बायोमेट्रिक मशीनचा फटका; ज्येष्ठ व दिव्यांग शिधावाटप दुकानावरील धान्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 08:07 AM2019-05-15T08:07:10+5:302019-05-15T08:44:12+5:30

डिजिटायझेशनच्या प्रयत्नात ज्येष्ठ, दिव्यांग नागरीकांना मात्र बायोमॅट्रीक यंत्रात बोटांचे ठसे जुळत नसल्याने हक्काच्या शिधावाटप केंद्रावरील धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.

do not match the fingerprints in biometrics, senior citizens ration are deprived of grains | बायोमेट्रिक मशीनचा फटका; ज्येष्ठ व दिव्यांग शिधावाटप दुकानावरील धान्यापासून वंचित

बायोमेट्रिक मशीनचा फटका; ज्येष्ठ व दिव्यांग शिधावाटप दुकानावरील धान्यापासून वंचित

Next
ठळक मुद्देडिजिटायझेशनच्या प्रयत्नात ज्येष्ठ, दिव्यांग नागरीकांना मात्र बायोमॅट्रीक यंत्रात बोटांचे ठसे जुळत नसल्याने हक्काच्या शिधावाटप केंद्रावरील धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. भाईंदरच्या ७८ वर्षीय एलीझाबेथ बाप्टीस्टा या गेल्या दोन वर्षांपासुन आपल्या हक्काच्या धान्यासाठी शिधावाटप कार्यालय व शिधावाटप केंद्राचे उंबरठे झिजवत आहेत. तसाच अनुभव मीरारोडच्या लक्ष्मी नायक या दिव्यांग महिलेला देखील सातत्याने येत आहे.

धीरज परब

मीरारोड - डिजिटायझेशनच्या प्रयत्नात ज्येष्ठ, दिव्यांग नागरीकांना मात्र बायोमॅट्रीक यंत्रात बोटांचे ठसे जुळत नसल्याने हक्काच्या शिधावाटप केंद्रावरील धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. भाईंदरच्या ७८ वर्षीय एलीझाबेथ बाप्टीस्टा या गेल्या दोन वर्षांपासुन आपल्या हक्काच्या धान्यासाठी शिधावाटप कार्यालय व शिधावाटप केंद्राचे उंबरठे झिजवत आहेत. तसाच अनुभव मीरारोडच्या लक्ष्मी नायक या दिव्यांग महिलेला देखील सातत्याने येत आहे.

शिधावाटप केंद्रातील काळा बाजार थांबवण्यासह गरजू आणि योग्य व्यक्तींना शिधावाटप मिळावे म्हणून शिधापत्रिका धारकांची अधारशी लिंक जोडण्यात आली आहे. त्यामुळे शिधावाटप केंद्रातील सवलतीच्या दरातले धान्य, रॉकेल आदी मिळण्यासाठी बायोमॅट्रिक पध्दतीने पत्रिकाधारक व कुटुंबातील सदस्याच्या बोटांचे ठसे घेतले जातात. ठसे जुळले की मगच धान्य दिले जाते. परंतु अनेक ज्येष्ठ, दिव्यांग वा अपघातग्रस्तांची आधार मध्ये नोंदणी असली तरी बोटांचे ठसे मात्र बायोमॅट्रिक यंत्रात जुळत नसल्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून शिधावाटप केंद्रात त्यांना धान्य आदी दिले जात नाही.

परिणामी असे अनेक ग्राहक हक्काच्या सरकारी धान्यासाठी शिधावाटप कार्यालय व विक्री केंद्राचे उंबरठे झिजवत आहेत. ठसे न जुळण्याचे प्रमाण नगण्य असले तरी रास्त दरात मिळणारे धान्य सोडून खासगी दुकानांमधून जास्त दराने खरेदी करावे लागत आहे. यात गरजूंना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातही अशा स्वरुपाची अडचण असल्यास शिधावाटप निरीक्षकाने स्वत: शिधावाटप केंद्रावर जाऊन त्या ग्राहकास धान्य मिळवुन द्यायचे असताना त्यांच्याकडून देखील जबाबदारी झटकण्यासाठी कारणं पुढे केली जात आहेत. या मुळे ज्येष्ठ, दिव्यांग आदी अनेक शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले आहेत.



भाईंदर गावात राहणाऱ्या एलिझाबेथ बाप्टीस्टा या वयाच्या ७८ व्या वर्षी सुध्दा हक्काचे सरकारी धान्य मिळावे म्हणून गेल्या दोन वर्षांपासुन वणवण करत आहेत. त्यांना तीन वेळा अपघात झाले आहेत. वयाच्या अनुषंगाने त्यांचे आधार कार्डावरील बोटाचे ठसे शिधावाटप केंद्रातील बायोमॅट्रीकशी जुळत नाहीत. दुकानात डाळ आदी सवलतीत मिळेल म्हणून त्या धान्य घेण्यासाठी जातात तेव्हा ठसे जुळत नाही म्हणून दुकानदार धान्य देण्यास स्पष्ट नकार देतो. धान्य मिळावे म्हणुन त्यांनी भाईंदर पुर्वेच्या शिधावाटप कार्यालयात अनेकवेळा खेपा मारुन देखील खोटी आश्वासनं आणि उडवाउडवीच्या उत्तरांशिवाय त्यांना काही मिळालं नाही. धान्य मिळावं म्हणून त्यांनी पुन्हा २ मार्च रोजी आधारकार्डमध्ये नोंदणी अपडेट करुन घेतली. तरी देखील ठसे जुळत नसल्याने त्यांना धान्य आजही मिळत नाही.



मीरारोडच्या मेरीगोल्ड वसाहती जवळील दिव्यांग वस्तीत राहणाऱ्या लक्ष्मी नायक या ३२ वर्षीय दिव्यांग महिलेस देखील असाच अनुभव येतोय. बोटाचे ठसे जुळत नाही म्हणुन शिधावाटप केंद्रातील दुकानदार धान्य देण्यास मनाई करतो. पायाने अधु असुनही शिधावाटप कार्यालय, महापालिकेचे उंबरठे सातत्याने झिजवावे लागत आहेत. पण त्यांना देखील हक्काचे सरकारी धान्य अजून मिळालेले नाही. शिधावाटपत्रिका असूनही धान्य मात्र मिळत नसल्याने या वंचितांनी सरकार बद्दल आपला राग व्यक्त केला आहे.

एलिझाबेथ बाप्टीस्टा (जेष्ठ नागरिक ) :- वयाच्या ७८ व्या वर्षी हक्काच्या धान्यासाठी गेली दोन वर्ष मला शिधावाटप कार्यालय आणि रेशन दुकानात चकरा मारायला लावल्या जात आहेत. माझ्यासारख्या अशा अनेकांना बोटांचे ठसे जुळत नसल्याने सवलतीच्या धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. वयोमानाने ठसे जुळत नाहीत यात माझा काय दोष आहे. सरकार आणि प्रशासनाला अजिबात सहानुभूती नाही वाटत का? माझ्या एकटीचा हा प्रश्न नसून अशा सर्वच वंचितांना न्याय मिळायला हवा?

लक्ष्मी नायक (दिव्यांग महिला ) :- शिधावाटप पत्रिका असूनही ठसे जुळत नसल्याने धान्य दिले जात नाही. मग आम्ही गरीबांनी जगायचे तरी कसे? खासगी दुकानातील धान्य परवडत नाही आणि सरकार धान्य देत नाही. आमच्या त्रासाची दखल घ्यायला कोणी नाही.

जे.बी. पाटील (शिधावाटप अधिकारी, मीरा भाईंदर) - ज्यांना बोटांचे ठसे जुळण्यात अडचण होऊन बायोमेट्रिक पद्धतीने धान्य मिळत नसेल तर त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था आहे. अशा शिधापत्रिका धारकांना आम्ही त्या त्या भागातील निरीक्षकांचे क्रमांक दिले असून ते स्वत: दुकानात येऊन धान्य देण्यासाठीची प्रक्रिया करून देतात. जे वंचित आहेत त्यांना तातडीने निरीक्षकांना सांगून धान्य उपलब्ध करून दिले जाईल.

 

Web Title: do not match the fingerprints in biometrics, senior citizens ration are deprived of grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.