पर्यावरणस्नेही मखरांना परदेशातही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:41 AM2018-09-11T02:41:18+5:302018-09-11T02:41:25+5:30

थर्माकोलच्या मखरांवर बंदी आल्याने कापड, हॅण्डमेड पेपर, चटया आणि पुठ्ठे अशा पर्यावरणस्नेही साहित्यांपासून बनवलेली मखरे बाजारात आली आहेत.

Eco-friendly demand abroad | पर्यावरणस्नेही मखरांना परदेशातही मागणी

पर्यावरणस्नेही मखरांना परदेशातही मागणी

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : थर्माकोलच्या मखरांवर बंदी आल्याने कापड, हॅण्डमेड पेपर, चटया आणि पुठ्ठे अशा पर्यावरणस्नेही साहित्यांपासून बनवलेली मखरे बाजारात आली आहेत. डोंबिवलीतील भाविकांना त्याची भुरळ पडली आहे. मखरविक्रेत्यांनी बनवलेली ही मखरे सातासमुद्रापार गेली आहेत.
मखरविक्रेते मयूरेश गद्रे म्हणाले, आठ वर्षांपासून आम्ही पर्यावरणस्नेही मखर बनवत आहोत. यंदा बनवलेली पर्यावरणस्नेही मखरे कोल्हापूर, पुणे, वसई, नालासोपारा, इंदूर, दुबई, आॅस्ट्रेलिया येथे गेली आहेत. राज्य सरकारने बंदी घालण्यापूर्वीच आम्ही थर्माकोलची मखरे बनवणे बंद केले. कागदापासून बनवलेल्या मखरांना मोठी मागणी आहे. १५ पासून ४० इंचांपर्यंतचे मखर ६०० ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. थर्माकोलबंदीबाबत ग्राहकांमध्ये चांगली जागृती झाली आहे. त्यामुळे ग्राहक थर्माकोलचे मखर खरेदी करत नाहीत. कागदापासून मोठ्या आकाराचे मखर बनवण्यास मर्यादा येत असल्याने ग्राहकांनी लहान मूर्ती खरेदी करण्याची गरज आहे.
कागदांच्या किमती वाढल्याने त्यापासून बनवलेल्या मखरांची किंमतही १५ टक्क्यांनी वाढली आहे. कागदी मखरांमध्ये ४० डिझाइन, चटयांमध्ये आठनऊ डिझाइन, कापडामध्ये १० ते १२ विविध प्रकार उपलब्ध आहेत. कागदी मखरांना चांगला सपोर्ट दिला आहे. त्यामुळे ती हवेने हलण्याची भीती नसल्याचे गद्रे यांनी सांगितले.
>ग्राहकांची मागणी
वसंत वाघ यांनी प्लायचा वापर करून मखरे तयार केली आहेत. त्यात सिंहासन, कोयरी, छत्री असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मखर फोल्डिंग असल्याने ग्राहक त्यांना पसंती देत आहेत. ही मखरे १८०० रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, असे वाघ यांनी सांगितले.

Web Title: Eco-friendly demand abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.