लोकसभेची लगीनघाई सुरू, घोषणांच्या अक्षता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:15 AM2019-03-04T00:15:51+5:302019-03-04T00:16:13+5:30

आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता असल्याने उद्या (रविवारी) वेगवेगळ्या कामांच्या भूमिपूजनाचा, उद्घाटनांचा जंगी सोहळा शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांनी ठेवला आहे.

Lok Sabha Speech Begins, Acceptance of Speeches | लोकसभेची लगीनघाई सुरू, घोषणांच्या अक्षता

लोकसभेची लगीनघाई सुरू, घोषणांच्या अक्षता

Next

ठाणे/कल्याण/अंबरनाथ/मुरबाड : पुढील आठवड्याच्या मध्यास किंवा अखेरीस लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता असल्याने उद्या (रविवारी) वेगवेगळ्या कामांच्या भूमिपूजनाचा, उद्घाटनांचा जंगी सोहळा शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांनी ठेवला आहे. वेगवेगळ्या कामांच्या घोषणांच्या अक्षता शनिवारपासून पडू लागल्या. त्यामुळे लोकसभेची लगीनघाई सुरू झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
शिवसेना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने उद्यापासून १५ डब्यांची डोंबिवली लोकल सेवेत दाखल होत आहे. सोमवार ते शुक्रवार ही लोकल डोंबिवलीकरांना उपलब्ध असेल. पाठोपाठ अंबरनाथ स्थानकाच्या कायापालटास सुरुवात होत असून होम प्लॅटफॉर्म, बुकिंग आॅफिस, पादचारी पूल, एस्कलेटर आदी सुविधा विकसित करण्यास प्रारंभ होणार आहे. दिवा स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मना जोडणाऱ्या नव्या पादचारी पुलाचे लोकार्पण उद्याच होणार आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वेस्थानकांच्या मधोमध चिखलोली रेल्वे स्थानक उभारण्यास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मान्यता दिल्याने रविवारीच चिखलोली स्थानकाचेही भूमिपूजन केले जाणार आहे.
त्याचबरोबर ठाण्यात आयआयएम आणि आयआयटीसारख्या संस्था याव्यात, याकरिता खिडकाळी येथे ११३ हेक्टरवर एज्युकेशन हब उभारण्याकरिता आरक्षणबदलास मान्यता देऊन सरकारने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी पूर्ण केली आहे. दि. ९ आॅक्टोबर २०१६ रोजी ठाणे महापालिकेने हा प्रस्ताव सरकारकडे धाडला होता.
।आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज विकासकामांचे लोकार्पण
दिवा, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, ३ मार्चला होणार आहे. दिवा येथे सकाळी १० वाजता दिवा रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन, तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे पडले येथे भूमिपूजन तसेच पलावा येथील अग्निशमन व यंत्रसामग्री यंत्रणेचे, डोंबिवली क्रीडा संकुलातील क्रिकेट सराव खेळपट्टीचे, कल्याण-नेतिवली येथील समाजमंदिर व वाचनालय, लोकग्राम येथील वाचनालय या विकासकामांचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उल्हासनगर येथे कामगार रुग्णालयाच्या जागी १०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचे भूमिपूजनही ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
>चटकन प्रस्ताव, पटकन कार्यादेश
ठाणे : लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या वादामुळे विकासकामांच्या प्रस्तावांना ब्रेक लावण्याचा निर्णय आयुक्तांनी मागे घेतल्यावर शनिवारी स्थायी समितीमध्ये अनेक रखडलेले प्रस्ताव चुटकीसरशी मंजूर झाले. ज्या कामांचे रविवारी किंवा येत्या दोनचार दिवसांत भूमिपूजन करायचे आहे, त्यांचे कार्यादेश तत्काळ काढण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. यावरून आयुक्त व नगरसेवक यांच्या संघर्षात तातडीने मांडवली का केली गेली, हेच संकेत प्राप्त झाले.
शिवसेनेची प्रस्तावमंजुरीची लगीनघाई सुरू असताना भाजपाने मात्र यापुढे प्रशासनाने सर्व प्रस्ताव पारदर्शकपणे तपासूनच मंजुरीसाठी आणावेत, असे आवाहन करून मित्रपक्षाचे कान टोचले. यापूर्वी नंदलाल प्रकरणात केवळ नगरसेवकच टार्गेट झाले होते. अधिकारी मात्र सुटले होते, त्यामुळे पुन्हा ती वेळ नगरसेवकांवर येऊ देऊ नका, अशी मागणी भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केली.
मनसेनेही आयुक्तांच्या भूमिकेचे कौतुक केले व ज्या विकासकामांकरिता संगनमताने निविदा भरल्याचा संशय आहे, त्या निविदांची यादी महापालिकेने जाहीर करावी, अशी मागणी संदीप पाचंगे यांनी केली.
>कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी
लाखो मुरबाडवासीयांची अनेक वर्षांची रेल्वेची मागणी पूर्ण झाली असून कल्याण-मुरबाड २८ किमीच्या रेल्वेमार्गाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. रविवारी गोयल यांच्या हस्ते याचेही भूमिपूजन होणार आहे. खा. कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी ५२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून राज्य सरकारने ५० टक्के सहभाग देण्याची घोषणा केली आहे.

Web Title: Lok Sabha Speech Begins, Acceptance of Speeches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.