मुख्यमंत्री अडीच तास उशिरा आल्याने सभेतून महिलांनी घेतला काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 02:39 AM2019-04-23T02:39:52+5:302019-04-23T06:51:09+5:30

बिस्किटे, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप; कडक उन्हामुळे आणलेली गर्दी पांगली

The Chief Minister took a two-and-a-half hour delay and took the women to the meeting | मुख्यमंत्री अडीच तास उशिरा आल्याने सभेतून महिलांनी घेतला काढता पाय

मुख्यमंत्री अडीच तास उशिरा आल्याने सभेतून महिलांनी घेतला काढता पाय

Next

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराकरिता सोमवारी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल अडीच तास उशिराने दाखल झाले. दुपारी ४ वाजल्यापासून पोरंबाळं घेऊन बसलेल्या बाया फडणवीस येईपर्यंत पार मेटाकुटीला आल्या होत्या. त्यामुळे सभा सुरू होताच मागील बाजूस असलेल्या महिलांनी मुलांना घेऊन सभास्थानातून काढता पाय घेतला. दुपारीच सभास्थानी भेट दिली, तर महिलांचा एक घोळका सभास्थानाच्या प्रवेशद्वारापाशी पैशांची मागणी करत थांबला होता. त्यामुळे ४०० रुपये, बिस्किटांचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या हे आमिष दाखवून गर्दी गोळा केल्याची चर्चा सभास्थानी कानांवर पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याचा साफ इन्कार केला.

सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारले होते. व्यासपीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मोठे कटआउट्स लावले होते. यावर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे होती. सभेला येणारे कार्यकर्ते आणि श्रोत्यांसाठी चार हजार खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे झेंडे सभास्थानी लावण्यात आले होते. एरव्ही, या मैदानात कचऱ्याच्या घंटागाड्या उभ्या केल्या जातात. परंतु, सोमवारी सभा असल्याने त्या तेथून हटवण्यात आल्या होत्या.
 



एवढेच नव्हे तर मैदानात धूरफवारणी आणि जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली होती. या सभेसाठी मैदानालगतचे काही रस्ते ‘एकदिशा मार्ग’ करण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या काही हौशी कार्यकर्त्यांनी मोदींचा चेहरा असलेले मास्क लावले होते, तर काहींनी मोदी अगेन अशा अक्षराचे टी-शर्ट परिधान केले होते. उल्हासनगर, भिवंडीसह कल्याण पश्चिम आणि आजूबाजूच्या भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थिती लावली होती. विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही सभेला हजेरी लावली होती. सभेची वेळ दुपारी ४ ची होती. त्यामुळे साडेतीन वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मैदानात येण्यास सुरुवात केली.

दुपारची वेळ असल्याने उन्हाची काहिली असह्य झाल्याने सभेसाठी आलेल्यांनी खुर्च्या उचलून सावलीचा आडोसा घेतला होता. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हेलिपॅडची सुविधा करण्यात आली होती. त्याठिकाणी सायंकाळी सव्वापाचला मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लॅण्ड होईल आणि ते पुढील २० मिनिटांत सभास्थळी दाखल होतील, असे नियोजन केले होते. परंतु, पालघरच्या सभेला मुख्यमंत्री उशिराने पोहोचल्याने त्यांच्या सभांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. तब्बल अडीच तास उशिराने म्हणजेच पावणेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. या सभेला भाडोत्री गर्दी जमविल्याचीही जोरदार चर्चा होती. दुपारपासून सभास्थानी फेरफटका मारला असता प्रवेशद्वारापाशी काही महिलांनी उभे राहून पैसे द्या, मगच आता प्रवेश करतो, असा पवित्रा घेतल्याचे पाहावयास मिळाले. पक्षाचे पदाधिकारी त्यांची समजूत काढत होते.



कालांतराने सभास्थानी बसलेल्या महिला व मुलांच्या हातांत बिस्किटांचे पुडे, पाण्याच्या बाटल्या दिसत होत्या. मुख्यमंत्री येण्यास विलंब झाल्याने मुले रडू लागली, त्यामुळे मागे बसलेल्या बाया मुलांना काखोटीला मारून मैदानातून बाहेर पडल्या. त्यामुळे जेवढे कार्यकर्ते होते, तेच सभेला थांबले आणि भाडोत्री कार्यकर्त्यांनी मैदान सोडले, अशी चर्चा सभास्थानी होती. सभेच्या पुढील आणि मागील बाजूस असलेल्या खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता प्रत्येक पदाधिकाऱ्यांना १०० हून अधिक माणसे सभेला आणण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती मिळाली. सभेच्या बाहेर उभ्या असलेल्या काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून कुणालाही मत द्या, पण मतदान करा, असे आवाहन केले.

काय म्हणतात कार्यकर्ते
मोदींना पुन्हा एकदा संधी द्यायला काय हरकत आहे? आघाडी सरकारच्या काळात महागाई नव्हती का?
- निलेश म्हात्रे, तरुण, डोंबिवली

मोदींशिवाय या देशाला पर्याय नाही. त्यांचा पाच वर्षांचा कारभार हा चांगलाच राहिला आहे. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी मोदींसारखे नेतृत्व देशाला हवे आहे.
- दिनेश पाटील, तरुण, कल्याण

सभेला आलेली गर्दी ही भाजप कार्यकर्त्यांसह समर्थकांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचे प्रेम असून त्यापोटी लोक सभेला आले होते.
- डॉ. राजू राम, भाजपचे ठाणे विभाग सचिव

450 पोलिसांचा बंदोबस्त
मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने फडके मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दोन पोलीस उपायुक्तांसह अन्य अधिकारी आणि कर्मचाºयांसह सुमारे साडेचारशे पोलीस सभास्थानी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. वाहतूक पोलीसही ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होती. मात्र, सभेच्या ठिकाणचे काही मार्ग बंद करण्यात आले होते.

Web Title: The Chief Minister took a two-and-a-half hour delay and took the women to the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.