‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:40 AM2018-01-29T06:40:47+5:302018-01-29T06:41:24+5:30

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून चार जण बिनविरोध निवडले गेले. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप गुजर यांचाही समावेश आहे. राज्य कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होणार असल्याने नाट्य परिषदेला वेगळा आयाम देण्याचा मानस दिलीप गुजर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

 A different dimension to the Akhil Bharatiya Natya Parishad - Dilip Gujar | ‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर

‘अखिल भारतीय नाट्य परिषदेला वेगळा आयाम’ - दिलीप गुजर

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून चार जण बिनविरोध निवडले गेले. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप गुजर यांचाही समावेश आहे. राज्य कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होणार असल्याने नाट्य परिषदेला वेगळा आयाम देण्याचा मानस दिलीप गुजर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
जिल्ह्यातून चार जागांसाठी पाच अर्ज भरले गेले होते. त्यात विद्याधर ठाणेकर यांचाही समावेश होता. त्यांच्या सूचकाचे नाव मतदारयादीत नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाल्याने डोंबिवलीतून गुजर, कल्याणमधून शिवाजी शिंदे, ऐरोली विभागातून विजय चौगुले व संदीप जंगम बिनविरोध निवडून आले. यापैकी गुजर अनेक वर्षापासून नाट्यक्षेत्राशी निगडीत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना गुजर यांनी सांगितले की, ठाणे, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यातही ही निवडणूक पार पडली. मुंबई आणि उपनगरे असे दोन भाग केले होते. उपनगरात बोरीवली, पालघर, मुलुंड या परिसराचा समावेश होता. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली, कल्याण, अंबनाथ, ऐरोली, वाशी-नवी मुंबईचा समावेश होतो. ३५० मतदारांच्या मागे एक जागा असा निवडणुकीचा निकष आहे. ठाणे जिल्ह्यात एक हजार ४५५ मतदार असल्याने चार जागा होत्या. तेथे बिनविरोध निवडणूक झाली. जळगाव, लातूर, रत्नागिरी, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, बीड आणि नांदेड येथेही बिनविरोध निवडणूक झाली. या सदस्यांची मुदत दोन वर्षे असते आणि त्यांना मतदानाचा हक्क असतो.
नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे कामकाज हाती घेतल्यावर गुजर यांनी सदस्यसंख्या १०० वरून ३५० केली. त्यातील २३५ जणांना मतदानाचा अधिकार होता.
महाराष्ट्र नियामक मंडळाच्या ६० जागा आहेत. त्यातून राज्य कार्यकारिणीवर १५ जण निवडून जातील. ३१ जण ज्यांच्या बाजूने असतील त्या १५ जणांची कार्यकारिणी निश्चित होईल. यापूर्वी झालेल्या नाट्य परिषदेच्या निवडणुकीत पाच हजार मतपत्रिका होत्या. पण नऊ हजार जणांनी मतदान केल्याने निवडणूक वादग्रस्त ठरली होती.

डोंबिवली शाखा
९ वर्षे बंद
दिलीप गुजर हे गेली १० वर्षे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेशी निगडीत आहेत. डोंबिवलीची शाखा नऊ वर्षे बंद होती. पण मोहन जोशी यांच्या सांगण्यानुसार या डोंबिवली शाखेद्वारे विविध कार्यक्रम घेऊन गुजर यांनी शाखा चांगल्या प्रकारे कार्यान्वित केली.

पुढे काय करणार?
नाट्य परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर गेल्यावर संगीत नाट्य महोत्सव भरविण्याचा संकल्प गुजर यांनी व्यक्त केला. त्यात संगीत नाटकाच्या त्रिनाट्यधारा सादर केल्या जातील. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाईल. असे बरेच उपक्रम राबवणार असल्याचे गुजर यांनी सांगितले.

गंगाजळीची कमरतता
नाट्य परिषदेकडे पैसा नाही. त्यामुळे काय व कोणते कार्यक्रम करायचे, त्यासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. गंगाजळी नसल्याने मोठा कार्यक्रम घेता येत नाही. त्यामुळे महत्त्वाची पदे राजकीय व्यक्तींकडे जातात. त्यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात मिळतो. त्यांच्या शिफारसी महत्वाच्या ठरतात. नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी शरद पवार गेल्या ३५ वर्षापासून कार्यरत आहेत, असा तपशील त्यांनी पुरवला.'

डोंबिवली शाखेने
काय केले?
नाट्य परिषदेच्या पाठपुराव्यामुळे कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराचे भाडे कमी झाले. बालभवनात केवळ मुलांसाठी कार्यक्रम होत होते. तेथे आता इतर कार्यक्रमांनाही मुभा आहे. कल्याणच्या अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीमुळे राज्य नाट्यस्पर्धा पनवेलला होणार होती. त्यासाठी आग्रह धरून ती फुले नाट्यमंदिरात आयोजित करण्यास भाग पाडले.

Web Title:  A different dimension to the Akhil Bharatiya Natya Parishad - Dilip Gujar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी