be held on Sunday due to poor planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.