वादाविना साजरा करू गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:54 AM2018-08-27T03:54:34+5:302018-08-27T03:54:57+5:30

Celebrate the Ganesh Festival | वादाविना साजरा करू गणेशोत्सव

वादाविना साजरा करू गणेशोत्सव

Next

मुंबई आणि नाशिकमध्ये गणेशोत्सवांना देण्यात येणाऱ्या परवानगीच्या मुद्यावरून वातावरण तापले असताना ठाण्यात मात्र यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका आणि ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन प्रयत्न सुरू केले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठका झाल्या. या बैठकीत नियमांचे पालन करण्याचे आश्वासन मंडळांनी दिले आहे. परवानगीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. परंतु, एवढे असूनही काही ठिकाणी परवानगीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच मंडपांसाठी रस्ते खोदण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी नियमाला अनुसरून मंडपउभारणीचे काम सुरू झाले आहे. जी मंडळे नियमाला बगल देतील, त्यांच्यावर कारवाईची कुºहाड उठेल. लागलीच त्या वादाला राजकीय रंग प्राप्त करण्याचा प्रयत्न करून मंडळे कारवाईतून सुटतील, असा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जाण्याची शक्यता आहे. परंतु, यंदा गणेशोत्सव वादाविना पार पाडण्याची सर्वांचीच इच्छा आहे.

बहुतांश गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे आम्हाला कायदे, नियम शिकवणारे हे कोण टिकोजीराव, अशी त्यांच्यापैकी काहींची भावना असते. लोकांनी १० दिवस थोडा त्रास सहन केला तर काय बिघडले, असे बोलण्याचा उद्दामपणा काही मंडळांच्या काही पदाधिकाºयांकडून दाखवला जातो. उत्सव, सण साजरे करताना लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुळात उच्च व सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे आदेश देण्याची वेळ आपल्यावर का यावी, हाच प्रश्न आहे. त्यामुळे रस्त्यात मंडप ठोकून वाहतुकीला अडथळा करणे, रात्री १० नंतर डीजे लावून धांगडधिंगा घालणे, असे प्रकार टाळून ठाण्यातील मंडळांनी सुज्ञ नागरिक असल्याचे दाखवून दिले पाहिजे.

गणेशोत्सव मंडळांबरोबर वादाचा तिढा काही प्रमाणात सोडवला आहे. मंडळे आणि प्रशासन यांच्यात बैठक होऊन नियमावलीवर साधकबाधक चर्चा झाली आहे. या चर्चेत गणेशोत्सव मंडळांना उशिराने मिळणारी परवानगी, एकखिडकी योजनेची अंमलबजावणी, मंडपाच्या आवारात लावण्यात येणाºया जाहिरातींवर सूट मिळावी, विसर्जन घाटावर क्रेन किंवा तारपाची व्यवस्था व्हावी, विसर्जनघाटावर महापालिका कर्मचाºयांची संख्या वाढवावी, महापालिकेकडून तयार करण्यात येणाºया नियमावलीची माहिती मंडळांना मिळावी, आदी महत्त्वाच्या विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. तसेच गणेशोत्सवाच्या काळात अग्निशमन विभाग, पोलीस यांची परवानगी घ्यावी लागते. परंतु, त्यास बराच विलंब होत असतो. त्यावर पर्याय म्हणून ‘एकखिडकी योजना’ राबवण्यात यावी. शिवाय, आॅनलाइन फॉर्म उपलब्ध असले तरीसुद्धा आॅफलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही चर्चा झाली. गणेशमूर्तींच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या वेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवावे. विसर्जनानंतर मोठ्या गणेशमूर्तींची विटंबना होऊ नये, याची काळजी घ्यावी, तसेच गणेशमूर्तींची उंची मर्यादित ठेवण्यासाठी पालिकेने नियमावली करावी. तलावांच्या ठिकाणी कृत्रिम विसर्जनघाट तयार करावे. रस्ते अडवणाºया फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशा काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मुदलात येता गणेशोत्सव निर्विघ्न पार पडेल, अशी आशा आपण बाळगू या, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, गणेशोत्सवांच्या मंडपासाठी एक चतुर्थांशपेक्षा जास्त रस्ता अडवू नये. मंडपाची उंची ३० फुटांपेक्षा जास्त असू नये. पूर्वपरवानगी ३० दिवस आधी घ्यावी. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारावा. वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांची एनओसी बंधनकारक, मंडपांसाठी रस्ते खोदल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. टीएमटी बसमार्गावर १२ फूट रस्ता मोकळा ठेवावा. मागील वर्षी ज्या जागेची परवानगी देण्यात आली होती, त्याच जागेची परवानगी देण्यात येईल, अशा अनेक अटींची आदर्श आचारसंहिता ठाणे पालिकेने उत्सवांसाठी तयार केली आहे. त्यातही ठाणे महापालिकेच्या ठरावानुसार जागेचे भाडे व इतर सुविधांचे शुल्क संबंधित अर्जदाराकडून वसूल केले जाणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी ही आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली. परंतु, त्या आचारसंहितेचे पालन तुरळक होत होते. दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन करणाºया मंडळांना पालिकेने नोटिसा बजावून एक लाख रुपये भरण्याचे फर्मान काढले होते. परंतु, त्याला राजकीय विरोध झाल्याने पालिकेला आपली तलवार म्यान करावी लागली होती. मागील वर्षी राज्य सरकारनेच गणेशोत्सवात विघ्न न आणण्याचे निर्देश दिल्याने पालिकेला आपली आदर्श आचारसंहिता अडगळीत टाकावी लागली होती. सरकार अशी बोटचेपी भूमिका घेत असल्यानेच दहीहंडीच्या थरांपासून गणेशोत्सवातील मंडपांपर्यंत सारे विषय न्यायालयाच्या स्तरावर जातात.

आता पालिकेने आॅनलाइन अर्ज उपलब्ध केले असून त्या अर्जाच्या शेवटच्या ठिकाणी आम्ही पालिकेने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करू. परंतु, त्याचे उल्लंघन झाल्यास त्यास मंडळ सर्वस्वी जबाबदार असेल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज भरतानाच मंडळांना तशी हमी द्यावी लागणार आहे.

गणेशोत्सव मंडळे आणि त्यांना विविध परवानग्या देणाºया महापालिकांचे प्रशासन यांच्यातील वाद हे नैमित्तिक झाले आहेत. रस्त्यात मंडप उभे करणे, रात्री-अपरात्री डीजे लावणे, हे ना धार्मिक असल्याचे ना पुरुषार्थ दाखवल्याचे लक्षण आहे. मात्र, बहुतांश गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने काहीवेळा आडमुठी भूमिका घेतात. यंदा ठाण्यात कुठल्याही वादाविना गणेशोत्सव साजरा करून नवा आदर्श घालून देण्याची संधी आहे.
 

Web Title: Celebrate the Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.