जयस्वाल यांचे शक्तिप्रदर्शन; ठाण्यात अभीष्टचिंतनाची पोस्टर्स, जाहिराती, राजकारण्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 03:46 AM2018-04-08T03:46:16+5:302018-04-08T03:46:16+5:30

 Jaiswal's power demonstration; Poster of well-intentioned posters, advertisements and political attendance in Thane | जयस्वाल यांचे शक्तिप्रदर्शन; ठाण्यात अभीष्टचिंतनाची पोस्टर्स, जाहिराती, राजकारण्यांची हजेरी

जयस्वाल यांचे शक्तिप्रदर्शन; ठाण्यात अभीष्टचिंतनाची पोस्टर्स, जाहिराती, राजकारण्यांची हजेरी

Next

ठाणे : ठाणेकरांकरिता अनेक महत्त्वाची विकासकामे करून त्यांची मर्जी संपादन केलेले मात्र गेले काही दिवस शिवसेना-भाजपामधील सत्तासंघर्षाची झळ पोहोचलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा वाढदिवस शनिवारी अनेक सार्वजनिक कार्यक्रम, वृत्तपत्रांतील जाहिराती व शुभेच्छांचे बॅनर्स यांनी साजरा झाला. जयस्वाल यांच्या समर्थनार्थ ठाण्यात शक्तिप्रदर्शन झाले, असेच त्याचे वर्णन करण्यात येत आहे.
जयस्वाल यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या ३१ कार्यक्रमांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. त्यामध्ये भूमिपूजन समारंभ, उद्घाटने, लोकार्पण आदींचा समावेश होता. मात्र, अचानक हे कार्यक्रम रद्द झाले. अर्थात, त्यामागेही शिवसेना-भाजपाचे राजकारण असल्याची चर्चा आहे. भाजपा-शिवसेना हे एकमेकांच्या उरावर बसणारे पक्ष आता गळ्यात गळे घालण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदेश दौऱ्यावर असताना त्यांना डावलून कार्यक्रम करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला, अशी चर्चा आहे. तसेच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यातील उद्घाटन सोहळ्याची आपल्याला कल्पना नसल्याची तक्रार थेट मातोश्रीवर केल्याने उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडला, अशीही चर्चा आहे.
राजकारणामुळे जम्बो सोहळा जरी पुढे ढकलला गेला असला, तरी काही कार्यक्रम करून जयस्वाल यांनी आपला वाढदिवस साजरा केलाच. ठाणेकरांना मालमत्ताकराचे बिल सिटीझन पोर्टल या वेबसाइटद्वारे भरता येईल. या सुविधेचे तसेच ‘एम गव्हर्नन्स’ या प्रशासकीय अ‍ॅपचा शुभारंभ जयस्वाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
ठाणे महापालिकेने मालमत्ताकराचा भरणा करण्यासाठी आॅनलाइन सेवा यापूर्वीच ठाणेकरांना उपलब्ध करून दिली आहे. परंतु, आता त्यापुढे जाऊन सिटीझन पोर्टल ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जाऊन ठाणेकरांना स्वत:च्या मालमत्तेची माहिती भरता येणार आहे. तसेच ठाणे शहरातील प्रत्येक मालमत्ताधारक या पोर्टलवर मोबाइल रजिस्टर करू शकेल. मालमत्ताधारकाला त्यांच्या मालमत्ताकराचा तपशील पाहता येईल. मालमत्ताधारक पोर्टलद्वारे त्यांचे कराचे बिल डाउनलोड करू शकतील व याच पोर्टलद्वारे मालमत्ताकराचा भरणा करू शकतील. करभरणा केल्याची पावती याच पोर्टलद्वारे उपलब्ध होऊ शकेल. प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी एम. गव्हर्नन्स अ‍ॅपचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग समितीची माहिती एकाचवेळी उपलब्ध होणार आहे. कोणत्या ठिकाणी किती वसुली झाली, याची रिअल टाइम माहिती उपलब्ध होईल. मालमत्ताकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्याने याबाबतची रिअल टाइम माहिती वरिष्ठांना एका क्लिकवर कळणे गरजेचे आहे. यामुळे महसूलवसुलीवर प्रभावी नियंत्रण राहणार आहे. मालमत्ता करवसुली वाढवण्याकरिता उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे. महापालिकेने एम. गव्हर्नन्सच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे.

जोगीला तलावाच्या पुनरुज्जीवनाचा फुटला नारळ
अनधिकृत बांधकामांनी बुजलेल्या उथळसर भागातील जोगीला तलावाला नवसंजीवनी देण्याच्या कामाचा शुभारंभ जयस्वाल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. येत्या काही दिवसांत या तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे. येथील विस्थापितांचे बीएसयूपीच्या घरांत पुनर्वसन करण्याबाबतच्या हमीपत्रांचे यावेळी जयस्वाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

दिव्यांग मुलांसोबत साजरा केला वाढदिवस
अभिनय कट्ट्यावर शनिवारी आयुक्तांचा वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. दिव्यांग मुलांनी आपल्या अदाकारीने आयुक्तांच्या वाढदिवस सोहळ्यात चार चाँद लावले. यावेळी दिव्यांग मुलांची अदाकारी पाहून आयुक्तांचे डोळे पाणावले. आयुक्तांनी त्यांना ५१ हजारांचे बक्षीस आणि चॉकलेट भेट दिली. तसेच या दिव्यांगाच्या संस्थेला प्रत्येक वर्षी ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी दिली. तसेच जिद्द शाळा, सिग्नल शाळा येथेदेखील आयुक्तांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

स्ट्रीट आर्ट गॅलरीचा शुभारंभ
कॅडबरी येथील पोखरण रोड नं. १ येथे नव्याने विकसित झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी महापालिकेने उभारलेल्या स्ट्रीट आर्ट गॅलरीचा शनिवारी शुभारंभ झाला. याठिकाणी
ठाणेकरांना स्ट्रीट आर्टचे अनेक प्रकार पाहावयास मिळणार आहेत.

मालमत्ताकर मोबाइल व्हॅन तुमच्या दारी
आयुक्तांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालमत्ताकर गोळा करणाºया मोबाइल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. या व्हॅनच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये आॅनटाइम वसुली होऊ शकेल. तसेच भरलेल्या मालमत्ताकराचे बिल तत्काळ उपलब्ध होईल. याशिवाय, एखाद्या सोसायटीमध्ये वसुलीचा मेळावा घ्यायचा झाल्यास तेथे या मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून ते शक्य होणार आहे.

Web Title:  Jaiswal's power demonstration; Poster of well-intentioned posters, advertisements and political attendance in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे