कल्याणमध्ये रंगणार बौद्ध साहित्य संमेलन

By Admin | Published: November 8, 2016 02:12 AM2016-11-08T02:12:28+5:302016-11-08T02:12:28+5:30

‘प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी’तर्फे ११ डिसेंबरला एक दिवसाचे बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे.

Buddhist Sahitya Sammelan in Kalyan | कल्याणमध्ये रंगणार बौद्ध साहित्य संमेलन

कल्याणमध्ये रंगणार बौद्ध साहित्य संमेलन

googlenewsNext

कल्याण : ‘प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी’तर्फे ११ डिसेंबरला एक दिवसाचे बौद्ध साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. या संमेलनासाठी निधी मिळावा, यासाठी अकादमीच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. निधी देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन देवळेकर यांनी शिष्टमंडळास दिले आहे.
बौद्ध साहित्य संमेलन कल्याण पश्चिमेतील वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या भव्य प्रांगणात भरविले जाणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद सुनील सोनवणे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद व चर्चासत्रे होतील. या संमेलनास डॉ. यशवंत मनोहर, भाऊ लोखंडे, ज. वि. पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचा खर्च १५ लाख रुपये आहे. अकादमीला १५ लाखांचा निधी मिळाल्यास उत्तम. मात्र त्यापैकी काही खर्च म्हणून महापालिकेने अकादमीला संमेलनासाठी निधी द्यावा, अशी मागणी अकादमीचे प्रमुख सुनील सोनवणे, साहित्यिक निरंजन पाटील यांनी केली आहे. यावेळी अकादमीतर्फे चंद्रशेखर भारती, ‘मैत्रेय महिला संस्थे’च्या नंदिनी साळवे आदी उपस्थित होते. संमेलनासाठी स्वनिधीतून १० लाख रुपये उभारण्याचा अकादमीचा मानस आहे. महापालिकेने संमेलनासाठी किमान तीन लाख रुपये निधी द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निधीसाठी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांच्याकडेही अकादमीने मागणी केली आहे. पवार यांनी यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन अकादमीस दिले आहे. तसेच त्यांनी निधीसाठी अकादमीला महापालिकेकडे पाठवले आहे. आमदार निधीतून जास्त निधी संमेलनास देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अकादमीच्या शिष्टमंडळास देवळेकर म्हणाले की, निधी देण्याबाबत मी सकारात्मक आहे. निधी जास्त हवा असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी. त्यांनी आयुक्तांना पत्राद्वारे संमेलनास निधी देण्याचे आदेश दिल्यास आयुक्त संमेलनास तातडीने निधी उपलब्ध करून देतील. संमेलनाच्या आयोजनासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे निधीचा विषय लवकर मार्गी लावावा, याकडे अकादमीचे प्रमुख सोनवणे यांनी लक्ष वेधले आहे.


मागील आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो थेरो यांनी सरकार हिंदू धर्माला राजाश्रय देत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
बौद्ध धम्माच्या कार्यक्रमास सरकारकडून निधी जाता नाही. त्यानंतर बौद्ध साहित्य संमेलन भरविले जात आहे. त्याला सरकारने निधी देण्याचा विचार न केल्यास बोधीपालो यांचा आरोप खरा असल्याचे पुन्हा सिद्ध होईल.
कल्याणमध्ये बौद्ध साहित्य संमेलन तर डोंबिवलीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निधीचाही मुद्दा प्रचंड गाजत आहे. संस्कृती रुजवण्यासाठी साहित्य संमेलने भरविली जातात.
संमेलनाच्या विचारधारा वेगळ््या असल्या तरी अभिजन व बहुजन साहित्य संमेलन प्रबोधनासाठी भरविले जाते, असे सांगून ‘प्रज्ञा साहित्य अकादमी’चे सोनवणे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टीका टिप्पणी करण्याचे सोयस्कररित्या टाळले आहे.
 

 

Web Title: Buddhist Sahitya Sammelan in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.