ठाण्यात शर्टच्या आधारे लागला विनयभंग करणाऱ्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:01 PM2018-08-16T22:01:05+5:302018-08-16T22:08:22+5:30

खारेगावात एका अल्पवयीन मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग करणा-या संजय सिंग या नृत्य शिक्षकानेच माजीवडयातील महिलेचाही विनयभंग केल्याचे उघड झाल्याने त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याला आधी खारेगावच्या प्रकरणात कळवा पोलिसांनी अटक केली होती.

 Based on the shirt of molestant, Thane police arrested accused | ठाण्यात शर्टच्या आधारे लागला विनयभंग करणाऱ्याचा शोध

कारागृहातून घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देखारेगावातही लिफ्टमध्ये मुलीशी गैरवर्तनकापूरबावडी पोलिसांची कारवाई कारागृहातून घेतले ताब्यात

ठाणे : माजिवडा भागातील एका महिलेचा विनयभंग करणा-या शंकर ऊर्फ संजय सिंग (२४, रा. किसननगर, ठाणे) या नृत्यशिक्षकास गुरुवारी कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. त्याने परिधान केलेल्या शर्टासह महिलेने त्याचे वर्णन पोलिसांना दिल्यानंतर त्याला ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले. कळव्यातही अशाच एका प्रकरणात त्याला पाच दिवसांपूर्वी अटक झाली होती.
माजिवडा भागातील ‘रुस्तुमजी’ या इमारतीसमोरील पाइपलाइनलगतच्या रस्त्याने ९ आॅगस्ट २०१८ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही महिला मॉर्निंग वॉक करत होती. त्यावेळी संजयने पाठीमागून येऊन तिचा विनयभंग करून अश्लील चाळे केले होते. याप्रकरणी या महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकारानंतर महिलेने त्याचे वर्णन आणि फुल्ल बाहीच्या निळ्या शर्टाचे वर्णन दिले होते. दरम्यान, एका तेरावर्षीय मुलीचा खारेगाव येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये विनयभंग प्रकरणात १२ आॅगस्ट रोजी संजयला कळवा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
विनयभंग करण्याचा त्याचा विचित्र प्रकार माजिवड्यातील घटनेशी मिळताजुळता होता. शिवाय, कोलशेत रोड येथे त्याचा नृत्य शिकवण्याचा क्लास असल्यामुळे तो त्यावेळी माजिवडामार्गे आल्याचेही पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे आणि सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या तपासात उघड झाले. कळव्यातील घटनेमध्ये त्याने केलेला घृणास्पद प्रकार इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, तर माजिवड्यातील घटनेत परिस्थितीजन्य पुरावा पोलिसांना मिळाला. त्याच आधारे ठाणे न्यायालयात ही माहिती देऊन पोलिसांनी त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा प्रकार केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title:  Based on the shirt of molestant, Thane police arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.