गणेशोत्सव काळात 24 तास रेल्वे सुरू ठेवा; जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

By अजित मांडके | Published: September 16, 2023 03:34 PM2023-09-16T15:34:30+5:302023-09-16T15:35:30+5:30

कोकण मार्गावर अतिरिक्त दोन गाड्या सुरू कराव्यात 

keep trains running for 24 hours during ganeshotsav jitendra awhad demand to railway minister | गणेशोत्सव काळात 24 तास रेल्वे सुरू ठेवा; जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

गणेशोत्सव काळात 24 तास रेल्वे सुरू ठेवा; जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणार्‍या गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवाव्यात, तसेच कोकण हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन अतिरिक्‍त रेल्वे गाड्या सुरू कराव्यात,  अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  जितेंंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात आव्हाड रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे. एरव्ही रात्री 1 नंतर मुंबईतून कर्जत आणि कसार्‍याच्या दिशेने जाणार्‍या रेल्वेगाड्या बंद करण्यात येत असतात. या गाड्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुरू होतात. त्यामुळे अनेक प्र्रवाशांची कुचंबणा होत असते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील गणेशभक्त मुंबईत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रात्री उशिरानंतर त्यांचे परतीचे मार्ग रेल्वे बंद झाल्याने खुंटतात. हा भाविक वर्ग सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने जादा पैसे खर्च करून घरी परतणे त्यांच्यासाठी अवघड असते. परिणामी त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी कोलकात्यात नवरात्रोत्सवात ज्या पद्धतीने दिवस- रात्र रेल्वे सेवा सुरू ठेवतात. त्याच धर्तीवर मुंबई आणि उपनगरात सबंध रात्रभर रेल्वे वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी केली असल्याची माहिती आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान, कोकणात रस्ते मार्गाने जाणे अत्यंत अवघड झाले आहे. खड्डयांमुळे अपघात होणे, वाहतूक कोंडीत अडकणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळेच रविवारपासून (दि.17) रेल्वेने दोन अतिरिक्त गाड्या सोडाव्यात, अशीही मागणी त्यांनी  केली.  यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील,  महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर हे उपस्थित होते.

...म्हणजे आम्हाला मारणार ना? 

सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांना 2024 मध्ये मोक्ष मिळेल, असे विधान रामदेव बाबाने केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, रामदेव बाबाला धार्मिक विषयावर महत्व देणे चुकीचे ठरेल. पण, मोक्ष देणार म्हणजे आम्हाला मारणार का? , असा सवाल करून ते म्हणाले की, सनातन धर्माच्या विचारांनीच या देशाला रसातळाला नेले आहे. म्हणून आमचा सनातन धर्माला विरोध आहे. सनातन धर्माची बाजू घेणाऱ्या लोकांना आपले काही प्रश्न आहेत, त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत. " चार्वाक, बसवेश्वर यांना कोणी मारले? छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक कोणी नाकारला? महात्मा जोतिराव फुले यांच्यावर मारेकरी कोणी धाडले? स्रि शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे कोणी मारले? सती प्रथेविरोधात लढणाऱ्या राजा राममोहन राॅय यांच्यावर तलवार उगारणारे कोण होते? राजर्षी शाहूमहाराज यांच्या बदनामीचा आणि त्यांना ठार मारण्याचा कट रचणारे कोण होते.? विशिष्ट जात समुहाला पाणी पिण्यापासून रोखणारे कोण होते? हे सर्व कृत्य करणारे सनातनी धर्माचे पाईक होते ना! त्यांना आपण विरोध करतच राहणार आहोत. भले आम्हाला मोक्ष देण्याची भाषा केली तरी बेहत्तर,  अशा शब्दांत आव्हाड यांनी रामदेव बाबांचा समाचार घेतला.

दुष्काळ जाहीर करा 

पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पाऊस नसल्याने पिके करपत आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारनेही दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना साह्य करण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी 

एकिकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, याबाबत आव्हाड म्हणाले की, शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात राज्यात अनेक उद्योग येत होते.ही माहिती अधिकृतपणे उघडकीस आली आहे. पण, आता राज्यात धार्मिक,  जातीय द्वेष वाढीस लागत असल्याने उद्योजक महाराष्ट्रात येण्यास तयार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गणेशोत्सव स्पर्धा 

ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरात ऑनलाईन घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे.  घरगुती गणेशोत्सवातील आरास ऑनलाईन पद्धतीने पाहून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले.  या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

Web Title: keep trains running for 24 hours during ganeshotsav jitendra awhad demand to railway minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.