शहर, ग्रामीण भागात आरोग्यसेवेला बुरे दिनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:44 AM2019-04-08T00:44:26+5:302019-04-08T00:45:53+5:30

ज्यावेळेस व्यक्ती आजारी पडते तेव्हा तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. आरोग्यसेवेवर सरकार कोट्यवधी खर्च करत असते. मग ते पैसे जातात कुठे हा खरा प्रश्न आहे

City, rural health and health care bad day! | शहर, ग्रामीण भागात आरोग्यसेवेला बुरे दिनच !

शहर, ग्रामीण भागात आरोग्यसेवेला बुरे दिनच !

ज्यावेळेस व्यक्ती आजारी पडते तेव्हा तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. आरोग्यसेवेवर सरकार कोट्यवधी खर्च करत असते. मग ते पैसे जातात कुठे हा खरा प्रश्न आहे. जर पैशाचा विनियोग केल्यास आरोग्य सेवा निश्चितच सुधारून त्याचा फायदा रूग्णाला होऊ शकेल. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी. नेमका याचाच अभाव असल्याने खासकरून ग्रामीण भागातील गरीब रूग्णांना नाहक फटका बसतो. नाइलाजास्तव उपचारासाठी खासगी रूग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.


कल्याण डोंबिवली महापालिकेची रूख्मिणीबाई व शास्त्रीनगर ही दोन रूग्णालये आहेत. याशिवाय १३ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या रूग्णालयात रूग्णांना पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाही. त्याचे कारण रूग्णालयात विशेष डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्याच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


कल्याणच्या रूख्मिणीबाई रूग्णालयात १२० खाटांची क्षमता आहे. या रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या दोनच असून ते कंत्राटी पद्धतीवर आहे. त्यांना पगारही कमी आहे. रात्रपाळीला कुणीच नसते. रात्रीच्यावेळी एखादी गदरोदर स्त्री प्रसूती व उपचारासाठी आली तर तिला याठिकाणी उपचार मिळत नाहीत. फिजिशीयन, नेत्ररोग, कान-नाक-घसा तज्ज्ञ नसल्याने रूग्णांना या संदर्भातील उपचार मिळत नाहीत. रूग्णालयात दोन भूलतज्ज्ञ आहेत, तेही कंत्राटी पद्धतीवर
आहे. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. रात्रीच्यावेळी दोन्ही भूलतज्ज्ञ नसल्यामुळे शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यातलात्यात दिलासा म्हणजे रूग्णालयात बालरोग व अस्थिव्यंग तज्ज्ञ आहे. हे दोन्ही विभाग चांगल्या स्थितीत आहेत. विशेष म्हणजे अस्थिव्यंग तज्ज्ञ विभागातून आतापर्यंत वर्षभरात २५० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.


सासत्याने दोन्ही रूग्णालयात उपचारासाठी रूग्ण येत असताना डॉक्टरांची पुरेशा प्रमाणात भरती झालेली नाही. परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांचीही संख्या अपुरी आहे. अनेक जण सेवानिवृत्त झाले असून महापालिकेने त्यांची पदेच भरलेली नाहीत. रुग्णालयात वर्षभरात १७ हजार ७१५ जणांचे एक्सरे काढलेले आहेत. त्याचबरोबर दोन हजार ८७५ जणांचा इसीजी काढला आहे. गमत म्हणजे येथे इजीसी तज्ज्ञ नाही. ते काम एक्सरे तंत्रज्ञाकडूनच केले जाते.
शवविच्छेदनगृहात वर्षला १३०० मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. याठिकाणी शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात शवविच्छेदन होत नाही. त्याचा ताण रुक्खिणीबाई रुग्णालयावर येतो. शास्त्रीनगर रूग्णालयात शवविच्छेदन सुरू करण्यासाठी आयुक्तांनी आदेशही काढला होता. मात्र राजकीय दबावामुळे येथील डॉक्टरांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली.


रुक्खिणीबाई रूग्णालयात पॅथेलॉजी लॅब आहे. त्याठिकाणी वर्षाला तीन लाख ६९ हजार २४८ जणांनी त्यांच्या आजाराचे निदान केले आहे. औषधांचा साठा पुरेसा आहे. सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआयची सुविधा रुग्णालयात नाही. ही सुविधा शास्त्रीनगर रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याच्या कामाचे भूमिपूजन झालेले आहे. त्याच धर्तीवर रूख्मिणीबाई रूग्णालयात सुरू करण्याचा मानस सत्ताधारी पक्षाने व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरात पीपीपी तत्त्वावरील डायग्नोस्टीक कंपनी तपासणी करणार आहे. कुत्रा, सर्प आणि विंचू चावलेल्या रूग्णाला देण्यासाठी लस उपलब्ध आहे. कुत्रा चावल्यानंतर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या महिन्याला दोन हजार आहे. कुत्रा गंभीर चावला असेल तर उपचार घेण्यासाठी येणाºया रुग्णांच्या संख्येचा आकडा महिन्याला ५० इतका आहे.
महापालिकेने टिटवाळा येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या महाविद्यालयाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. हे महाविद्यालय तायर झाल्यास रूख्मिणीबाई रूग्णायाची खाटांची संख्या २०० होऊ शकेल त्याचबरोबर आवश्यक कर्मचारी आणि डॉक्टरही उपलब्ध होतील.

जिल्हा मध्यवर्ती रूग्णालयाची दुरवस्था
जिल्हास्तीय दर्जा मिळालेल्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात डॉक्टरसह परिचारिका, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तर बाहयरूग्णालय विभागात रोज ८०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद होत असून त्याप्रमाणात सुविधा नसल्याने रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती व सरकारी प्रसूतीगृह अशी दोन रूग्णालये असून प्रत्येक कॅम्पनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. मध्यवर्ती रूग्णालयात येणाºया रूग्णांची संख्या बघता, रूग्णालयाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे.


२५० खाटांच्या या मध्यवर्ती रूग्णालयात कर्जत, कसारा, कल्याण ग्रामीण, शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ आदी शहरातून शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. जागतिक बँकेच्या मदतीने मिळालेली अत्याधुनिक मशीन धूळखात आहेत. मध्यंतरी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाली होती. मात्र पुन्हा अनेक डॉक्टरांची पदे रिक्त झाल्याचे चित्र मध्यवर्ती रूग्णालयात आहे.सिटी स्कॅन मशीन, सोनोग्राफ्री आदींसह इतर अत्याधुनिक मशीनवर वाढत्या रूग्णांचा ताण पडत असल्याची प्रतिक्रीया डॉक्टरांनी दिली आहे. कॅम्प नं-चार परिसरात सरकारी प्रसूतीगृह असून सकाळी येथे बाह्यरूग्ण विभागात शेकडो रूग्ण उपचार घेतात.
२५० पेक्षा जास्त मुलांचा येथे दरमहा जन्म होतो. दोन वर्षापूर्वी येथील रूग्णालयाचा विस्तार होऊन रूग्णालयावर एक मजला चढविण्यात आला. तर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांसाठी शेजारीच निवासी इमारत बांधण्यात आली. दोन्ही रूग्णालयात अनेकदा औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने गरीब व सर्वसामान्य नागरिकांना बाहेरून औषध खरेदी करावी लागतात. मध्यवर्तीसह सरकारी प्रसूतीगृहात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून वेळेत रूग्णांना औषधौपचार मिळत नसल्याची टीका होत आहे. मध्यवर्ती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे यांनी रूग्णालयात येणाºया रूग्णांची संख्या मोठी असल्याचे सांगून त्याप्रमाणात डॉक्टरांसह इतर कर्मचाºयांची संख्या कमी असल्याचे सांगितले.


बाह्यरूग्ण विभागात रूग्णांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त वाढल्याने, त्याचा ताण रूग्णालयावर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. तर कामगार विमा रूग्णालयाची १२५ कोटीच्या निधीतून पुनर्बांधणी होणार असून गेल्या महिन्यात रूग्णालयाचे भूमिपूजन झाले. कामगार रूग्णालयाची इमारत धोकादायक झाली असून तात्पुरत्या स्वरूपात तेथे उपचार केले जातात. शस्त्रक्रिया विभाग केव्हाच बंद पडला असून खाजगी रूग्णलयात शस्त्रक्रिया करून बिल दिले जाते.

Web Title: City, rural health and health care bad day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.