आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाला तरुणाचा खून, तरुणीच्या भावासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:56 AM2018-03-27T00:56:09+5:302018-03-27T00:56:09+5:30

अवघ्या पाच तासांत या प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांनी प्रेयसीच्या भावासह तिघांना रविवारी अटक केली.

Interrelated love affair caused the murder of the youth and the girl's brother with the arrest of the three | आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाला तरुणाचा खून, तरुणीच्या भावासह तिघांना अटक

आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाला तरुणाचा खून, तरुणीच्या भावासह तिघांना अटक

Next

ठाणे : नळपाड्यातील धर्मवीरनगरात रविवारी सायंकाळी झालेला खून आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अवघ्या पाच तासांत या प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांनी प्रेयसीच्या भावासह तिघांना रविवारी अटक केली.
धर्मवीरनगरातील कै. श्रीपत पाटील गार्डनला लागून असलेल्या मैदानामध्ये २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आढळला. मृताच्या खिशामध्ये पोलिसांना पॅनकार्ड आणि एका तरुणीचे छायाचित्र मिळाले. पॅनकार्डवरून त्याचे नाव वसीम रशीद फकीर खान असल्याचे समजले. मात्र, त्यावर पत्ता नसल्याने पोलिसांनी तरुणीच्या छायाचित्रावरून तपास सुरू केला. पोलिसांकडून चौकशी सुरू असताना ती धर्मवीरनगरचीच रहिवासी असल्याचे समजले. तिला विचारपूस केली असता मृतक भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याला दोन अपत्ये असल्यामुळे तिच्या दोन्ही भावांचा प्रेमसंबंधास विरोध होता. रविवारी दुपारी तिचे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या दोन मित्रांनी विवियाना मॉलजवळून वसीमला आॅटोरिक्षामध्ये सोबत घेतले.
धर्मवीरनगरकडे जाताना त्यांनी वसीमला समजावण्याचा प्रयत्न केला. यातूनच वाद होऊन धर्मवीरनगरातील मैदानामध्ये आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. तिच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतर चितळसर पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवून तीन आरोपींना अटक केली. तिचा भाऊ रतनलाल ऊर्फ सोनू राजनाथ यादव (२६), त्याचे दोन मित्र पोखरण रोड क्रमांक २ वरील अरशद अबुलहसन खान (२१) आणि बाळकुम येथील विवेक सिकंदर यादव (२३) ही आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिचा दुसरा भाऊदेखील या प्रकरणात आरोपी असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.
चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Interrelated love affair caused the murder of the youth and the girl's brother with the arrest of the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.