कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:50 AM2018-09-17T04:50:35+5:302018-09-17T04:51:04+5:30

कल्याण शहराची ओळख ऐतिहासिक असली, तरी आता वाहतूककोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे.

Kalyan stuck in the maze of a maze | कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण

कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण

Next

कल्याण शहराची ओळख ऐतिहासिक असली, तरी आता वाहतूककोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरात कोणत्याही वेळेत एकही रस्ता मोकळा मिळत नाही. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. सततच्या कोंडीमुळे चालकही त्रस्त झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यास सर्वच यंत्रणांना अपयश आले आहे.

मुंबईला लागून असणारा ठाणे जिल्हा आणि ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असणारी कल्याण-डोंबिवली शहरे. मुंबई-ठाण्याच्या गतीने नसला तरी जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत याठिकाणी नागरीकरणाचा वेग तसा बेफामच. मात्र, या नागरीकरणाच्या अफाट वेगाचे रूपांतर सुनियोजित आणि समाजोपयोगी विकासामध्ये करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधाºयांना आलेल्या अपयशामुळे या दोन्ही शहरांना अनेक नागरी समस्यांशी झुंजावे लागत आहे. त्यापैकीच एक असणारी महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतूककोंडी. कल्याण आणि डोंबिवलीमधील नागरिक आधीच खड्ड्यांनी त्रस्त आहेत. खड्डे चुकवून प्रवासाला सुरूवात केली तर त्यांना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येशी झगडता झगडताच कल्याणकरांना आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात आणि शेवट करावा लागतो. वाहतूककोंडीच्या या विळख्यातून कल्याणकरांना सोडवण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत.
प्रशस्त वाडे आणि टुमदार घरांचे ऐतिहासिक शहर ही कल्याणची खरी ओळख. तत्कालीन महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर, यू.पी.एस. मदान, श्रीकांत सिंह यांच्या कार्यकाळात कल्याणची नवी ओळख तयार होण्यास सुरूवात झाली. या तिन्ही आयुक्तांनी शहर विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही धडकपणे केली; मग ते रस्ता रूंदीकरण असो की बेकायदा बांधकामांचा प्रश्न. राजकीय आणि सामाजिक विरोध झुगारून त्यांनी शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी केली. त्यामुळेच कल्याणमध्ये अनेक नवीन रस्त्यांची साखळी तयार होण्याबरोबरच जुन्या आणि महत्त्वाच्या रस्त्यांनी कात टाकली. सध्याच्या काळाबरोबरच त्या काळातही शहर वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असणाºया शिवाजी चौक ते दुर्गाडी, शिवाजी चौक ते पारनाका, शिवाजी चौक ते दूधनाका (गांधी चौकमार्गे), रामबाग, आधारवाडी, मुरबाड रोड आदी रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. मात्र, मोठे, मोकळे आणि सुटसुटीत रस्ते मिळाल्याचा कल्याणकरांचा हा आनंद काही काळच टिकला.
दशकभरात कल्याणचा विस्तार वेगाने झाला, पण तो सुनियोजित पद्धतीने झाला नाही. कल्याणातील मध्यवर्ती ठिकाणांपेक्षा वेशीबाहेरील परिसराचा चेहरामोहरा पार बदलून गेला. दशकभरापूर्वी जंगल आणि ग्रामीण भाग म्हणून सर्वपरिचित असणारी ही ठिकाणे नवीन कल्याणचे ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून उदयाला आली. त्यामध्ये प्रामुख्याने खडकपाडा, संभाजीनगर, आधारवाडी, गांधारी आदी ठिकाणांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याठिकाणी आलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या शेकडो गृहनिर्माण प्रकल्पांनी नवीन कल्याणची पायाभरणी केली. या आलिशान गृहप्रकल्पांमध्ये रहायला येणाºया वर्गामध्ये जुन्या कल्याणातील नागरिकांपेक्षा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्याच लक्षणीय आहे. शहराच्या एकंदरीत लोकसंख्येच्या सुमारे एक तृतियांश लोकसंख्या या परिसरात राहत असून यावरूनच येथील आवाका लक्षात येईल. हा सर्व परिसर तसा शहराच्या बाजारपेठा आणि रेल्वे स्टेशनपासून लांब पडत असल्याने येथील वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामध्ये परिवहन सेवेच्या बस, रिक्षांबरोबरच खाजगी वाहनांची संख्याही बरीच मोठी आहे. याशिवाय शहरातून एक राष्ट्रीय आणि काही राज्य महामार्गही जात असून, येथून ये-जा करणाºया वाहनांचा आकडाही मोठा आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या आणि या वाहनांसाठी अपूरे पडणारे रस्ते, हेच चित्र गेल्या काही वर्षांत कल्याणमध्ये दिसू लागले आहे.

नागरिक कमी, वाहने जास्त
कल्याणमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवरही कोंडी होऊ लागली आहे. मात्र, सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केल्याने वाहतूककोंडीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. आजच्या घडीला कल्याणमध्ये नागरिक कमी आणि वाहनेच जास्त आहेत की काय, असा प्रश्न वाहतुकीच्या समस्येवरून पडू लागला आहे.

बघावे तिथे फक्त वाहने
कल्याणमधील एकही रस्ता असा नाही जिथे वाहतूककोंडी होत नाही. काही वर्षांपूर्वी केवळ सकाळी आणि संध्याकाळी या दोनच वेळेत प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी व्हायची. सध्या मात्र लोकलमधील गर्दीप्रमाणे कल्याणमध्ये केव्हाही कोंडीला तोंड द्यावे लागते.

४० हजारांच्या आसपास रिक्षा
कल्याण आरटीओ हद्दीत रिक्षांची संख्या ४० हजारांच्या जवळपास आहे. शहरातील कोंडीला रिक्षासह अन्य वाहनांची वाढती संख्याही कारणीभूत आहे. रेल्वे परिसर असो अथवा गल्लीबोळ, बेकायदा रिक्षातळामुळे अडथळा निर्माण होत असून रिक्षाच रिक्षा सर्वत्र असे चित्र शहरात दिसत आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता परवाने वाटप करणे बंद करा अशी मागणी होत आहे.

वाहनांच्या लांब रांगा
अंबरनाथ, बदलापूरला जाणारा वालधुनी पूल, पूर्वमधील पूना- लिंक रोड, आनंद दिघे उड्डाणपूल, कल्याण- नगर महामार्गावरील शहाड पूल आदी परिसरामध्ये वाहतूक संथगतीने सुरू असते. सकाळी कामावर जाणारे आणि सायंकाळी घरी परतणाºयांना मनस्ताप सहन करावा लागत असून स्टेशनबाहेर रिक्षातळावर रिक्षा मिळत नाही.

मोठी बाजारपेठ
कल्याणमध्ये कपडे, फर्निचर, सोने, धान्य आदींची स्वस्त आणि मोठी बाजारपेठ असल्याने कल्याणसह अन्य शहरातील व्यापारी आणि नागरिक वाहने घेऊन याठिकाणी येतात. यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी पाहयला मिळते.

Web Title: Kalyan stuck in the maze of a maze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.