भातसाजवळील खैरपाड्यातील नागरिकांची टँकरवरच मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:59 AM2019-04-29T00:59:25+5:302019-04-29T01:00:37+5:30

विहिरीची अवस्था बिकट : शिडी टाकून काढावे लागते पाणी, जानेवारीपर्यंतच असतो साठा

Citizens of Khairpada near Bhatsa are on the tankers | भातसाजवळील खैरपाड्यातील नागरिकांची टँकरवरच मदार

भातसाजवळील खैरपाड्यातील नागरिकांची टँकरवरच मदार

Next

जनार्दन भेरे/वसंत पानसरे

भातसानगर : शहापूर तालुक्यातील डोंगरदऱ्यांवर तसेच दूर अंतरावर असलेल्या गावपाड्यांवर तर पाणीटंचाईचे सावट आहेच. पण, भातसा धरणाच्या खालीच असलेल्या पाड्यावरही टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे दिसते आहे. भातसा धरणाच्या खाली आणि नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेला पाडा म्हणजे खैरपाडा. या पाड्यात केवळ १६ घरे असली, तरी पाड्याची लोकसंख्या १५० च्या जवळपास आहे. या पाड्यातील घरांची संख्या २७ आहे. १६ घरे असणाºया या खैरपाड्यात मात्र, नागरिक पाण्यासाठी टँकरच्या येण्याकडे डोळे लावून बसतात. या गावाला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या नागरिकांसाठी पाण्यासाठीचा इतर कोणताच सोर्स नसल्याने त्यांची सारी मदार टँकरवरच आहे. या पाड्यातील एकमेव विहीर ही शेताच्या बांधाच्या बाजूला आहे. या विहिरीत पाणी झिरपण्यास कोणत्याही झºयाचा स्रोत नसल्याने ही विहीर केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. हे पाणी जानेवारीपर्यंत पुरते. त्यानंतर मात्र, गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

विहिरीतील पाणी कमी झाले की, विहिरीत शिडी टाकून पाणी काढून घेतले जाते. गावाला विहिरीची गरज असून जर गावाच्या आजूबाजूला आणखी विहिरी असल्या तर पाण्याच्या टंचाईवर बºयापैकी मात करता येईल, असे मत सरलांबे ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर सोमा रेरा यांनी सांगितले.

पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने टँकर कधी येतो, याची वाट पाहावी लागते. सध्या गावाच्या बाजूला टाक्या ठेवून त्यामध्ये टँकरने पाणी टाकले जाते. - गुरु नाथ शिडू रेरा, ग्रामस्थ

तानसा धरणाखालील सावरदेव आदिवासीपाड्याला भीषण टंचाई
किन्हवली : मुंबई, ठाण्यासह उपनगरांची तहान भागवणाºया शहापूर तालुक्यातील धरणांच्या उशाशी असणाºया गावपाड्यांमध्ये भयंकर पाणीटंचाई असून तालुक्यातील तानसा धरणाखाली असणाºया सावरदेव या २०० आदिवासी लोकवस्तीच्या पाड्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. समोर पाणी दिसत असूनही घसा कोरडाच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आदिवासी महिला व्यक्त करत आहेत.

तानसा अभयारण्याच्या कुशीत आणि तानसा तलावाला लागून असलेल्या या आदिवासीपाड्यात ४० ते ५० घरे आहेत. जेमतेम २०० लोकसंख्या असूनही या महिलांना हंडाभर पाण्यासाठी तासन्तास ताटकळावे लागते.अघई ग्रामपंचायत हद्दीत असणाºया या पाड्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याबरोबरच पाण्यासाठी अनेकदा पहाटेपहाटे तळ गाठलेल्या विहिरीवर महिलांना जावे लागते.

या आदिवासीपाड्यामध्ये शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात का होईना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आम्ही पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. - भानुदास भोईर, ग्रामस्थ

सावरदेव गावातील पाणी आटल्याने त्यांना टंचाई जाणवते आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी टँकरचा पाणी घ्यायला नकार दिला होता. येथील लोकसंख्या १८० असून त्यांना टँकरने १२ हजार लीटर पाणी दिवसाआड देण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. - एम. आव्हाड, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, पं. समिती, शहापूर

Web Title: Citizens of Khairpada near Bhatsa are on the tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.