एटीएसच्या कारवाईतील एक अतिरेकी पालिकेचा कर्मचारी असल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:14 AM2019-01-24T05:14:17+5:302019-01-24T05:14:23+5:30

एटीएसने अटक केलेल्या अतिरेक्यांपैकी जमान खुटेउपाड (३२) हा पालिकेचा कर्मचारी आहे.

Explaining that the ATS is one of the staff of the Extremist | एटीएसच्या कारवाईतील एक अतिरेकी पालिकेचा कर्मचारी असल्याचे उघड

एटीएसच्या कारवाईतील एक अतिरेकी पालिकेचा कर्मचारी असल्याचे उघड

Next

 - जितेंद्र कालेकर 
ठाणे : एटीएसने अटक केलेल्या अतिरेक्यांपैकी जमान खुटेउपाड (३२) हा पालिकेचा कर्मचारी आहे. त्यामुळे त्याच्यासोबत आणखी काही जणांचा सहभाग आहे का? या दिशेने अधिक तपास सुरू आहे. जमानच्या मदतीने मुंबईतील पाणीसाठ्यातूनही रासायनिक हल्ल्याचा कट होता का? या दिशेनेही एटीएस अधिक तपास करत आहेत.
लोहारा गावात जमानचे आई-वडील, मामा, तसेच इतर नातेवाईक वास्तव्याला आहेत. त्याचे सर्व शिक्षणही तिथेच झाले. लहानपणापासून तो हुशार असल्यामुळे त्याला चांगले गुण मिळायचे. याच जोरावर त्याने डी. फार्मसीही पूर्ण केले. चांगल्या शिक्षणामुळे मुंबईत भायखळा येथे पालिकेच्या रुग्णालयात औषधनिर्माता म्हणून त्याला नोकरीही लागली. एकमार्गी राहणाऱ्या या कुटुंबात जमानचे वर्तन अतिशय चांगले असल्यामुळे, तसेच त्याचा थेट ‘इसिस’शी संबंध जोडला गेल्यामुळे, आता त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसल्याचे त्याचे मामा हसाक यांनी सांगितले. आईवडिलांनाही मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे गावी मिस्त्रीचे काम करणारे नबी (वडील) सारखे भावनाविवश होत आहेत. यात त्यांना सारख्या उलट्या आणि चक्करचा त्रास सुरू झाला आहे.
जमान हा पत्नी तय्यबासह ठाण्याच्या कौसा, अमृतनगर येथील ‘फझील अपार्टमेंट’मध्ये सातव्या मजल्यावर ७०५ क्रमांकाच्या खोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वास्तव्याला आहे. घरातही त्याचे वर्तन अगदी साधे होते. नोकरीनिमित्त कामावर जाणे आणि परत घरी परतणे. त्यामुळे पत्नीलाही काहीच माहीत नसल्याचा तिचा दावा आहे. त्याचे नातेवाइकांशी अधूनमधून बोलणे होत होते. गावी मात्र, ईदसारख्या सणानिमित्तच वर्षभरातून दोन ते तीन वेळा त्याचे येणे होते, असे त्याचे भाऊ अन्वर यांनी सांगितले. त्याचा वर्गमित्र अ‍ॅड. पी. व्ही. घोडके यांनीही मित्रासाठी मुंबईत धाव घेतली आहे. सर्व काही सुरळीत असताना हे असे कसे घडले? या कुटुंबाने कधी पोलीस ठाण्याची पायरीही चढली नाही. इतकी घरातील मंडळी चांगली आहेत.
गेल्या महिनाभरात त्याच्याशी अगदी त्रोटक बोलणे झाल्याचे अ‍ॅड. घोडके म्हणाले. जमानवर नेमके कोणते आरोप लावले आहेत, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. जमानसह इतरही संशयितांच्या नातेवाइकांना ‘एटीएस’च्या मुंबई कार्यालयात बुधवारी बोलावण्यात आले होते. तिथे या नातेवाइकांची संपूर्ण माहिती घेतली असून, त्यांना या सर्व ‘इसिस’ संशयित आरोपींवरील आरोपांची माहिती देण्यात येत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. सर्व आरोपींना औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आल्याचेही या अधिकाºयाने सांगितले.
>इसिसचे मुंब्रा कनेक्शन...
मुंब्रा येथून यापूर्वीही अटक केलेले अतिरेकी आणि अन्य आरोपींचा दोन वर्षांपूर्वी मुंबई एटीएसच्या पथकाने मुंब्रा भागातून मुदब्बीर शेख या इसिसच्या भारताच्या कमांडरला अटक केली होती. कट्टर धार्मिक असलेल्या मुदब्बीरकडूनही अनेक आक्षेपार्ह सामुग्री हस्तगत केली होती. इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील अनेक तरुणांना इसिससाठी प्रेरित करून त्यांना इसिसच्या जाळयात ओढण्याचे काम तो करीत होता. मुदब्बीर पाठोपाठ निझाम शेखलाही अटक केली होती. सध्या मुंब्रा येथून अटक केलेल्या अतिरेकीही त्यांच्याच जवळपास राहणारे आहेत. त्यामुळे तेही त्यांच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला आहे. त्यादिशेनेही अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Explaining that the ATS is one of the staff of the Extremist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.