दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाईंदर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:17 AM2019-02-17T04:17:02+5:302019-02-17T04:17:33+5:30

जवानांना वाहिली श्रद्धांजली : बस, रिक्षाचालकही झाले सहभागी, प्रवाशांचे झाले हाल, ठिकठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळला

Bhaindar closed for condemnation of terrorist attacks | दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाईंदर बंद

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाईंदर बंद

Next

भाईंदर : काश्मीर येथील पुलवामा येथे जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारपासून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवारपासूनच शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात झाली.

माजी आमदार मुझफ्फर हुसेन, आमदार नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक, महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, विरोधी पक्षनेते राजू भोईर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांच्यासह नागरिकांनी इमारतीच्या आवारांत, चौकाचौकांत, रस्त्यांवर, पोलीस ठाण्यांत तसेच मैदानांत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवादी आदिल अहमद दार याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. रिक्षा संघटनांनी उत्स्फूर्तपणे रिक्षा बंद ठेवल्या होत्या. तसेच स्थानिक परिवहनसेवा, एसटी, बेस्टसेवाही बंद पाडल्याने प्रवाशांसह नागरिकांचे हाल झाले.

नालासोपारा येथे रेल रोको झाल्याने भार्इंदर व मीरा रोड रेल्वेस्थानकांत विरारच्या बाजूने लोकलच येत नसल्याने प्रवाशांची स्थानकात गर्दी झाली होती. त्यातच रिक्षा, बस बंद असल्याने प्रवाशांना पायीच प्रवास करावा लागला. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. शहरातील अनेक दुकाने दुपारच्या सुमारास बंद करण्यात आली. परंतु, बाजारपेठा व औषधांची दुकाने मात्र सुरू होती. बंदची कल्पना नसल्याने शहरातील अनेक खाजगी शाळा सकाळच्या सत्रात सुरू होत्या. दुपारी बंद पाळण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळताच खाजगी शाळा दुपारनंतर बंद ठेवण्यात आल्या. पालिकेच्या शाळा सुरू ठेवल्या, तरी अनेक पालकांनी मुलांना शाळेतच पाठवले नाही. त्यामुळे पालिका शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. पालिका कार्यालयातही अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती तुरळक होती. दरम्यान, पालिका मुख्यालयाच्या आवारात राम सत्संग केंद्राच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने ‘भारतमाता की जय’च्या जोरदार घोषणाबाजी करून मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी सुरक्षारक्षकांनी वेळीच मुख्यालयाचे दरवाजे बंद केल्याने कार्यकर्ते माघारी फिरले.

ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरबाड : शिवसेनेने शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करत भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुुरबाड शहरासह तालुक्यातील सरळगाव, धसई, टोकावडे, म्हसा, शिवळे या बाजारपेठांत कडकडीत बंद पाळण्यात आला.

श्रमजीवीतर्फे आदरांजली
किन्हवली : श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयाबाहेर शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर, तहसीलदारांना निवेदन दिले. तालुका सचिव प्रकाश खोडका, सुमन हिलम, मालू हुमणे, ताराबाई दिवे, कमल कदम, नितीन जाधव आदी उपस्थित होते.

अंबरनाथमध्ये काँग्रेसतर्फे श्रद्धांजली
अंबरनाथ : अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अतिरेकी कारवाईचा यावेळी निषेध करण्यात आला. महिलांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. तर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनीदेखील काँग्रेसच्या वतीने हल्याचा निषेध व्यक्त केला.

निधी जमा करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

बदलापूर : येथील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी १० दिवस रोज आपल्या खाऊमधील एक किंवा दोन रु पये गोळा करून सैनिक निधीमध्ये जमा करण्याचा संकल्प केला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून आपलाही वाटा असावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजपासून १० दिवस आपल्या रोजच्या खाऊच्या वाट्यातून केवळ एक किंवा दोन रु पये गोळा करून सैनिक निधीमध्ये जमा करण्याचा संकल्प केला आहे. महाविद्यालयातील दीड हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वैदेही दप्तरदार म्हणाल्या की, आपण सुरक्षित आहोत, ते केवळ आपल्या भारतीय जवानांमुळेच. आपण शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहाण्याची वेळ आलेली आहे. अशीच मदत सर्वांकडून आल्यास त्या जवानांच्या कुटुंबीयांनाही मानसिक आधार मिळू शकेल, असे दप्तरदार यांनी सांगितले.

उल्हासनगरमध्ये सर्व पक्ष रस्त्यावर
उल्हासनगर : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये रिक्षा संघटनाही सहभागी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. भाटिया चौकात संतप्त तरुणांनी टायर जाळल्याने पोलिसांची धावपळ झाली.
उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांच्या आवाहनानंतर व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. तसेच शुक्रवारनंतर पुन्हा शनिवारी सकाळपासून रिक्षा बंद होत्या. तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून शाळा व्यवस्थापनाने अघोषित सुटी जाहीर केली. दुपारनंतर विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भ्याड हल्ल्याचा निषेध केला. शुक्रवारी सायंकाळी भारिपाच्या वतीने कॅण्डल मार्च काढण्यात आला. तर, मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख, काँॅगे्रसचे शहराध्यक्ष राधाचरण करोतिया यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर स्टेशन परिसरात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरातील अनेक ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज जाळला. तसेच चर्मकार संघटनेने कार्यक्रम रद्द केले असे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Bhaindar closed for condemnation of terrorist attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.