सीडीआर प्रकरण : मुंबईच्या आणखी एका गुप्तहेरास अटक, यवतमाळ पोलिसांकडून नव्याने चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:39 AM2018-02-14T02:39:02+5:302018-02-14T02:39:11+5:30

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई येथील एका गुप्तहेरास अटक केली. किर्तेश कवी (४४) असे अटक करण्यात आलेल्या खासगी गुप्तहेराचे नाव आहे.

CDR Case: Another suspect in Mumbai arrested, new investigation by Yavatmal police | सीडीआर प्रकरण : मुंबईच्या आणखी एका गुप्तहेरास अटक, यवतमाळ पोलिसांकडून नव्याने चौकशी

सीडीआर प्रकरण : मुंबईच्या आणखी एका गुप्तहेरास अटक, यवतमाळ पोलिसांकडून नव्याने चौकशी

Next

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई येथील एका गुप्तहेरास अटक केली. किर्तेश कवी (४४) असे अटक करण्यात आलेल्या खासगी गुप्तहेराचे नाव आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १0 झाली आहे. ठाणे न्यायालयाने किर्तेशला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी नव्याने चौकशी सुरू केली आहे.
कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो १0 ते १२ हजार रुपयांमध्ये विकणाºया टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ने गत महिन्यात केला. या प्रकरणी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. मंगळवारी या प्रकरणी खासगी गुप्तहेर किर्तेशला अटक केली. किर्तेश गोरेगाव येथे स्वत:ची गुप्तहेर संस्था चालवतो. सीडीआर प्रकरणामध्ये पोलिसांनी कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर याला आधीच अटक केली होती. किर्तेश कवी हा पालेकरला सीडीआर पुरवायचा, अशी पोलिसांची माहिती आहे.
पोलीस या प्रकरणाचा सूत्रधार सौरव साहू याच्या शोधात आहेत. त्याच्या अटकेसाठी गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १चे पथक नुकतेच दिल्ली येथे जाऊन आले. मात्र सौरव पोलिसांच्या हाती लागला नाही. सौरवच्या अटकेतून या प्रकरणाशी संबंधित बहुतांश प्रश्नांची उकल होऊ शकेल असा पोलिसांना विश्वास आहे. सौरव साहूने त्याच्या कामासाठी मुंबईत काही हस्तक नेमले होते. किर्तेश कवी हा त्यापैकीच एक आहे. किर्तेशच्या अटकेने सौरवपर्यंत पोहोचणे आणखी सोयीचे होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
तर दुसरीकडे या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी अंतर्गत चौकशी सुरू केली असून आवश्यकतेनुसार या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्याची भूमिकाही यवतमाळ पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
पोलिसांनी अजिंक्य नागरगोजे याला मागील आठवड्यात पुण्यातून अटक केली होती. अजिंक्य मूळचा यवतमाळचा असून, त्याने सीडीआर मिळवण्यासाठी यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेल आयडीचा दुरूपयोग केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. अजिंक्य स्वत: सायबर तज्ज्ञ असून, यवतमाळ पोलिसांची वेबसाईट त्यानेच तयार केली होती. वेबसाईट तयार करताना त्याने यवतमाळ पोलिसांची संगणकीय प्रणाली हाताळली होती. त्या वेळी पोलीस अधीक्षकांचा कार्यालयीन ई-मेल आयडी एक लिपिक वापरत असताना, त्याचा पासवर्ड अजिंक्यने चोरून बघितला होता. पुढे याच ई-मेल आयडीचा वापर करून अजिंक्यने वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांकडून १११ सीडीआर मिळवले. अजिंक्यने या सर्व कारनाम्यांची कबुली ठाणे पोलिसांजवळ दिली आहे. मात्र त्यावर विसंबून न राहता, यवतमाळ पोलिसांनी स्थानिक स्तरावर अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
वेबसाईट तयार करण्याच्या निमित्ताने अजिंक्यने यवतमाळ पोलिसांची संगणकीय प्रणाली हाताळली होती. या प्रणालीचा वापर करून तो आणखी काही गैरफायदा घेत होता का, याची चौकशी यवतमाळ पोलीस करीत आहेत. नागरगोजे सीडीआर मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या ई-मेल आयडीवरून संबंधित मोबाइल कंपनीला ई-मेल पाठवायचा. त्यानंतर मोबाइल कंपनीने पाठविलेला सीडीआर डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा ई-मेल सुरू करायचा. कार्यालयीन ई-मेलचा अन्य ठिकाणाहून एवढ्या वेळा वापर होत असताना हा प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित कर्मचाºयांच्या निदर्शनास कसा आला नाही, या प्रश्नावरही चौकशी सुरू असल्याचे यवतमाळचे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी सांगितले.

अलर्ट सुविधा नसल्याने घोळ
कुणाचेही जी-मेल अकाउंट त्याच्या नेहमीच्या संगणक अथवा मोबाइल फोनव्यतिरिक्त अन्यत्र कुठूनही हाताळले गेले की संबंधित व्यक्तीच्या जी-मेलवर लगेच अलर्ट येतो. गुगलने ती विशेष सुविधा खातेदारांना दिली आहे.
शासनाच्या ई-मेल सेवेमध्ये तशी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे आरोपी नागरगोजे याने पोलीस अधीक्षकाचा कार्यालयीन ई-मेल वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून हाताळला तरी खातेदारास अलर्ट मिळाला नाही. शासकीय ई-मेल यंत्रणेतील ही उणीव आरोपीच्या पथ्यावर पडली. ही उणीव अतिशय गंभीर असून, ती शासनाच्या निदर्शनास आणून देऊ, असे राजकुमार यांनी सांगितले.

सायबरतज्ज्ञ म्हणून नागरगोजे याने पोलिसांना सायबर प्रशिक्षण दिले आहे. त्यानेच असा गैरप्रकार करावा, हे कमालीचे धक्कादायक आहे. सीडीआर प्रकरणात स्थानिक स्तरावर काय चुका झाल्या किंवा भविष्यात काय खबरदारी घेण्याची गरज आहे, याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीनुरुप कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.
- राज कुमार, पोलीस अधीक्षक, यवतमाळ

Web Title: CDR Case: Another suspect in Mumbai arrested, new investigation by Yavatmal police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.