कल्याणच्या डॉक्टर दाम्पत्यामुळे वाचले परदेशी महिलेचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:34 AM2019-04-14T05:34:45+5:302019-04-14T05:34:55+5:30

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ विमानतळावरून रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले.

Kalyan's doctor survived the death of a foreign woman | कल्याणच्या डॉक्टर दाम्पत्यामुळे वाचले परदेशी महिलेचे प्राण

कल्याणच्या डॉक्टर दाम्पत्यामुळे वाचले परदेशी महिलेचे प्राण

Next

कल्याण : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ विमानतळावरून रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले. काही वेळातच एका ६३ वर्षीय ऑस्ट्रेलियन प्रवासी महिलेला अस्वस्थ वाटत असून तिला वैद्यकीय उपचारांची गरज असल्याची उद्घोषणा करण्यात आली. याच विमानाने कल्याणचे डॉ. नितीन झबक आणि डॉ. नीता झबक हे दाम्पत्य भारताकडे परतीचा प्रवास करत होते. त्यांनी त्या महिलेकडे धाव घेऊन तिच्यावर तातडीने उपचार करून तिचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
डॉ. नितीन झबक हे सर्जन आहेत, तर डॉ. नीता या बालरोगतज्ज्ञ आहेत. ते आॅस्ट्रेलियाला १२ दिवसांसाठी फिरायला गेले होते. ते या विमानातून परतीचा प्रवास करत होते. विमानात एकूण १६३ प्रवासी होते. प्रवासादरम्यान महिलेची प्रकृती अचानक बिघडून ती बेशुद्ध पडली. तिला उपचारांची आवश्यकता असून कुणी डॉक्टर असल्यास पुढे येण्याची उद्घोषणा करण्यात आली. त्यानंतर, डॉ. झबक दाम्पत्याने आपले ओळखपत्र दाखवून ओळख सांगितली. त्यानंतर, विमानातील कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती साधने त्यांना पुरवली. आजारी महिलेला तपासले तेव्हा तिची पूर्णपणे शुद्ध हरपली होती. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब तपासल्यानंतर तिला आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. तसेच सलाइनही लावण्यात आले. बेशुद्ध पडलेल्या महिलेसोबत आणखी एक महिला होती. ती आणि विमान कर्मचाºयांनी उपचारांदरम्यान मदत केली. त्यानंतर, विमान सिंगापूर विमानतळावर उतरवण्यात आले. त्यांना फुकेतला जायचे होते. या विमानतळावर उतरल्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, संबंधित रुग्णालयाकडून या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा संदेश मोबाइलवर शनिवारी आल्याचे डॉ. झबक यांनी सांगितले. विमानप्रवासादरम्यान त्या आॅस्ट्रेलियन महिलेला वेळेत उपचार मिळाले नसते, तर तिच्या जीवावर बेतू शकले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
>जीव वाचवल्याचे समाधान
उपचारानंतर विमानातील कर्मचाºयांनी डॉक्टर दाम्पत्याला मिठी मारून त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना भेटवस्तूसह प्रत्येकी २०० डॉलरचे गिफ्ट व्हाउचर दिले आहे. झबक दाम्पत्य शनिवारी कल्याणला पोहोचले. रुग्णाचे प्राण वाचवल्याचे समाधान डॉक्टरसाठी मोठे असते, अशी भावना डॉ. नितीन व नीता झबक यांनी व्यक्त केली.

Web Title: Kalyan's doctor survived the death of a foreign woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.