परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 05:06 PM2019-07-03T17:06:24+5:302019-07-03T17:11:13+5:30

ठाण्यात रविवारी मेधा पाटकरांच्या उपस्थितीत परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा होणार आहे.

Felicitations of united young people and meeting unorganized workers | परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा

परिस्थितीशी लढणाऱ्या युवा एकलव्यांच्या सत्कार आणि असंघटित कामगारांचा मेळावा

Next
ठळक मुद्देगौरवासोबतच एकलव्य सक्षमीकरणावर भर!श्रमिक जनता संघाचा कामगार - कार्यकर्ता निर्धार मेळावानर्मदा आंदोलन हितचिंतक आणि आंदोलन मासिक वाचक मेळावा

ठाणे : गेली सत्तावीस वर्षे घरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही, केवळ जिद्द, मेहेनत आणि चिकाटीच्या जोरावर दहावी एसएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या आजच्या आधुनिक युवा एकलव्यांचा जाहीर सत्कार येत्या रविवारी सात जुलै रोजी ठाण्यात टाऊन हॉल येथे सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रसिद्ध लढवैय्या सामाजिक कार्यकर्त्या साथी मेधा पाटकर आणि कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असरोंडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकर्ते आणि स्वतः परिस्थितीशी लढणारे सुनील दिवेकर आहेत. दरवर्षीप्रमाणे या मुलांना शाबासकी देण्यासाठी आणि समाजातील शैक्षणिक विषमतेचे भीषण वास्तव समजून घेण्यासाठी संवेदनशील नागरिकांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि शक्य असेल तेवढी आर्थिक मदतही करावी, असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजक मनिषा जोशी, अनुजा लोहार आणि अजय भोसले यांनी केले आहे. 

     रोजंदारीवर किंवा तुटपुंज्या उत्पन्नावर काम करणारे कुटूंब व त्या कुटूंबातील लहानग्यांची होणारी होरपळ हे गेले कित्येक वर्ष न संपणारे, उलट वाढत जाणारे वास्तव आहे. तात्पुरत्या किंवा कंत्राटी नोकरी, किंवा किडुक मिडूक व्यवसाय करूनही वाढत जाणाऱ्या समस्या सोडवताना लोकवस्तीत राहणाऱ्या लोकांना जीव नकोसा होतो. अशा कुटुंबातील मुले महानगरपालिकेच्या शाळांतून शिक्षण घेत इ. १० वी S.S.C. परीक्षेत जेव्हा बसतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांना शाळा सर्वतोपरी सर्व सोयी सुविधा देतातच. पण असे विद्यार्थी क्लासला जाऊ शकत नाहीत. घरात अभ्यासाचे वातावरण नाही. मार्गदर्शन मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांचा 'समता विचार प्रसारक संस्था' गेले २७ वर्षे सातत्याने 'एकलव्य गौरव पुरस्कार' देऊन गौरव करत असते. या विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तक पेढी, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करत असते. या वर्षी एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ पुरस्कार देऊन नाही तर दहावीच्या वर्षातच त्यांना अभ्यासपूरक सर्वांगिण मदत मिळेल आणि भविष्यात सक्षम एकलव्य घडेल या भूमिकेतून संस्थेने ठाण्यातील निवडक महापालिका माध्यमिक शाळांमध्ये 'एकलव्य सक्षमीकरण योजना' महापालिकेच्या मदतीने सुरू केली आहे. या योजनेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार आहे. 

        ठाणे, कल्याण, मुंबई परिसरातील कंत्राटी, असुरक्षित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार - श्रमिकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी, श्रमिक जनता संघ या गेली सत्तर हुन अधिक वर्षे काम करणाऱ्या कामगार संघटनेच्या वतीने सदर युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत याच दिवशी ठाण्यात टाऊन हॉल येथे दुपारी दोन वाजता कामगार आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युनियनचे उपाध्यक्ष संजीव साने या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असतील. घंटागाडी कामगार, रस्ते सफाईसाठी महापालिकेने ठेवलेले कंत्राटी कामगार, पाणी खात्यातील कंत्राटी कामगार आदी विविध क्षेत्रातील कामगार आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन युनियनचे चिटणीस आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते साथी जगदीश खैरालिया यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.  दुपारचा कामगार कार्यकर्ता निर्धार मेळावा आणि त्या नंतरचा एकलव्य गौरव कार्यक्रम झाल्यावर टाऊन हॉल येथेच सायंकाळी सात वाजता नर्मदा बचाओ आंदोलनाचे आणि देशातील अन्य जन आंदोलनांचे  हितचिंतक,ठाण्यातील विविध संघटना, चळवळीतील कार्यकर्ते आणि आंदोलन या मासिकाचे वाचक यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती, जन  आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे संवाद माध्यम आंदोलन शाश्वत विकासासाठी या मेधा पाटकर संपादित मासिकाचे कार्यकारी संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. मेधा पाटकर यांचे ठाण्यातील विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हर्षलता कदम, लतिका सु. मो. तसेच निलेश दंत, इनॉक कोलियार, ओंकार जंगम, लता देशमुख हे समता विचार प्रसारक संस्थेचे आणि भास्कर शिगवण, सुनील कंद, मनोज शिर्के, शैलेश राठोड आदी श्रमिक जनता संघाचे कार्यकर्ते मेहेनत घेत आहेत.    

Web Title: Felicitations of united young people and meeting unorganized workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.