भाजपाचे ठाणे, कल्याण मतदारसंघ हेच लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 02:31 AM2018-08-10T02:31:18+5:302018-08-10T02:31:29+5:30

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप वेळ असला, तरी ठाण्यात भाजपाने या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

BJP's Thane, Kalyan constituency is the only goal | भाजपाचे ठाणे, कल्याण मतदारसंघ हेच लक्ष्य

भाजपाचे ठाणे, कल्याण मतदारसंघ हेच लक्ष्य

Next

- अजित मांडके
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप वेळ असला, तरी ठाण्यात भाजपाने या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवाराबाबत गुप्तता पाळली असली, तरी उमेदवार कोणीही असला, तरीही कामाला लागण्याचा सल्ला ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना अलीकडेच एका बैठकीत देण्यात आला.
याचाच अर्थ भाजपाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेतही दिले आहेत. बुथपातळीवर जाऊन काम करण्याचे फर्मान पदाधिकाºयांना आतापासून काढण्यात आले आहे. त्यामुळे आता पदाधिकारी कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी असतानाही आतापासूनच ठाणे जिल्हा काबीज करण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी टाकून श्रेष्ठींनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी आता खूप महत्त्वाचे ठरणार आहे. भिवंडी मतदारसंघ आधीच भाजपाच्या ताब्यात आहे. परंतु, आता ठाणे आणि कल्याण मतदारसंघांवर त्यांचा डोळा आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ वेगळा असला, तरी त्यावर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने आपला ठसा उमटवला आहे. सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे मतदारसंघावर शिवसेनेचा वरचष्मा आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीत लढले असल्याने या दोन्ही मतदारसंघांवर शिवसेनेला विजय मिळवता आला होता. परंतु, आता दोघांनीही स्वबळाची तयारी सुरू केल्याने या मतदारसंघांत युतीमधील या पक्षांमधील घमासान पाहायला मिळणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदेपुत्राचा पराभव करून शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. त्यामुळे येथे संभाव्य उमेदवाराची जोरदार चाचपणी सुरू झाली आहे. या मतदारसंघातून सुरुवातीला कपिल पाटील यांचे नाव चर्चेत होते. परंतु, ते मागे पडून पुन्हा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. परंतु, त्यांना राज्यातील राजकारणात राहण्यात रस असल्याने चव्हाण इच्छुक नसल्याचे भाजपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. किसन कथोरे यांनाही उमेदवारीकरिता गळ घालण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, त्यांचीही मानसिकता कल्याण मतदारसंघातून लढण्याची नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कदाचित येथे आयात केलेला धनदांडगा उमेदवार भाजपा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिंदे यांच्या ताकदीचा सामना करील, असा उमेदवार देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. मागील निवडणुकीत भाजपाची लाट असल्याने ते चांगलेच तरले होते. परंतु, या खेपेला मात्र या दोन्ही पक्षांनी वेगळी चूल मांडून स्वबळाचा नारा दिल्याने विचारे यांना येथे धक्का देण्याची रणनीती भाजपाकडून आखली जात आहे. विचारे यांना धक्का देण्यासाठी सुरुवातीला विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु, येथे भाजपाने आयात केलेल्या उमेदवारासाठी जोरदार तयारी केली आहे. आता हा आयात केलेला उमेदवार कोण असेल, हे भाजपाच्या श्रेष्ठींनी मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी भागातील ज्ञानराज सभागृहात बुधवारी भाजपा पदाधिकाºयांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार अतुल भातखळकर यांनी शहरातील पदाधिकाºयांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना बुथलेव्हलवर जाऊन काम करण्याचा सल्ला दिला. बुथलेव्हलवर जाऊन पक्षाची भूमिका, पक्षाने मागील साडेचार वर्षांत केलेली कामे याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा, असेही सांगितल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली.
>शिंदे यांनी केले मुख्यमंत्र्यांशी दोन हात
मागील काही महिन्यांपासून शिवसेना आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दोन निवडणुकांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यांच्याशी दोन हात केले. पालघर लोकसभा मतदारसंघात सेनेने उमेदवार उभा केला तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही शिवसेनेने उमेदवार दिला होता. त्यामुळे शिंदे यांचे त्यांच्याच गडात पानिपत करण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे.

Web Title: BJP's Thane, Kalyan constituency is the only goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.